Pitru Paksha 2023: श्राद्धविधी वगळता दक्षिण दिशेला इतर कोणतेही धर्मकार्य का करत नाहीत ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 01:04 PM2023-10-02T13:04:21+5:302023-10-02T13:04:40+5:30

Pitru Paksha 2023: पितृपक्षाच्या निमित्ताने दक्षिण दिशेचे महत्त्व आणि धर्मकार्यासाठी ती निषिद्ध का? सविस्तर वाचा!

Pitru Paksha 2023: Know Why South Direction Does No Other Dharma Karya Except Shraddha Vidhi! | Pitru Paksha 2023: श्राद्धविधी वगळता दक्षिण दिशेला इतर कोणतेही धर्मकार्य का करत नाहीत ते जाणून घ्या!

Pitru Paksha 2023: श्राद्धविधी वगळता दक्षिण दिशेला इतर कोणतेही धर्मकार्य का करत नाहीत ते जाणून घ्या!

googlenewsNext

'दक्षिण' हा शब्द वाम किंवा डावा या सापेक्षेने शुभ आहे. असे असतानाही दक्षिण दिशेविषयी समाजाच्या मनात दृढ असलेला समज सहजासहजी दूर होण्यासारखा नाही. प्रत्येक दिशेला एका लोकपालाची नेमणूक झालेली असते. त्यानुसार दक्षिण दिशेस यम लोकपालाची नेमणूक असते. वास्तविक यमाविषयी एकप्रकारचा तिटकारा व घृणा मनात असल्यामुळे दक्षिण दिशा ही त्याज्य समजली जाऊ लागली.

ही मजल इथपर्यंत पोहोचलेली असते की, यज्ञप्रक्रियेत दक्षिण दिशेचा नुसता उल्लेख आला तरी तो टाळून 'अवाचि' (बोलून न दाखवण्याजोगी) अशा पदाने तिचा उल्लेख केला जातो. खऱ्या अर्थाने विचार केल्यास यम आणि दक्षिण दिशा यांना अशुभ किंवा त्याज्य समजण्यासारखे असे काही आहे का? असा मोठा प्रश्न आहे. यमाने आपले कार्य केले नसते तर, केवढी भयानक आपत्ती आली असती, याचा नुसता विचारही अंगावर शहारा आणणारा आहे. 

दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असेही म्हटले जाते. कारण आपला शेवटचा प्रवास या दिशेने होतो. म्हणून शवाचे पाय दक्षिण दिशेने ठेवले जातात. यावरून जिवंतपणी दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये हा समज रूढ झाला. परंतु, ज्याचा देह तगून राहण्यास निकामी झालेला आहे किंवा ज्याचे इहलोकीचे त्या जन्मापुरते कार्य संपले आहे, अशा जिवांना आपल्याकडे खेचून घेऊन त्यांना आपल्यात सामाविष्ट करणारा, त्याच्या दोषाचे शुद्धीकरण करणारा यम तिरस्करणीय कसा? 

यम म्हणजे नियमन किंवा नियंत्रण. जगातील प्रत्येक बारीक सारिक क्रीयेत नियमनाची आवश्यकता असते. म्हणून यज्ञकर्मात विशेषत: शांतीकर्मात यमाचा आवर्जून उल्लेख असतो व त्याची पूजा असते. कोणत्याही कर्माची सुरुवात होताना कर्त्याचे मुख पूर्वेकडे असते व कर्माचा प्रारंभ दक्षिणेकडे करून सांगता उत्तरेकडे होते. पुण्याहवाचनात पहिला गणपतीचा विडा, दुसरे दोन वरुणाचे, चौथा मातृकाचा, इ क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे असतो. दक्षिणेकडे यमराज व त्याचा लोक (यमलोक) असतो. उत्क्रांतीची वाटचाल दक्षिणेकडून उत्तरेकडे असते व शेवटी लय दक्षिणेत होतो. 

पृथ्वीच्या उदरातील महाचुंबक दक्षिणोत्तर असाच आहे. म्हणून रात्री झोपताना मस्तक दक्षिणेकडे व पाय उत्तरेकडे करून झोपल्यास चांगली झोप येते असा समज आहे. असे असताना दक्षिण दिशेस अतिपावित्र्य असल्यामुळे ती गैरसमजुतीने अपवित्र, अशुभ समजली जाते. ज्यावेळी एखादी व्यक्ती कडकडीत सोवळ्यात असते तेव्हा इतर लोक गैरसमजुतीने तिला स्पर्श होताच स्वत: स्नान करतात, तशातलाच प्रकार दक्षिण दिशेबाबत झाला आहे. 

शंकरासारख्या अतिपवित्र देवतेच्या पिंडीचे तोंड दक्षिणेकडे असते. दक्षिणेकडे तोंड करून घर असू नये असा संकेत आहे. कारण ती अतिपवित्र दिशा असल्याने घराचे पावित्र्यही तितकेच ठेवावे लागते. त्यात कसूर होण्यापेक्षा सरळ दक्षिणाभिमुख घर असूनच नये असा बिनागुंतागुंतीचा संकेत रूढ झाला आहे. प्रत्यक्ष ज्याचे घर दक्षिणाभिमुखी आहे, त्याचे अनुभव विचारात घेतले जावेत.

दक्षिण दिशेस मार्जन केल्यावर हात धुण्याची पद्धत आहे. वास्तविक मार्जन करण्यापूर्वी हात धुण्याची आवश्यकता असते व केल्यानंतरही! हळू हळू काही रूढी इतक्या दृढ होतात, की त्याचे शास्त्रात रूपांतर कधी होते हेही कळत नाही. 

धार्मिक मान्यतेनुसार पितृ लोक दक्षिण दिशेला आहे. यामुळे संपूर्ण श्राद्ध विधी करताना दक्षिण दिशेकडे तोंड करावे. मात्र अन्य धार्मिक कृत्य करताना दक्षिण दिशेकडे तोंड करू नये असे शास्त्रकार सांगतात. 

Web Title: Pitru Paksha 2023: Know Why South Direction Does No Other Dharma Karya Except Shraddha Vidhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.