Pitru Paksha 2024: पितरांना दाखवलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो, हे कसे ओळखायचे? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:33 AM2024-09-24T11:33:05+5:302024-09-24T11:35:03+5:30
Pitru Paksha 2024: पितृपक्षात श्राद्धविधीची सांगता पितरांना नैवेद्य अर्पण करण्याने होते, पण दिलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो का? याचे पुराणात दिलेले उत्तर वाचा.
मत्स्यपुराणात श्राद्धासंबंधी एक प्रश्न उपस्थित केला आहे, तो असा की, ब्राह्मणाने खाल्लेले किंवा होमाग्नीत अर्पण केलेले अन्न मृतात्म्यांना कसे पोहोचते? कारण मृत्यूनंतर ते आत्मे पुनर्जन्म घेऊन दुसऱ्या देहात आश्रय घेतात. या प्रश्नाचे उत्तरही तिथेच आहे. ते असे-
वसु, रुद्र व आदित्य या पितृदेवतांच्या द्वारे ते पितरांना पावते किंवा त्या अन्नाचे भिन्न पदार्थात, म्हणजे अमृत, तृण, भोग, हवा इ. पदार्थात रूपांतर होऊन पितर ज्या योनीत असतील, त्या योनीत त्या त्या रूपाने वरील देवतांद्वारे अन्न पोहोचते. म्हणजे स्वर्गात देवरूप असल्यास अमृताने, अंतरिक्षात गंधर्वरूप असल्यास भोगाने, पशुयोनीत असल्यास जलाने, दानव योनीत असल्यास मांसाने, प्रेतरूप असल्यास रक्ताने व मान असल्यास अन्नरूपाने अन्न मिळते.
Pitru Paksha 2024: अविधवा नवमी तिथी का महत्त्वाची? त्या तिथीला कोणाचे श्राद्धविधी करावेत? वाचा!
श्राद्धाच्या वेळी योगी, सिद्धपुरुष व देव हे भिन्न रूपे घेऊन पृथ्वीवर हिंडत असतात व ब्राह्मणाच्या रूपाने श्राद्धविधीचे निरीक्षण करायला येतात, असे वायु, वराह व विष्णु पुराणात सांगितले आहे. त्याचप्रमाणे श्राद्धाच्या वेळी योगी व संन्यासी याला भोजन दिल्यास, पितर अत्यंत तृप्त होतात, असे मार्कंडेय पुराणात सांगितले आहे.
थोडक्यात, आपण अनन्यभावे शरण जाऊन जसा देवाला नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे देवरूप झालेल्या पितरांना दाखवलेला नैवेद्य येनकेनप्रकारेण अर्थात कोणत्याही मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचतो. केवळ त्यासाठी नैवेद्य अर्पण करतानाचा भाव शुद्ध हवा. हा नैवेद्य पितरांना अर्पण करत आहोत ही भावना हवी. केवळ उपचार म्हणून ठेवलेले पान कावळाही शिवत नाही. आपली सेवा पितरांनी स्वीकारावी ही मनात भावना असेल, तर सुक्ष्म जीवजंतूपासून थेट घारीपर्यंत कोणत्याही रूपाने येऊन पितर त्या नैवेद्याचा स्वीकार करतात.
यासाठीच मनात कोणतेही द्वंद्व न ठेवता, आपल्या पूर्वजांच्या ऋणात राहून आपल्या घासातला घास आठवणीने त्यांच्यासाठी काढून ठेवणे, ही खरी श्रद्धा आणि ती असेल तरच हातून घडलेला विधी म्हणजे श्राद्ध!
Pitru Paksha 2024: पितृपक्षात श्राद्धविधी केल्याने नेमके काय साध्य होते? जाणून घ्या!