पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण, सूतक काळात श्राद्धविधी करावा का? पाहा, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 03:19 PM2023-10-05T15:19:57+5:302023-10-05T15:20:51+5:30
Surya Grahan On Sarva Pitru Amavasya 2023: सर्वपित्री अमावास्येला विशेष महत्त्व असून, याच दिवशी सूर्यग्रहण असल्याचे श्राद्धविधी करण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जाणून घ्या...
Surya Grahan On Sarva Pitru Amavasya 2023:पितृपक्ष सुरु असून, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. मात्र, यंदाच्या सर्वपित्री अमावास्येला कंकणाकृती सूर्यग्रहण लागणार आहे. सन २०२३ मधील हे शेवटचे सूर्यग्रहण आहे. सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण हा विशेष अनुकूल योग मानला जात नाही. ग्रहण काळात काही धार्मिक विधी, कार्ये केली जात नाहीत. अशातच सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध तर्पण विधी करावा का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया...
भाद्रपद अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखली जाते. सर्वपित्री अमावास्येला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी सर्वपित्री अमावास्येला ग्रहण योग आहे.
सर्वपित्री अमावास्या कधी?
सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ शुक्रवार, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्रौ ०९ वाजून ५० मिनिटांनी होत आहे. सर्वपित्री अमावास्येची सांगता दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी रात्रौ ११ वाजून २४ मिनिटाला होत आहे. भारतीय संस्कृतीत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्येला केले जाणारे श्राद्ध विधी करावेत, असे म्हटले जात आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी ग्रहण लागणार असून, मध्यरात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष आहे. ग्रहणाचा सूतक काळ १२ तास आधी सुरू होतो. त्यामुळे श्राद्ध विधी करण्याबाबत संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे.
ग्रहण काळात श्राद्धविधी करावेत का?
भारतात सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जाते. सूर्यग्रहण लागणार त्यावेळेस भारतात रात्र असेल. त्यामुळे ते भारतातून पाहिले जाऊ शकत नाही. तसेच श्राद्ध विधींसाठी सूतक काळ ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे या काळात श्राद्ध, तर्पण विधी केले जाऊ शकतात, असे म्हटले जाते. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी विधी करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये, असे काहींचे मत असल्याचे सांगितले जाते. पितृ पक्षात सर्वपित्री अमावस्येला सर्वाधिक महत्त्व आहे. या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे श्राद्ध पूर्ण विधीपूर्वक करावे. सर्वपित्री अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचे महत्त्व अधिकच वाढते. पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद राहतील, यासाठी श्राद्ध पूर्ण नियमाने करावे, असे सांगितले जाते.