Pithori Amavasya 2022: मातृसौख्यापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी 'पिठोरी अमावस्येचे'व्रत महाफलदायी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 04:29 PM2022-08-23T16:29:35+5:302022-08-23T16:30:04+5:30
Pithori Amavasya 2022: ज्या स्त्रिया संततीसुखापासून वंचित आहेत किंवा ज्यांचे मूल अल्पावधीत देवाघरी जाते, अशा स्त्रियांना दिलासा देणारे हे व्रत आहे.
श्रावण वद्य अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा २६ ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्या आहे. याला मातृदिन असेही म्हणतात. आजच्या निरंतर वेगवान अशा विज्ञानयुगातही जी व्रते मोठ्या श्रद्धेने आचरली जातात, त्यात पिठोरी अमावस्या व्रताचाही समावेश होतो. हे स्त्रियांनी करायचे व्रत असून संततीविषयक दोष घालवणारे महत्त्वाचे व्रत मानले जाते. विशेषत: ज्या स्त्रिया संततीसुखापासून वंचित आहेत किंवा ज्यांचे मूल अल्पावधीत देवाघरी जाते, अशा स्त्रियांना दिलासा देणारे हे व्रत आहे.
हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. व्रतकत्र्या स्त्रीने या दिवशी उपास करून सायंकाळी पुनश्च स्नान करावे. नंतर व्रतसंकल्पाचे उच्चारण करून सर्वप्रथम गणपतीपूजनव वरुणावर पिठोरी देवतेचे आवाहन करावे. त्यानंतर सात कलश वा पंचपात्रांची स्थापना करून त्यावरील द्रोणात तांदूळ घालून त्यावर प्रत्येकी एक अशा सुपाऱ्या मांडून दक्षिणेकडून उत्तरेकडे ब्राह्मी, माहेश्वरी कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चामुण्डा या सात मातांना आवाहन करून त्यांची पूजा करावी. षोडशोपचार पूजेनंतर सर्व देवतांना एक अर्घ्य आणि यथाशक्ती वाण द्यावे. संततीच्या वृद्धीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी व नैवेद्य दाखवावा. घरातल्या लहान मलांना मिष्टान्नभोजन वाढावे व यथाशक्ती दान करावे.
या व्रताने संततीप्राप्ती होते. जिची संतती वाईट वळणाला, कुव्यसनाला, कुसंगतीला लागली असेल अशा मातेने हे व्रत केल्यास ससंतीविषयक त्या त्या समस्या दूर होण्यास मदत होते. हे व्रत सर्व समाजातील स्त्रियांनी करावे. एका विशिष्ट कामनेने हे व्रत आचरले असल्यास कामनापूर्तीनंतर व्रतोद्यापन करावे व विधीपूर्वक सांगता करावी.
आजच्या विज्ञानयुगात या व्रतांकडे अनेक जण उपहासाने पाहतात. परंतु, सगळे तोडगे विफल झाले की मनुष्य हतबल होतो आणि आपल्या ईच्छाशक्तीच्या जोरावर व्रत वैकल्यातून आनंद मिळवतो. ते फळतील अशा आशेवर जगतो. ही आशा निर्माण करून जीवन सुखावह करण्याचे काम धर्मशास्त्राने केले आहे. ज्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्र उपचार करून रोगी शरीर बरे करण्याची आशा निर्माण करते, त्याचप्रमाणे धर्मशास्त्रदेखील मानसिक आरोग्य सुधारून मनोबल वाढवण्याचे काम करते.
या व्रतांचे तंतोतंत पालन करता आले नाही तरी हरकत नाही, परंतु या व्रताचे औचित्य साधून यथाशक्ती पूजा, अतिथी भोजन, दानधर्म आणि उपासना करून व्रत वैकल्यांची परंपरा पुढे न्यावी. कारण या व्रतांचा उद्देश मनुष्याला अंधश्रद्धेकडे नेणारा नसून सश्रद्ध बनवणारा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.