परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 02:13 PM2024-05-08T14:13:01+5:302024-05-08T14:25:14+5:30

Parshuram Jayanti 2024: परशुराम सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत. देशभरातील विविध ठिकाणी परशुराम क्षेत्रे आहेत. परशुराम यांचा उल्लेख रामायण, महाभारतातही आढळून येतो.

parshuram jayanti 2024 know about lord parshuram on akshaya tritiya janmotsav and significance | परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य

परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य

Parshuram Jayanti 2024: अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि।।, असे परशुरामांबाबत बोलले जाते. शस्त्र, शास्त्रात पारंगत, अधर्मीयांचा नाश, निसर्ग संवर्धनाला हातभार, स्त्रीसबलीकरणाला प्रोत्साहन, वैदिक धर्माचा प्रसार आणि मातृ पितृ भक्ती अशी ख्याती असलेले भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीया यांचा जन्म झाल्याची मान्यता आहे. परशुरामांचे अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने सांगितले जाते. परशुराम हे सात चिरंजीवांमधील एक आहेत, असे समजले जाते. परशुराम ओडिसामधील गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी येथील महेंद्रगिरी पर्वतावर वास करतात, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. १० मे रोजी अक्षय्य तृतीया असून, या दिवशी परशुरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

परशुराम हे भारतातील ऋषी परंपरेचे सर्वोत्तम मार्गदर्शक मानले जातात. पौराणिक कथेनुसार, महर्षी भृगु यांचे पुत्र महर्षी जमदग्नी यांनी केलेल्या पुत्रेष्टी यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या देवराज इंद्राचे वरदान म्हणून महर्षी जमदग्नी यांच्या पत्नी रेणुका यांच्या पोटी वैशाख शुद्ध तृतीयेला अर्थात अक्षय तृतीयेच्या रात्री त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मकाळ हा सत्ययुग आणि त्रेतायुगाचा संधिकाल मानला जातो. रामायण तसेच महाभारत काळात परशुराम यांचा उल्लेख येतो. 

अविनाशी वैष्णव मंत्राचे ज्ञान, शंकरांकडून परशू

महाभारत आणि विष्णुपुराणानुसार, परशुरामचे मूळ नाव रामभद्र होते, परंतु भगवान शंकराने त्यांना परशु नावाचे स्वतःचे शस्त्र दिले तेव्हा त्याचे नाव परशुराम झाले. महर्षी विश्वामित्र आणि ऋचिक यांच्या आश्रमात सुरुवातीचे शिक्षण त्यांनी घेतले. महर्षी रिचिक यांच्याकडून धनुष्य आणि ब्रह्मर्षी कश्यप यांच्याकडून अविनाशी वैष्णव मंत्राचे ज्ञान घेतले. त्यानंतर कैलासगिरी शिखरावरील भगवान शंकराच्या आश्रमात शिक्षण घेतल्यानंतर त्यांना ‘विद्युह्मी’ नावाचे विशेष दैवी शस्त्र प्राप्त झाले. तसेच शंकराकडून त्यांना भगवान कृष्णाचे त्रैलोक्य विजय कवच, सत्वराज स्तोत्र आणि मंत्र कल्पतरू प्राप्त झाले. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाचा वध केला.

पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा २१ वेळा संहार 

रामायणात सीता स्वयंवरावेळी परशुरामांचा उल्लेख येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र, श्रीरामांचे खरे स्वरुप समजल्यानंतर परशुराम शांत झाले आणि श्रीरामाला आपल्याकडील धनुष्य व विद्या दिली. महाभारत काळी, भीष्मांना आणि कर्णला त्या सगळ्या विद्या दिल्या. परशुरामांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा २१ वेळा संहार केला. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

परशुराम कोकण, गोवा आणि केरळमध्ये अत्यंत पूजनीय

परशुरामांना वैदिक संस्कृतीचा पृथ्वीवर प्रसार करायचा होता. पौराणिक कथेनुसार, परशुरामांनी बाण सोडला आणि गुजरातपासून केरळपर्यंत एक नवीन भूमी तयार केली. यामुळे भगवान परशुराम कोकण, गोवा आणि केरळमध्ये अत्यंत पूजनीय आहेत, असे म्हणतात. परशुरामांनी सदैव गुरू आणि आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन केले. असत्य, अधर्म आणि कुप्रथा यांचे विरोधक होते. दुष्टांसाठी दुष्ट आणि सज्जनांसाठी सज्जन होऊन राहत असत. भगवान परशुरामांनी अकरा श्लोकांसह 'शिव पंचत्वरिषणम् स्तोत्र' रचले. परशुरामांकडून बुद्धी, तेज, बळ तसेच इच्छित फळ मिळविण्यासाठी जन्मोत्सवानिमित्ताने विशेष स्मरण, पूजन करावे, असे सांगितले जाते. 

संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे

असे मानले जाते की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. तसेच संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत. केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असेही मानले जाते. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओडिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्ये परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. महाराष्ट्रातील चिपळूणमध्ये मुंबई-गोवा हायवेवर महेंद्रगिरी पर्वत आहे. या ठिकाणी परशुरामांचे एक मंदिर आहे. या मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव आहे. परशुरामांचा जन्म अक्षय्य तृतीयेचा आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. महाराष्ट्रात कोकण भागात दापोली तालुक्यातील बुरोंडी गावी परशुरामांचे स्मारक उभारण्यात आले आहे. माहूर गडावर, श्री रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे परशुरामाचे एक प्राचीन मंदिर आहे. उत्तर प्रदेशातील गढवालमधील जौनपूर बावर येथे ४०० वर्षे जुने परशुराम मंदिर आहे.
 

Web Title: parshuram jayanti 2024 know about lord parshuram on akshaya tritiya janmotsav and significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.