निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठा, नेतसे वैकुंठा गुरुनामें!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 11:26 AM2021-07-06T11:26:35+5:302021-07-06T11:26:35+5:30

  ज्येष्ठ वद्य  बारसला संत निवृत्तीनाथ महाराजांचा परमसमाधी दिन, निर्वाणाचा दिवस. 

Pay obeisance to Sant Nivruttinath | निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठा, नेतसे वैकुंठा गुरुनामें!

निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठा, नेतसे वैकुंठा गुरुनामें!

googlenewsNext

  ज्येष्ठ वद्य  बारसला संत निवृत्तीनाथ महाराजांचा परमसमाधी दिन, निर्वाणाचा दिवस. 
             संत निवृृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही चारही भावंडं अपवाद आहेत या जगात. सर्वात आधी ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली त्यावेळी ते २१ वर्षाचे होते. त्यानंतर अत्यंत वैराग्य भावी होऊन सोपानदेवांनी केवळ एक महिन्याचे अंतराने समाधी घेतली त्यावेळी
 ते १९ वर्षाचे होते. त्यानंतर केवळ ५ महिन्यात संत मुक्ताबाईंनी अवतार कार्य संपविले त्यावेळी त्या केवळ १८ वर्षाच्या होत्या.  या तिनही भावंडाचे सहा महिन्याचे निर्वाणानंतर संत निवृत्तीनाथांही शरीरात राहणे काही औचित्याचे राहिले नाही व त्यांनी मुक्ताईंच्या प्रयाणानंतर अवघ्या  एका महिन्यात ज्येष्ठ वद्य व्दादशीला त्र्यंबकेश्वरी समाधी घेतली. त्यावेळी ते केवळ २४ वर्षाचे होते. 
           बालपणानंतर किशोरावस्थेपासून केवळ सहा सात वर्षात या चार दिव्य विभुंतींनी धर्म कार्य करुन जगाला ज्ञानाची वाट लोकभाषेतून दाखविली व त्या वाटेवर सुमारे ७२५ वर्षांनंतरही लोक  चालत आहेत.  निवृत्तीनाथ तिनही भावंडांचे गुरु राहिले. त्यांचे अभंगही अदभूत आहेत. त्यांनी आपल्या अभंगातून जीवनाचे विराट दर्शन घडविले. पण या विराट जीवनाकडे आमची दृष्टी उठते कां?
           आमच्या दृष्टीतून आमच्यासाठी जीवन काय आहे ? माझा देह, त्याचे नांव आहे व त्याचा एक माझा गाव आहे. माझे  एक कुटुंब आहे. काही चांगले लोक आहेत सहकार्य  प्रेम करणारे, तर काही व्देष करणारे आहेत, काही अडचणी निर्माण करणारे, तर काही तटस्थ व्यवहारमात्र राहणारे.  या संसाराचे व्दैत सांभाळत सांभाळत, संतुलन साधत साधत मी आपले जीवन व्यतित करतो. जन्म ते  मृत्यु पर्यंत माझे जगणे या जीवनाचे अनुभवा पलिकडे माझी दृष्टी जात नाही. या जीवनाच्या व्यापकते कडे माझे लक्ष जात नाही. कारण या जीवनातील गरजा व अनेकविध विषयांच्या आवडी पायी मी केवळ या माझ्या  देहाच्या ठायी एवढ्या  असंख्य वासना निर्माण करुन ठेवतो की, माझा हा देहपिंड हेच माझे सर्वस्व, हेच माझे  ब्रह्मांड ठरते. जीवन म्हणून देहापलिकडे माझा विचार, माझी दृष्टी  उंचावतच नाही.  परंतु जीवन हे अनंत ब्रह्मांडाने व विस्मयकारी रचनांनी युक्त आहे, ही ज्ञानाची दिव्यदृष्टी आहे व ही दिव्यदृष्टी, नवनाथापैकी महान नाथ गहिनीनाथ यांचे गुरुकृपे निवृत्तीनाथांनी मिळविली व स्वतःही  गुरुरुप होऊन आपल्या तिनही भावंडांनाही ती दिव्यदृष्टी दिली. परमेश्वराचे हे जीवन अनंत ब्रह्मांडात व्याप्त आहे. अनेक रचनांमध्ये व्याप्त आहे. म्हणून निवृत्तीनाथ  आपल्या अभंगात म्हणतात
                 अनंत ब्रह्मांडें अनंत रचना । 
               शून्य देह वासना तेथें झाली ॥ 
 
परमेश्वराने  अनंत ब्रह्माडांची व अनंत प्रकारची विश्वरचना केली आहे. त्या अनंत ब्रह्माडांचा गुण घेऊन अणुमात्र हा माझा देह, स्थुलतः हा माझा पिंड आहे. जर सुक्ष्म रुपाने  हे अनुभवता की, मी केवळ पिंडरुपच नसून ब्रह्मांड रुपही आहे तेव्हा या नश्वर  देहाविषयीची वासना शुन्य होणेच आहे. संपणेच आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, अनंतब्रह्नांडाला जाणले तर हा देह त्याचा अणुमात्रही नाही. अणुमात्र असूनही वासना प्रचंड आहे. याच अणुमात्रला पूर्णता जाणले तर हा ब्रह्मांडरुपही आहे. हे जाणणेच देहाचे वासनेला शुन्यात नेते.
 
              मन गेलें शून्यीं ध्यान तें उन्मनी । 
                चित्त नारायणीं दृढ माझें ॥ 
मन सदैव देहाला धरुन असते. देहाचे आधारे ते आपल्या कामना पूर्ण करु शकते. इच्छांची पूर्तीही करु शकते. पण देहाचा व मनाचा जो संबंधाचा पूल आहे तो तोडला की मनही शरीरापासुन तूटणेच आहे. मग बुध्दीचे ध्यान जे मनाला आधार होते तेही तुटल्याने मनाची जी अंतीम मुद्रा, अंतीम शुध्द स्थिती आहे जिला ज्ञानी उन्मन अवस्था म्हणतात,  ती मला लाभली आहे व चित्त जे संसाराचे स्मरण देत रहायचे ते नारायणाठायी, परमेश्वराठायी दृढपणे एकरुप झाले आहे, अशी पवित्र अवस्था आपली झाल्याचे निवृत्तीनाथ सांगतात.
             
              तेथें नाहीं ठावो वेदासि आश्रयो । 
                लोपले चंद्र सूर्य नाहीं सृष्टीं ॥ 
नारायणाचा ठावठिकाणा कुणाला लागला ?  वेद सर्वाधिक ज्ञानी परंतु तेही नारायणाचा ठाव सांगु शकले नाहीत. त्यामुळे वेदांनाही परमेश्वराचा आश्रय नाही मिळू शकला. जेथे सुक्ष्मज्ञानी वेद दूर राहिले तेथे चंद्र, सूर्यादि तारे आदिंनाही कुठे  आधार असणार? सृष्टीच लोपली. चंद्र सूर्य हे आमचे सृष्टीचा आधार आहेत. केवळ पृथ्वीपुरता विचार करता चंद्र सूर्यच आमचा सृष्टि प्रकाशाचा आधार आहेत. पण गोष्ट आता पृथ्वीपुरती नसून आत्मबोधाने गोष्ट अनंत ब्रम्हांडाशी एकरुप होण्याची आहे. तेथे मर्यादेचा लोप होणेच आहे.
               
                  निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठा । 
                      नेतसे वैकुंठा गुरुनामें ॥     

संत निवृत्तीनाथ म्हणतात, वेदांनाही जेथे आश्रय नाही व सृष्टीला जागा नाही तेथे, त्या परमेश्वराचे वैकुंठाचे ठायी ठाव मज पैठा करता झाला. पैठाचा अर्थ होतो प्रवेश. मला मात्र  परमेश्वराठायी प्रवेश मिळाला आहे, तो गुरुनामामुळे. त्यामुळेच आम्ही  आता वैकुंठची घर केले असे. पंढरीनाथ महाराज की जय !

बापरखुमादेवीवरु विठ्ठल चरणी नमन!
जीवनाचा परमबोध देणार्‍या समस्त संत सज्जनांना त्रिवार वंदन ! 
सदगुरु निवृत्तीनाथांना श्रध्दापूर्वक नमन.

                                          शं.ना.बेंडे पाटील

Web Title: Pay obeisance to Sant Nivruttinath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.