पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध महत्त्वाचे का मानले जाते? महाभारतात विशेष उल्लेख; पाहा, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:44 PM2023-10-10T15:44:17+5:302023-10-10T15:44:58+5:30
Pitru Paksha Chaturdashi Shradh 2023: पितृपक्षातील चतुर्दशी श्राद्ध विशेष असल्याचे म्हटले जाते. शास्त्र काय सांगते? जाणून घ्या...
Pitru Paksha Chaturdashi Shradh 2023:पितृपक्षातील अखेरचे काही दिवस आहेत. प्रतिपदेपासून ते अमावास्यापर्यंत पितृपक्षातील प्रत्येक तिथीला श्राद्ध, तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा आहे. पितरांचे, पूर्वजांचे शुभाशिर्वाद मिळावे, त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी, यासाठी स्मरण तसेच श्राद्ध तर्पण विधी केला जातो. पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्येच्या आधी चतुर्दशी तिथीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. महाभारतात, पुराणात याबाबत काही उल्लेख आढळतात. जाणून घेऊया...
पितृपक्षात पंचमी, अष्टमी, नवमी या तिथींप्रमाणे चतुर्दशी तिथीला विशेष महत्त्व असल्याचे शास्त्रांत नमूद करण्यात आले आहे. यंदा १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पितृपक्षातील चतुर्दशी श्राद्ध आहे. चतुर्दशी तिथी एका वेगळ्या कारणासाठी विशेष आणि महत्त्वाची ठरते. चतुर्दशी तिथीला केवळ अनैसर्गिकरित्या मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करावा, असे शास्त्र सांगते. महाभारतातील अनुशासन पर्व आणि कूर्म पुराण या ग्रथांमध्ये याबाबत उल्लेख आल्याचे सांगितले जाते.
गया, बद्रीनाथ येथे केलेले श्राद्ध कार्य शुभलाभदायक
भाद्रपद वद्य चतुर्दशीला केवळ आणि केवळ शस्त्राने, सर्पदंश, आत्महत्या, अपघाती मृत्यू, विषबाधा यांसारख्या अकाली मृत्यू म्हणजचे अनैसर्गिकरित्या मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करावेत, असे शास्त्र सांगते. गया, बद्रीनाथ यांसारख्या ठिकाणी अकाली मृत्यू आलेल्या व्यक्तींच्या नावाने केलेले श्राद्ध कार्य शुभलाभदायक आणि पुण्याचे ठरते, असे सांगितले जाते.
विशेष श्राद्ध तर्पण विधी करावेत
एखाद्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अकाली किंवा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या नावाने विशेष श्राद्ध तर्पण विधी करावेत. एक नमूद करण्याची गोष्ट म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचे अनैसर्गिकरित्या निधन कोणत्याही तिथीला झाले असले, तरी त्यांच्या नावाने करावयाचे श्राद्ध कार्य हे केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे, असे शास्त्र सांगते. अन्य सामान्यपणे निधन झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध कार्य हे त्या त्या तिथीला करावयाचे असते. अनैसर्गिकरित्या मृत्यू आलेल्या व्यक्तींचे श्राद्ध करण्यासाठी चतुर्दशीचा दिवस राखून ठेवण्यात आले आहे. अकाली मृत्यू आल्यामुळे अशा व्यक्तींच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. अशा पूर्वजांचा आत्मा पितृलोकांत जात नाही, असे मानले जाते. अशा पूर्वजांच्या आत्म्याला गती मिळावी, यासाठी विशेष श्राद्ध तर्पण विधी करावेत. याशिवाय वस्तूंचे दानही यथायोग्य, यथाशक्ती करावे, असे सांगितले जाते.
चतुर्दशी तिथीचे श्राद्ध सर्वपित्री अमावास्येला करावे
कुटुंबातील ज्या व्यक्तींचे निधन चतुर्दशी तिथीला झाले आहे, त्यांच्या नावाने सर्वपित्री अमावास्या तिथीला श्राद्ध कार्य करावे, असे सांगितले जाते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन शुद्ध किंवा वद्य चतुर्दशी तिथीला नैसर्गिकरित्या म्हणजे सामान्यपणे झाले असेल, तर अशा पूर्वजांचे श्राद्ध कार्य चतुर्दशी तिथीला न करता सर्वपित्री अमावास्येला करावे, असे शास्त्र सांगते.