Parshuram Jayanti 2023: महिला सबलीकरणापासून वैदिक संस्कृतीच्या प्रसारापर्यंत भगवान परशुरामांनी केलेल्या कार्याची ओळख करून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 04:36 PM2023-04-21T16:36:42+5:302023-04-21T16:37:09+5:30

Parshuram Jayanti 2023: परशुराम जयंतीनिमित्त घेऊया भगवान परशुरामांच्या अगाध कार्याचा थोडक्यात आढावा!

Parshuram Jayanti 2023: Discover Lord Parashuram's work from women empowerment to propagation of Vedic culture! | Parshuram Jayanti 2023: महिला सबलीकरणापासून वैदिक संस्कृतीच्या प्रसारापर्यंत भगवान परशुरामांनी केलेल्या कार्याची ओळख करून घ्या!

Parshuram Jayanti 2023: महिला सबलीकरणापासून वैदिक संस्कृतीच्या प्रसारापर्यंत भगवान परशुरामांनी केलेल्या कार्याची ओळख करून घ्या!

googlenewsNext

भगवान परशुराम हे भारतातील ऋषी परंपरेचे सर्वोत्तम मार्गदर्शक मानले जातात. पौराणिक कथेनुसार, महर्षी भृगु यांचे पुत्र महर्षी जमदग्नी यांनी केलेल्या पुत्रेष्टी यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या देवराज इंद्राचे वरदान म्हणून महर्षी जमदग्नी यांच्या पत्नी रेणुका यांच्या पोटी वैशाख शुद्ध तृतीयेला अर्थात अक्षय तृतीयेच्या रात्री त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मकाळ हा सत्ययुग आणि त्रेतायुगाचा संधिकाल मानला जातो. शस्त्र आणि शास्त्र यात पारंगत अशी ख्याती असलेले भगवान परशुराम यांचा जन्म पाच उच्च ग्रहांच्या योगात झाला. यातून ते ब्रह्मतेज, क्षात्रतेज, दैदिप्यमन ओजस्वी व्यक्तिमत्त्व घेऊन ते प्रबळ महापुरुष झाले.

भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. महाभारत आणि विष्णुपुराणानुसार, परशुरामचे मूळ नाव राम होते, परंतु भगवान शंकराने त्यांना परशु नावाचे स्वतःचे शस्त्र दिले तेव्हा त्याचे नाव परशुराम झाले. जमदग्नीचा पुत्र असल्यामुळे त्यांना जमदज्ञ असेही म्हटले जाते. महर्षी विश्वामित्र आणि ऋचिक यांच्या आश्रमात सुरुवातीचे शिक्षण त्यांनी घेतले. महर्षी रिचिक यांच्याकडून धनुष्य आणि ब्रह्मर्षी कश्यप यांच्याकडून अविनाशी वैष्णव मंत्राचे ज्ञान घेतले. त्यानंतर कैलासगिरी शिखरावरील भगवान शंकराच्या आश्रमात शिक्षण घेतल्यानंतर त्यांना ‘विद्युह्मी’ नावाचे विशेष दैवी शस्त्र प्राप्त झाले. तसेच शंकराकडून त्यांना भगवान कृष्णाचे त्रैलोक्य विजय कवच, सत्वराज स्तोत्र आणि मंत्र कल्पतरू देखील प्राप्त झाले. 

ही सर्व विद्या संपादन करून त्यांनी काय केले?

जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. त्यानंतर त्यांचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना आणि कर्णला त्या सगळ्या विद्या दिल्या.त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा २१ वेळा संहार केला. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.

त्यांना वैदिक संस्कृतीचा पृथ्वीवर प्रसार करायचा होता. पौराणिक कथेनुसार, भगवान परशुरामांनी बाण सोडला आणि गुजरातपासून केरळपर्यंत एक नवीन भूमी तयार केली जी समुद्राला मागे ढकलली. यामुळे भगवान परशुराम कोकण, गोवा आणि केरळमध्ये अत्यंत पूजनीय आहेत.

भगवान परशुरामांनी सदैव गुरू आणि आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन केले. जमदग्नी ऋषींनीरागाच्या भरात एकदा आपला पुत्र परशुराम याला त्याच्या मातेचे म्हणजेच रेणुका मातेचे शीर कापण्यास सांगितले. परशुरामांनी आज्ञापालन केले. परंतु वडिलांनी राग शांत झाल्यावर काय वरदान हवे असे विचारल्यावर परशुरामांनी आपल्या आईलाच मागून घेतले. अशी त्यांची मातृ पितृ भक्ती!

परशुरामांनी अत्रि मुनींची पत्नी अनसूया, अगस्त्य मुनींची पत्नी लोपामुद्रा आणि त्यांची प्रिय शिष्य अकृत्वान यांच्या सहकार्याने महिला जागृती मोहीम सुरू केली आणि समाजात महिलांचा सन्मान आणि स्त्रीत्व वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी 'राजधर्म'ही शिकवला. त्यांच्या राजधर्मानुसार राजाचा धर्म वैदिक जीवनाचा प्रसार करणे हा आहे. याबद्दल ते सदैव आग्रही असत. 

असत्य, अधर्म आणि कुप्रथा यांचे विरोधक होते. दुष्टांसाठी दुष्ट आणि सज्जनांसाठी सज्जन होऊन राहत असत. ते फक्त मानवाचे नाही तर प्राणीमित्र सुद्धा होते. जंगलातील कितीतरी हिंस्त्र प्राणी त्यांच्या स्पर्शाने शांत आणि अहिंसक बनले. ते प्राणी आणि पक्ष्यांची भाषा देखील बोलत होता आणि त्यांच्याशी संवाद साधत असत. वन्य जीवनात रमत असत. 

भगवान परशुरामांनी अकरा श्लोकांसह 'शिव पंचत्वरिषणम् स्तोत्र' लिहिले. भगवान परशुरामांकडून बुद्धी, तेज, बळ तसेच इच्छित फळ मिळविण्यासाठी या मंत्राने पूजा करा - ॐ जमदग्नाय विद्महे महावीराय धीमही, तन्नो: परशुराम: प्रचोदयात!

Web Title: Parshuram Jayanti 2023: Discover Lord Parashuram's work from women empowerment to propagation of Vedic culture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.