पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘ही’ कामे अवश्य करा; पूर्वज प्रसन्न होतील, शुभ करतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 02:54 PM2023-10-12T14:54:26+5:302023-10-12T14:55:19+5:30
Sarvapitri Amavasya 2023: सर्वपित्री अमावास्येला आपल्याकडे विशेष महत्त्व असून, या दिवशी काही गोष्टी करणे चांगले मानले जाते. जाणून घ्या...
Sarvapitri Amavasya 2023: १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. वर्षभरात किंवा पितृपक्षात पूर्वजांसाठी कोणतेही कार्य केले नाही, तरी सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध, तर्पण विधी केल्यास तो पितरांपर्यंत पोहोचतो. त्याने पूर्वज समाधानी होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. वारसांची, कुटुंबातील सदस्यांना पाहिल्यानंतर सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी पूर्वज पुन्हा पितृलोकाची यात्रा प्रारंभ करतात, अशी लोकमान्यता आहे. सर्वपित्री अमावास्येला प्रामुख्याने पौर्णिमा, चतुर्दशी आणि ज्या मृतांच्या निधनाची तिथी माहिती नाही, अशा सर्वांच्या नावाने श्राद्ध कार्य केले जाते. सर्वपित्री अमावास्येला काही गोष्टी अवश्य कराव्यात असे सांगितले जाते. असे केल्यास पूर्वज प्रसन्न मनाने शुभाशिर्वाद देतात, अशी मान्यता आहे.
पूर्वजांच्या नावाने तर्पण विधी करून त्यांना अन्न, जल अर्पण केले जाते. श्राद्ध कार्यात किंवा एकूणच अनावधानाने घडलेल्या चुकांबाबत पूर्वजांची क्षमायाचना या दिवशी करावी, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. पूर्वजांच्या नावाने श्रद्धापूर्वक श्राद्ध कार्य, तर्पण विधी करावेत. पूर्वजांचा जेवणाचे पान काढून ठेवल्यावरनंतरच भोजन ग्रहण करावे, असे सांगितले जाते.
पितृदोषाच्या समस्येचा भविष्यकाळात सामना करावा लागू शकतो
सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी केस कापू नयेत, असे सांगितले जाते. कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यावर दिवस-वार करतेवेळी केस दान करण्याची प्रथा, परंपरा असली, तरी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी केस कापू नये, असे शास्त्र सांगते. याशिवाय नखे कापू नयेत, असे सांगितले जाते. असे केल्यास पूर्वज नाराज होऊन त्यांची अवकृपा संभवते. पितृदोषाच्या समस्येचा भविष्यकाळात सामना करावा लागू शकतो, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
गरजूंना यथाशक्ती मदत करावी
सर्वपित्री अमावास्येला गरजूंना मदत करावी. त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये. सर्वांशी चांगला व्यवहार ठेवावा. या दिवशी एखादा भिक्षुक आपल्या द्वारी भिक्षा मागण्यासाठी आल्यास त्याला रिकाम्या हाती परत पाठवू नये. यथाशक्ती भिक्षा द्यावी. भिक्षुकाला उपयोगी वस्तूच्या दानाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येला कोणाचाही अपमान करू नये. याशिवाय घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये. प्रत्येक जीवाचा आदर करावा, असे सांगितले जाते.
प्रत्येक जीवाचा आदर करावा
सर्वपित्री अमावास्येला केवळ एखाद्या व्यक्तीचा नाही, तर प्राणी, पशु, पक्षी यांचाही आदर करावा. त्यांना तुच्छतेची वागणूक देऊ नये. शक्य असल्यास अन्न, पाणी द्यावे, असे सांगितले जाते. आपल्याकडे कावळ्याला पूर्वजांचे प्रतीक मानले जाते. पूर्वज कावळ्याच्या रुपात येऊन वारसांनी दिलेले अन्न, पाणी ग्रहण करतात. म्हणून काकबळी काढण्याची पद्धत रुढ आहे. कावळ्याने काकबळी ग्रहण केल्यास पूर्वजांनी तो ग्रहण केला. पूर्वजांची कृपादृष्टी आणि शुभाशिर्वाद लाभले, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच पूर्वजांच्या नावाने काढलेले पान गोमातेला देण्याची प्रथा आहे. याशिवाय श्वानालाही अन्न, पाणी द्यावे, असे सांगितले जाते.
दरम्यान, कुटुंबातील वडिलधाऱ्या, ज्येष्ठ व्यक्तींना नेहमी मान ठेवावे. त्यांना आदराची वागणूक द्यावी, असे सांगितले जाते. हेच संस्कार सर्वपित्री अमावास्येला विशेष करून पाळावेत, असे म्हटले जाते. कुटुंबात दोन व्यक्तींमध्ये खटके उडू शकतात. मात्र, अशावेळी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान होत नाही ना, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले जाते. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा अपमान केल्यास पूर्वज नाराज होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींची अवहेलना होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांची आवड जोपासावी, असे म्हटले जाते.