Pitru Paksha 2022: पितृपक्ष झाल्यानंतरही आपल्या जेवणाआधी 'हे' पाच घास काढून ठेवण्याची सवय लावा आणि पुण्य कमवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 03:13 PM2022-09-22T15:13:39+5:302022-09-22T15:14:06+5:30
Pitru Paksha 2022: पितृपक्षात काकग्रास किंवा गोग्रास आपण काढून ठेवतोच, मात्र हा संस्कार पितृपक्षापुरता नाही तर पुढेही सुरु ठेवावा; का आणि कोणासाठी ते जाणून घ्या!
आपण स्वयंपाकघरात रोज अन्न शिजवतो, त्यासाठी कापणे, चिरणे, कुटणे, दळणे, उकळणे इ. क्रिया नित्यनेमाने घडत असतात. त्या क्रिया करत असताना अनेक जीवजिवाणूंची हत्या आपल्या हातून नकळतपणे घडत असते. त्या जीवांच्या हत्येचे पातक लागू नये, याचाही सखोल विचार हिंदू धर्मशास्त्राने केला आहे व त्यावर पाच यज्ञांचे प्रायश्चित्त सांगितले आहे. ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ आणि नृयज्ञ!
सद्यस्थितीत हे पंचयज्ञ कोणाला माहित नाहीत व कोणी करतही नाहीत. त्यावर धर्मशास्त्राने पर्याय दिला आहे, तो म्हणजे भगवंताला नैवेद्य दाखवण्याचा. आपण जेवणापूर्वी देवाला नैवेद्य अर्पण केला असता पंच यज्ञाचे फळ प्राप्त होते.
याशिवाय `अन्य लघुपायोस्ति भूतले' अर्थात पंचमहायज्ञाचे प्रतीक म्हणून पाच घास ठेवावेत किंवा प्रतिनिधि म्हणून अग्नीला तूप समर्पण करावे असेही शास्त्राने सुचवले आहे. जेवणाआधी गोग्रास म्हणजे शिजवलेले अन्न गायीला घालावे. पितृकार्यात काकबळी अर्थात कावळ्याला नैवेद्य दिल्याशिवाय जेवले जात नाही, असा नियम आहे. शिवाय निसर्गातील अन्य जीवजिवांना तृप्त करून मग आपण जेवावे, असा उदात्त विचारदेखील या पाच नैवेद्यामागे आहे.
त्याशिवाय पाच नैवेद्य दाखवण्यामागे लौकिक फायदेही पुष्कळ आहेत. ती एक प्रकारे विषपरीक्षेचे साधनच आहे. पूर्वीच्या काळी राजा महाराजांना अन्नातून विष देण्याचे प्रकार होत असत. अन्नात विष असेल तर आपण ठेवलेल्या घासावर बसलेल्या माशा मरतील वा मृतवत होतील. जेवणापूर्वी अग्नीला घास समर्पित करतो आणि देवता अग्निमुखाने घास भक्षण करतात. ही आपली देवपूजा होते. पण अन्न जर विषारी असेल तर निळसर ज्वाला निर्माण होईल. सर्वत्र दुर्गंधी पसरेल.
काकबळी अर्थात कावळ्याला नैवेद्य देण्याचा फायदा असा, की कावळा कधीही विषारी अन्न खात नाही. त्यामुळे भोजन करणार सावध होतो. आणखीही काही परीक्षा आहेत, जसे की माकडाला जर असा विषारी घास दिला, तर माकड वाकडे तिकडे तोंड करते, उसळ्या मारते, चंचल बनते. चकोर पक्ष्याला असा विषारी घास मिळाला तर त्याचे डोळे लाल होतात. आयुर्वेदात या गोष्टींचे निरुपण आले आहेत.
भोजनात विष नसले तरी ताटापुढे घास ठेवण्याचा आणखीही एक फायदा आहेच. जर त्या ठिकाणी मुंग्या इतस्तत: हिंडत असतील, तर त्या जेवणाच्या ताटात येण्याची शक्यता असते. जर पाच घास ताटापुढे ठेवलेले असतील, तर मुंग्या घासाभोवती गोळा होतील. जेवणाच्या ताटात येणार नाहीत. गो ग्रास नियमित ठेवला पाहिजे. त्यामुळे गायीचे पालन पोषण होते. घास ठेवल्यावरही आचमन करून भोजन सुरू करावे. `अश्नीयाद् आचम्य प्राङमुख शुचि:' आचमनाने तोंडात ओलावा निर्माण होतो व चावलेला घास गिळणे सहज शक्य होते. म्हणून जेवण वाढल्यावर लगेच जेवायला सुरुवात न करता हे पाच घास ताटाभोवती काढून परमेश्वराचे स्मरण करावे. श्लोक म्हणावा आणि मग जेवायला सुरुवात करावी.
या गोष्टींवरून हिंदू धर्मात किती सुक्ष्म गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आपणही हे धर्माचण करताना जेवणाआधी ताटाभोवती अगदी छोटे छोटे पाच घास ठेवण्यास प्रारंभ करूया आणि जेवणानंतर ते घास आपणच उचलून, पशू पक्ष्यांना घालून, आपल्या घासातला घास दिल्याचे पुण्य साठवूया.