Pitru Paksha 2023: मृत व्यक्तीच्या वर्षश्राद्धाआधी भरणी श्राद्ध करावे की नाही, याबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 12:38 PM2023-10-02T12:38:27+5:302023-10-02T12:38:43+5:30
Pitru Paksha 2023: आज भरणी श्राद्ध, पण ते कोणी करावे आणि कोणी करू नये याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो, त्यावर हे शास्त्रशुद्ध उत्तर!
पितृपक्षात ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल त्याला महाभरणी असे नाव आहे. यंदा २ ऑक्टोबर रोजी भरणी श्राद्ध करायचे आहे. पण कोणी? हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. हे श्राद्ध सर्वांनी करून चालत नाही.
मृत व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले असेल तरच पितृपक्षात भरणी नक्षत्राला भरणी श्राद्ध करता येते. अन्यथा वर्ष श्राद्ध होण्याआधी पितृ पक्ष आला असता भरणी श्राद्ध करू नये असा शास्त्र संकेत आहे. तसेच वर्षश्राद्धाच्या पाठोपाठ पितृपक्ष आला असता भरणी नक्षत्रावर पुनश्च श्राद्ध विधी केले असता हरकत नाही, उलट त्याचे अधिक पुण्य मिळते.
भरणी श्राद्ध केल्याने महापुण्य मिळते असे म्हणतात. कारण हे श्राद्ध केले असता मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो. त्यामुळे श्राद्धविधी केल्याचे पुण्य पदरात पडते. परंतु ते वर्षश्राद्धा नंतरच का करावे तर वर्ष श्राद्ध झाल्यावरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते. त्या आत्म्याला पितरांमध्ये स्थान मिळते आणि त्या पितरांची पूजा पितृपक्षात करता येते.
गरुडपुराण अन्वष्टका भरणी आदी श्राद्धे वर्षश्राद्धानंतरच करावी असे सांगते. तेथेच भरणीबाबत निर्णय करताना पुढे पित्याचे भक्तीस्तव कोणी भरणीश्राद्ध वर्षापुर्वी केले तरी दोषावह नाही असेही म्हटले आहे. अर्थात केले तरी ते चूक नाही, मात्र त्याला शास्त्राधार नाही.
थोडक्यात भरणी श्राद्ध मृत व्यक्तीच्या पहिल्या वर्षी न करता दुसऱ्या वर्षांपासून करावे, हे निश्चित!