Paush Mauni Amavasya 2022: सन २०२२ मध्ये अद्भूत योगायोग! सोमवती, भौमवती अमावास्या एकाचवेळी; पाहा, महत्त्व व मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 05:56 PM2022-01-27T17:56:14+5:302022-01-27T17:57:35+5:30
Paush Mauni Amavasya 2022: पौष मौनी अमावास्येला शुभ योग जुळून येत असून, या दिवसाचे अनन्य साधारण महत्त्व जाणून घ्या...
मराठी वर्षातील प्रत्येक महिन्यात अमावास्या येत असते. उत्तर भारतात नवीन महिन्याची सुरुवात अमावास्येनंतर केली जाते. तर, महाराष्ट्रासह अन्य जवळच्या राज्यांमध्ये अमावास्येनंतर कृष्णपक्ष सुरू होतो, तर पौर्णिमेनंतर नवीन महिना सुरू होतो. भारतीय संस्कृतीत प्रत्येक तिथीचे काही ना काही महत्त्व आहे. अमावास्या ही वाईट किंवा प्रतिकूल प्रभाव पाडणारी असते, असा अनेकांचा समज असतो. मात्र, तसे अजिबात नाही. अमावास्या ही शुभफलदायक मानली गेली आहे. सन २०२२ मधील पौष अमावास्येला अद्भूत योग जुळून येत आहे. पौष अमावास्येला सोमवती आणि भौमवती अमावास्या एकाचवेळी येत आहेत.
वास्तविक पाहता अमावास्या एकाच दिवशी असते. मात्र, सन २०२२ मधील पौष अमावास्येला काही वेगळे योग जुळून येत आहेत. अमावास्येला स्नान, दान तसेच तर्पण कार्य करणे शुभ मानले गेले आहे. तसेच सोमवार, मंगळवार आणि शनिवारी येणाऱ्या अमावास्येचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे मानले जाते. पौष अमावास्येला मौनी अमावास्या असेही म्हटले जाते.
- पौष अमावास्या: ०१ फेब्रुवारी २०२२
- पौष अमावास्या प्रारंभ - सोमवार, ३१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०२ वाजून १९ मिनिटे.
- पौष अमावास्या समाप्ती - मंगळवार, ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजून १६ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. पौष अमावास्या सोमवारी सुरू होणार आहे. अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला सूर्यग्रहणाएवढे महत्त्व असते, असे मानले जाते. पौष अमावास्येची मंगळवारी समाप्ती होत आहे. मंगळवारी येणाऱ्या अमावास्येला भौमवती अमावस्या म्हटले जाते. सोमवाती अमावस्येप्रमाणे भौमवती अमावास्याही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पौष अमावास्येला सोमवती आणि भौमवती या दोन्हींचा शुभयोग जुळून आला आहे.
सोमवती अमावास्येचे महत्त्व
अमावास्येला अनन्य साधारण महत्त्व असते आणि त्याचा लाभही होतो. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात आले आहे. सोमवारी महादेव शिवशंकराची पूजा केली जाते. म्हणूनच सोमवती अमावास्येला शंकराची पूजा, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. सोमवती अमावास्येला पिंडदान करून पूर्वजांचे पूजन केले जाते. ज्या व्यक्तींच्या राशीत चंद्र ग्रह कमकुवत असतो. त्या व्यक्तींनी सोमवती अमावास्येला गोमातेला अन्नदान करावे, असा सल्ला दिला जातो. चंद्र ग्रहाशी संबंधित व्याधी यामुळे दूर होतात, अशी मान्यता आहे. तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असते. गंगास्नान शक्य नसलेल्या व्यक्तींनी नदी किंवा तलावात स्नान करावे, असे सांगितले जाते.
भौमवती अमावास्येचे महत्त्व आणि शुभ योग
मंगळवार, १ फेब्रुवारी २०२२ रोजी सूर्योदयाला पौष अमावास्या आहे. या दिवशी शुभ नावाचा योग जुळून येत आहे. यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या दिवशी केलेले व्रत, पूजा-पाठ आणि दानकार्य करणे शुभफलदायक मानले जाते. याशिवाय हनुमानाचे पूजन, नामस्मरण करणे लाभदायक ठरते. यामुळे जन्मकुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होऊ शकतो, असे म्हटले जाते. भौमवती अमावास्येच्या दिवशी रात्री पंचक लागत आहे.