Pitru Paksha 2021 : उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास धर्मशास्त्राने कोणता पर्याय दिला आहे, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 11:14 AM2021-09-24T11:14:11+5:302021-09-24T11:14:35+5:30
Pitru Paksha 2021 : श्राद्धाचे जेवण आपण पितरांसाठी करत असतो. म्हणून आपल्या उपासासाठी त्यांना उपाशी ठेवणे किंवा पर्यायी फराळी पदार्थांचा नैवेद्य दाखवणे उचित नाही, तसेच शास्त्राला धरून नाही.
काही वेळा योगायोगाने संकष्टी, प्रदोष, एकादशी अशा उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येते. त्यावेळी पितरांना नैवेद्य काय दाखवावा, ही अडचण निर्माण होते. यावर धर्मशास्त्राने दिलेला तोडगा प्रभावी ठरू शकतो. तो कोणता, हे जाणून घेऊ.
उपासाच्या दिवशी पितरांची श्राद्धतिथी आली असता सूर्योदयानंतर सुमारे सात तास ती तिथी असल्यामुळे व्रतदिनाच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ती तिथी राहणार आहे का, हे पंचांगात किंवा दिनदर्शिकेवर दिलेल्या माहितीत पाहून घ्यावे. जाणकारांना विचारावे.
पंचांगानुसार उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येत नसेल तर प्रश्नच उद्भवत नाही. परंतु उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येत असेल व हस्तश्राद्ध करायचे असेल, तर ज्यांचा उपास नाही असे ज्येष्ठ ब्राह्मण भोजनासाठी निमंत्रित करावेत. उपास नाही, असे ब्राह्मण उपलब्ध नसतील, तर नातेवाईकांपैकी उपास नसलेल्या व्यक्तीला आणि तीदेखील उपलब्ध नसेल तर गरजू व्यक्तीला श्राद्धाचे अन्न अर्पण करावे आणि पितरांजवळ तशी अडचण व्यक्त करावी.
श्राद्धाचा नैवेद्य दाखवणाऱ्या व्यक्तीचा उपास असेल, जसे की आज संकष्टी आहे आणि संकष्टीचा उपास असेल, तर अशा व्यक्तीने प्रत्यक्ष भोजन न करता श्राद्धाचा नैवेद्य ब्राह्मणाला, गायीला, कावळ्याला आणि कुत्र्याला वाढून स्वत: मात्र ते अन्न केवळ हुंगावे. आणि सायंकाळी उपास सोडते समयी श्राद्धाच्या जेवणाचे अन्न नैवेद्य समजून भक्षण करावे.
Pitru Paksha 2021 : काही कारणास्तव श्राद्ध करणे शक्य नसेल तर धर्मशास्त्रात दिलेले पर्याय वाचा...
काही संप्रदायानुसार एकादशीचे श्राद्ध दुसऱ्या दिवशी करण्याची प्रथा आहे. परंतु शास्त्रानुसार श्राद्धतिथी ओलांडू नये. श्राद्धाचे जेवण आपण पितरांसाठी करत असतो. म्हणून आपल्या उपासासाठी त्यांना उपाशी ठेवणे किंवा पर्यायी फराळी पदार्थांचा नैवेद्य दाखवणे उचित नाही, तसेच शास्त्राला धरून नाही.
या गोष्टींची खबरदारी घेता, उपासाचा बाऊ न करता पितरांचे श्राद्ध वेळच्या वेळेस करावे आणि उपास सोडताना तो नैवेद्य आपण ग्रहण करावा, हे सयुक्तिक ठरते.