पितृपक्ष: सूतक आलं असेल तर सर्वपित्री अमावास्येला पितरांचं पान ठेवता येतं का? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 06:31 PM2023-10-13T18:31:01+5:302023-10-13T18:31:27+5:30
Pitru Paksha Sarvapitri Amavasya 2023: सर्वपित्री अमावास्येला घरात सूतक असेल तर श्राद्ध विधी करून पितरांचे पान ठेवता येते का? याबाबत शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत.
Pitru Paksha Sarvapitri Amavasya 2023: मराठी वर्षांतील महत्त्वाचा मानला गेलेला पितृपक्ष आहे. शनिवारी सर्वपित्री अमावास्या असणार आहे. सर्वपित्री अमावास्येला पितरांच्या, पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आपल्याकडे आहे. सर्वपित्री अमावास्येला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते. मात्र, कारणपरत्वे लगतच्या दिवसांमध्ये घरामध्ये सूतक आले असेल तर सर्वपित्री अमावास्येला पितरांसाठी पान ठेवावे का? याबाबत शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ शुक्रवार, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्रौ ०९ वाजून ५० मिनिटांनी होत आहे. सर्वपित्री अमावास्येची सांगता दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी रात्रौ ११ वाजून २४ मिनिटाला होत आहे. भारतीय संस्कृतीत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्येला केले जाणारे श्राद्ध विधी करावेत, असे म्हटले जात आहे. सर्वपित्री अमावास्येला पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवले जाते. मात्र, सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सूतक आले असेल तर पान ठेवावे का? अशी शंका विचारली जाते.
सूतक आले असेल तर सर्वपित्री अमावास्येला पितरांचे पान ठेवता येते का
तज्ज्ञांच्या मते आणि शास्त्राधारानुसार, सर्वपित्री अमावास्येला किंवा एकूणच पितृपक्षात श्राद्ध कार्य केले जाते. हा एक प्रकारचा विधीच असतो. ज्या माध्यमातून आपण पूर्वजांचे, पितरांचे श्रद्धापूर्वक स्मरण करत असतो. सूतक लागलेले असताना कोणत्याच प्रकारचे विधी केले जात नाहीत. त्यामुळे सर्वपित्री अमावास्येला सूतक आले असेल पितरांसाठी पान ठेवले जात नाही, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येला पितृपक्षाची सांगता होत असली तरी महालयाची समाप्ती होत नाही. शास्त्रानुसार, सूर्य वृश्चिक राशीत जाईपर्यंत महालय काळ असतो. १६ नोव्हेंबर रोजी सूर्य तूळ राशीतून वृश्चिक राशीत जाणार आहे. त्यामुळे सर्वपित्री अमावास्येला असलेल्या सूतकाचे दिवस-वार संपले की, १६ नोव्हेंबरपर्यंत श्राद्ध विधी करणे, पान ठेवणे आदी कार्ये केली जाऊ शकतात, असेही सांगितले जाते.
दरम्यान, सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे. त्यामुळे या दिवशी श्राद्ध विधी करावे का, असा प्रश्न विचारला जातो. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी ग्रहण लागणार असून, मध्यरात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष आहे. ग्रहणाचा सूतक काळ १२ तास आधी सुरू होतो. त्यामुळे श्राद्ध विधी करण्याबाबत संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जाते. सूर्यग्रहण लागणार त्यावेळेस भारतात रात्र असेल. त्यामुळे ते भारतातून पाहिले जाऊ शकत नाही. तसेच श्राद्ध विधींसाठी सूतक काळ ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे या काळात श्राद्ध, तर्पण विधी केले जाऊ शकतात, असे म्हटले जाते. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी विधी करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये, असे काहींचे मत असल्याचे सांगितले जाते.