Paush Purnima 2023: ६ जानेवारीला आहे पौष पौर्णिमा, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय करायला विसरू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 10:06 AM2023-01-05T10:06:03+5:302023-01-05T10:07:39+5:30
Paush Purnima 2023: ६ जानेवारी रोजी पौष पौंर्णिमा आणि शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे, त्यानिमित्त लक्ष्मी कृपा प्राप्त करण्यासाठी दिलेले उपाय करा.
हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष मानले जाते. या वेळी पौष महिन्याची पौर्णिमा शुक्रवार, ०६ जानेवारी २०२३ रोजी साजरी केली जाईल. नवीन वर्ष २०२३ ची ही पहिली पौर्णिमा आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी उपवास, गंगेत स्नान आणि दानधर्म करण्यला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान, दान, जप आणि उपवास केल्याने पुण्य प्राप्त होते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्यानंतर रात्री चंद्रदेव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. याशिवाय या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया पौष पौर्णिमेच्या स्नान दानाची वेळ, पूजा पद्धती आणि उपाय....
पौष पौर्णिमा तारीख नेमकी कोणती?
पौर्णिमा सुरू होते - ५ जानेवारी गुरुवार दुपारी २. १६ मिनिटांपासून
पौर्णिमा समाप्ती - ६ जानेवारी शुक्रवारी सकाळी ४. ३७ मिनिटांपर्यंत
हिंदू धर्मात सूर्याला विशेष महत्त्व असल्याने सूर्य ज्या दिवशीची तिथी पाहतो तो दिवस ग्राह्य धरला जातो, म्हणून पौष पौर्णिमा ६ जानेवारी रोजी असल्याचे म्हटले आहे.
पौष पौर्णिमा पूजा पद्धत
- पौष पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून गंगेत स्नान करावे, ते शक्य नसेल तर घरच्या घरी लवकर उठून स्नान करावे आणि स्नान करताना गंगा मातेचे स्मरण करावे. नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतरच हे व्रत करावे.
- त्यानंतर हळद, कुंकू, फुले, फळे, मिठाई, पंचामृत, नैवेद्य यांनी लक्ष्मी नारायणाची पूजा करावी.
- यानंतर सत्यनारायण कथा वाचून श्री हरी विष्णूची पूजा करावी.
- संध्याकाळी दुधात साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण करावे किंवा तांदळाची खीर करावी.
- गूळ, तीळ, घोंगडी इत्यादी उपयुक्त गोष्टींचे गरजूंना दान करावे आणि पुरोहितांना शिधा द्यावा.
- यथाशक्ती गरीब कुटुंबाला दान धर्म करावा.
- सायंकाळी लक्ष्मी मातेची पूजा करावी.
- लक्ष्मीला धूप, दीप आणि माला अर्पण करावी.
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय
०६ जानेवारी रोजी पौर्णिमेचा आहे आणि शुक्रवारही! अशा स्थितीत लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होण्यासाठी एक विशेष योगायोग तयार होत आहे. अशा स्थितीत पौर्णिमेच्या शुभ योगात देवी लक्ष्मीची पूजा नियमानुसार करावी. एखाद्या मंदिरात लाल वस्त्र, हिरव्या बांगड्या, गजरा देवीला अर्पण करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा. सुवासिनीची ओटी भरावी. कुमारिकेची पूजा करावी. शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर प्रथम देवी लक्ष्मीला, चंद्राला खिरीचा नैवेद्य दाखवून मगच उपास सोडावा.
पौष पौर्णिमेच्या शुभ दिवशी गाईच्या रूपात असलेल्या कामधेनूची सेवा करा. गोग्रास अर्पण करा. चारा खाऊ घाला. या सेवेने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते आणि घरात धनवृद्धी होते. याशिवाय पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून जल अर्पण केल्यास लक्ष्मीसह विष्णूंचीही कृपा होते.