Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या पंधरा दिवसांत श्राद्धविधी राहून गेले असतील तर सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 04:23 PM2022-09-24T16:23:05+5:302022-09-24T16:24:09+5:30

Sarva Pitru Amavasya 2022: कोणाला पितरांची तिथी माहीत नाही म्हणून तर कोणाला वेळ मिळाला नाही म्हणून श्राद्धकर्म राहून गेले असेल त्यांच्यासाठी पुढील उपाय दिले आहेत. 

Pitru Paksha 2022: Do 'this' remedy on Sarvapitri Amavasya if Shraddha rituals are missed in fifteen days of Pitru Paksha! | Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या पंधरा दिवसांत श्राद्धविधी राहून गेले असतील तर सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय!

Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या पंधरा दिवसांत श्राद्धविधी राहून गेले असतील तर सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय!

Next

भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचे सोळा दिवस पितृकार्यासाठी अतिशय योग्य असल्याचे आपल्या धर्मशास्त्रात म्हटले आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी जे ज्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करावे, असा शास्त्रसंकेत आहे. वास्तविक भाद्रपदाचा कृष्ण पक्ष म्हणजे महालयपक्ष अर्थात पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु एखादी व्यक्ती पौर्णिमेला गेली असल्यास तिचे श्राद्धकर्म भाद्रपद पौर्णिमेला आणि ते न जमल्यास सर्वपित्री अमावस्येला करण्याची प्रथा आहे. सर्व पितरांचे एकत्रितपणे श्राद्ध अमावस्येला केले जाऊ लागल्याने या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हटले जाते. यंदा रविवारी २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. 

एरव्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण सध्याच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीत करण्याएवढी फुरसद सर्वांकडे नसते. मात्र त्यांच्याबद्दलची आपुलकी, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी दरवर्षी पितृपक्षाच्या रूपाने धर्माने आपल्याला प्राप्त करून दिली आहे. 

ज्यांना विविध सांसारिक अडचनींमुळे पितृपक्षातही श्राद्धकर्म यथाविधी करणे शक्य होत नाही, त्यांनी श्राद्धतिथीच्या दिवशी किंवा तिथी लक्षात नसल्यास सर्वपित्री अमावस्येला एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी द्यावी. एखाद्या वाचनालयाला ग्रंथ भेट द्यावेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यावे. भुकेलेल्यांना अन्न द्यावे. अथवा एक दिवसाचा, एक महिन्याचा, एक वर्षाचा शिधा अर्थात कोरडे धान्य दान करावे. गरजेनुसार वस्त्रदान करावे. हे सर्व करताना पितरांचे स्मरण करावे. त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना करावी. 

शहरी भागात लोकांकडे पुरेसा वेळ नसल्याने ते या मार्गांचा अवलंब करताना आढळतात. या गोष्टीदेखील धर्मशास्त्राला जोडून आहेत. एवढेच काय, तर दान करण्याची आपली क्षमता नसेल, श्राद्धविधीचा खर्च परवडत नसेल, तर मोकळ्या मैदानात किंवा गच्चीत जाऊन आपल्यासाठी रांधलेल्या स्वयंपाकाचा कावळ्याला नैवेद्य दाखवावा आणि त्यांचे मनोभावे स्मरण करून, दोन्ही हात वर करून आपली अमर्थता पितरांसमोर व्यक्त करावी. ते मोठ्या मनाने आपली सेवा मान्य करून आपल्याला शुभाशिर्वाद देतात, असेही धर्मशास्त्रात म्हटले आहे. 

तात्पर्य, आपल्या धर्मात सर्व बाबींचा किती सखोल अभ्यास केला आहे आणि प्रत्येक गोष्टीवर साधे सोपे पर्याय दिले आहेत, यावरून धर्माची विशालता लक्षात येते. त्याचाच लाभ घेऊन आपणही कर्तव्याला जागुया आणि धर्माचरण करूया.

Web Title: Pitru Paksha 2022: Do 'this' remedy on Sarvapitri Amavasya if Shraddha rituals are missed in fifteen days of Pitru Paksha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.