Pitru Paksha 2023: पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध केल्याने कोणते लाभ होतात ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 04:36 PM2023-09-30T16:36:13+5:302023-09-30T16:38:33+5:30
Pitru Paksha 2023: पितृपक्षात प्रतिपदा ते अमावस्या या पंधरा दिवसातील प्रत्येक तिथीचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि तिथीनुसार श्राद्धविधी केल्याचे लाभ आहेत, कसे ते पहा.
मनुष्यमात्रावर देव, ऋषि, पितृ यांची अशी तीन ऋणे असतात. यापैकी श्राद्ध करून आपण पितृऋण फेडीत असतो. कारण ज्या मातापित्यांनी आपल्याला आयुरारोग्याच्या आणि सुख सौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्या ऋणातून अल्पांशाने तरी मुक्त होण्याचा आपण प्रयत्न नाही केला, तर आपण जन्माला येऊन व्यर्थ जीवन जगलो असा अर्थ होतो.
पितृऋणातून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो असे नाही. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मुख्यतिथीला, सर्वात सहज प्राप्त होणाऱ्या जल, तीळ, तांंदूळ, कुश आणि फुले यांनी श्राद्ध करता येते. एवढे केल्याने आपल्यावरचा पितृऋणभार हलका होतो. यासाठी अनादि कालापासून चालत आलेला हा श्राद्धविधी आहे. श्राद्ध केल्याने कोणती फलप्राप्ती होते, याविषयी स्मृतिचंद्रिकेत एक श्लोक आहे -
आयु: पुत्रान् यश: स्वर्ग कीर्तिं पुष्टिं बलं श्रिय:
पशून् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात पितृपूजनात् ।।
आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, धन, धान्य या गोष्टी पितृपूजनाने, म्हणजेच श्राद्ध केल्याने प्राप्त होतात. म्हणजे पितरांच्या संतुष्टतेने श्राद्धकर्त्याचा विकास होतो. त्यातही श्राद्धविधीचे तिथीनुसार मिळणारे फळ धर्मशास्त्रात दिले आहे. ते पुढीलप्रमाणे-
प्रतिपदा - उत्तम पुत्र, पशु वगैरेची प्राप्ती
द्वितीया - कन्या, संपत्ती
तृतीया - अश्वप्राप्ती (आजच्या गाळात यशाची घोडदौड असा अर्थ घेता येईल)
चतुर्थी - पशुधन, खाजगी वाहन, सुबत्ता
पंचमी - मुलांचे यश
षष्ठी - तेजस्वी संतान
सप्तमी - शेती, जमीनीची प्राप्ती, लाभ
अष्टमी - व्यापारात लाभ
नवमी - नोकरी उद्योगात भरभराट
दशमी - सुबत्ता, वैभव
एकादशी - ऐहिक सुखाचा लाभ
द्वादशी - सुवर्णलाभ
त्रयोदशी - पद, प्रतिष्ठा
चतुर्दशी - सर्वसामान्य समाधानी जीवन
अमावस्या - सर्व इच्छांची पूर्ती
चतुर्दशी तिथी वगळता दशमीपासूनच्या तिथी श्राद्धकर्मास प्रशस्त मानल्या आहेत. या सर्व तिथी वद्य पक्षातील असून पक्षपंधरवड्यात विशेष फळ देणाऱ्या आहेत. वरील लाभांची यादी वाचली की लक्षात येईल, एकूणच श्राद्ध ही संकल्पना केवळ पितरांना सद्गती देणारी नाही, तर आपल्यालाही सन्मार्गाला लावणारी आहे.