पितृपक्ष: दत्तगुरु उपासनेने लाभ, पितृदोषावर ‘हा’ मंत्र अत्यंत प्रभावी; जप करा, कृपा मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:30 PM2024-09-18T13:30:06+5:302024-09-18T13:39:53+5:30
Pitru Paksha 2024: पितृपक्ष सुरू असून, या कालावधीत दत्तगुरुंच्या मंत्रांचा शक्य तितका जप, नामस्मरण करणे लाभदायक मानले गेले आहे. जाणून घ्या...
Pitru Paksha 2024:चातुर्मासातील विशेष मानल्या गेलेल्या पितृपक्षास सुरुवात झाली आहे. १८ सप्टेंबर २०२४ ते ०२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पितृ पंधरवडा असणार आहे. या काळात पितरांचे स्मरण करून श्राद्ध विधी आणि तर्पण केले जाते. पितरांची कृपा लाभावी, यासाठी पितृपक्षात विविध गोष्टी केल्या जातात. पितृऋण फेडणे हे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहेत. पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. काही मान्यतांनुसार, या कालावधीत दत्तगुरुंची केलेली उपासना लाभदायक तसेच पितृदोषावर उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
माता-पिता, निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच 'श्राद्ध'. 'श्रद्धा' या शब्दापासून 'श्राद्ध' हा शब्द निर्माण झाला आहे. ईहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने 'केले जाते, ते 'श्राद्ध' होय. पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे, आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त इच्छांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून, त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे यासाठी श्राद्ध महत्त्वाचे आहे.
एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता वर्षभर तृप्त राहतात
एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त राहतात. श्राद्धविधी स्वतः करायचा असतो. गुरुजी मिळाले नाहीत, तर श्राद्ध-संकल्पविधीच्या पोथ्या, पुस्तके मिळतात. त्या आणून प्रत्येकाने श्राद्ध-संकल्पविधी पाठ करावा. मुलगी, पत्नी, आई आणि सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. या पितृपक्षाच्या काळात दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने, पितृपक्षात प्रति दिन दत्ताचा जास्तीत जास्त नामजप करावा, असे सांगितले जाते.
पितृपक्षातील दत्त उपासना
पूर्वीप्रमाणे सध्याच्या काळात आग्रहपूर्वक श्राद्ध-पक्ष वगैरे केले जात नाही, असेच पाहायला मिळते. अनेकांना पितरांच्या अतृप्तीमुळे किंवा पितृदोषामुळे विविध प्रकारचे त्रास होताना दिसतात. पुढे पितृदोष येण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून यथाशक्ती दत्तगुरुंची उपासना, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा शक्य तितका जप करावा, असे म्हटले जाते. ‘श्री गुरुदेव दत्त’ या मंत्रासोबत कुलदेवतेचे नामस्मरण करावे. गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालाव्यात. दत्त मंदिरात बसून एक ते दोन माळा जप करावा, असे म्हटले जाते.
पितृपक्षात दत्तगुरुंच्या नामजपाचे महत्त्व
दत्तगुरुंच्या नामस्मरणाने निर्माण होणारी शक्ती सर्व बाजूंनी संरक्षण कवच तयार करते. ते आपल्या नामजपाचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते तसेच इतर घटकांबरोबरच आपल्या आध्यात्मिक स्तरावर अवलंबून असते. दत्तगुरुंच्या नामजपामुळे पितरांना गती मिळते. पुढे त्यांच्या कर्मानुसार ते पुढच्या जगात जातात. यामुळे साहजिकच त्यांच्याकडून होणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी होते. परंतु, आपल्याला जितका शक्य आहे, तितका जप अवश्य करावा. अखंड नामस्मरणाचा संकल्प करून जप केल्यास उत्तम.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
|| श्री गुरुदेव दत्त ||