Paush Purnima 2023: पौष पौर्णिमेला झाला होता खंडोबा आणि म्हाळसेचा विवाह; पण हीच तिथी का? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 08:59 AM2023-01-05T08:59:30+5:302023-01-05T09:00:04+5:30
Paush Purnima 2023: पौषात लग्न कार्ये होत नाहीत असे आपण मानतो, परंतु खंडेरायाने हीच तिथी लग्नासाठी निवडली त्यामागे होते विशेष कारण!
'येळकोट येळकोट...जय मल्हार' म्हणत लाखो लोकांच्या उपस्थितीत दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सातारा येथील पाली मध्ये पार पडतो. प्रथेनुसार पेंबर गावातील मुख्य मंदिरातून देवाचे मुखवटे मानकरी नदीपलीकडे घेऊन जातात. यावेळी हे मुखवटे पालखीतून वाजत गाजत विवाहासाठी नेले जातात. यानंतर विवाह मंडपात मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून खंडोबा म्हाळसेचा विवाह सोहळा संपन्न होतो. त्यानिमित्ताने खंडोबाची जत्रा भरते आणि हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहून या सोहळ्याचा एक भाग होतात. यंदा ६ जानेवारी रोजी पौष पौर्णिमा आहे, त्यानिमित्त या उत्सवाची माहिती घेऊ.
महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या असंख्य कुलांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. तो शंकराचा अवतार मानला जातो. जेजुरीच्या खंडोबाला मल्हारीमार्तंड, म्हाळसाकांत, मल्हारी अशा अनेक नावांनी गौरवले गेले आहे. त्याच्या पत्नीचे नाव म्हाळसा. ती तिम्मशेट वाण्याची मुलगी. तिम्मशेटला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्यानुसार स्वप्नपूर्ती करण्यासाठी तिम्मशेटनी तिचा विवाह खंडोबाशी करून दिला. हा विवाह पौष पौर्णिमेला संपन्न झाला. म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांची ही विवाहतिथी मानली जाते. पौषात विवाह किंवा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. कारण पुष्य नक्षत्र हे विरक्ती देणारे आहे. अशा नक्षत्रावर लग्न केले तर संसारात विरक्ती येऊन कसे चालेल? तरीदेखील शिव पार्वतीचे रूप असलेले खंडोबा आणि म्हाळसा यांनी पौष पौर्णिमा ही विवाह तिथी निवडली. कारण शिवशंकर हे स्वतः मदनारी म्हणजे मदनाचा नाश करणारे त्याच्यावर विजय मिळवणारे आणि पार्वती ही जगद्सुंदरी असल्यामुळे त्यांच्या संसारात या नक्षताची बाधा झाली नाही उलट निर्विघ्नपणे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाहदिनाची आठवण जागवणारा सोहळा सणासारखा साजरा होतो. हा एक लोकोत्सव आहे. पिढी दरपिढी चालत आलेल्या रितिरिवाजाप्रमाणे तो साजरा केला जातो. आपल्या लोकसंस्कृतीचा जवळून परिचय व्हावा, म्हणून प्रत्येकाने एकदा तरी या पवित्र विवाहसोहळ्यात उपस्थित राहून हे `देवकार्य' बघावे. शक्य झाल्यास आर्थिक मदत करावी.
खंडोबाच्या लग्नाची अनेक लोकगीते प्रचलित आहेत. त्यापैकीच एक गीत जागरणाच्या वेळेस म्हटले जाते. आपणही खंडोबा आणि म्हाळसा विवाहप्रित्यर्थ ते गाणे म्हणून या विवाहसोहळ्याचा आनंद अनुभवूया.
म्या पाहिला पिवळा झेंडा गं, या देवाचा बाई।
रात्री मजला स्वप्न पडले,
मलूरायाचे दर्शन घडले,
हाती झळके खड्ग खंडा गं, या देवाचा बाई।
मुकुट शोभे शिरावरी,
अर्धांगी म्हाळसा सुंदरी,
झाला घोड्यावरती स्वार गं, देव पालीचा बाई।
तनमनधन तुझ्या चरणी वाहिले,
मज नाही देहभान राहिले,
तुझ्या चरणी अर्पण केला गं, देह अमुचा बाई।
सद्गुरु वाचूनी सापडेना सोयी,
मज कळेना अनुभव काही,
धोंडू पांडुभक्तीचा वेडा गं, चल सेवेला बाई।