Pitru Paksha 2024: पितृ ऋण का आणि कसे फेडायचे? त्यासाठी पितृपक्षाचाच काळ का? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 11:00 AM2024-09-18T11:00:37+5:302024-09-18T11:01:24+5:30
Pitru Paksha 2024: पूर्वजांचे आपल्यावर अनेक उपकार असतात, त्याची जाणीव ठेवून पितृ ऋण फेडणे हे आपले कर्तव्य असते, ते कसे फेडायचे ते जाणून घ्या!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्ष. पितृपक्षात शुभ कार्य निषिद्ध आहेत .ह्या काळात आपले पितर आपल्या कुटुंबातील व्यक्तीस आशीर्वाद द्यायला येतात त्यामुळे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या तिथीस त्यांचे श्राध्द करणे हे आजमितीला हयात असलेल्या कुटुंबातील लोकांचे परम कर्तव्य आहे.
श्राद्ध करायलाच लागते का ? तर हो . आपले तथाकथित मॉडर्न विचार निदान ह्या धर्माने आचरणात आणायच्या गोष्टीत तरी नको यायला. आम्ही काही हे मानत नाही , आम्ही त्यांच्या नावाने एखाद्या संस्थानाला दान करतो ह्या गोष्टी आजकाल सर्रास ऐकायला मिळतात . इतके करता तर मग वडिलोपार्जित संपत्ती सुद्धा एखाद्या धर्मादाय संस्थेला का नाही देत ? ती मात्र हवी त्याच्यासाठी डोकेफोडी करतील पण श्राद्ध करायचे म्हंटले कि नको ते शहाणपण सुचते .
Pitru Paksha 2024: यंदा पितृपक्षाची सुरुवात कधीपासून? पंधरा दिवसांचाच काळ का? वाचा!
आपण ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो , ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला उभे करण्यासाठी वेचले त्यांची आठवण म्हणजेच ते ज्या दिवशी गेले त्या तिथीस श्राद्धकर्म करणे . आपण वडिलोपार्जीत संपत्तीचा उपभोग घेतो , आपल्या पूर्वजांचे म्हणजेच कुळाचे नाव लावतो , आपल्याला वारसाहक्काने मिळालेल्या मग ती भूमी , वाहन , संपत्ती , जमीन जुमला , धन , पैसा , दागदागिने काहीही असो त्याचा हक्काने उपभोग घेतो त्यासाठी एकमेकांच्या उरावर बसून कोर्टाची पायरी चढल्याची कित्येक उदा आज ऐकायला, पाहायला मिळतात . गेलेल्या व्यक्तीचे आणि आपले कदाचित वैचारिक मतभेत सुद्धा जन्मभर असू शक्ती , नाकारत नाही पण आता ती व्यक्ती पुढील प्रवासास गेली आहे . अहो माणूसच गेला त्याच्यासोबत सर्व काही गेले आहे. त्यांचे श्राद्ध करणे हि परमेश्वराने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिली आहे ज्याचे आपण सोने केले पाहिजे , पण आपण करंटे तेही करत नाही.
आपल्या पूर्वजांनी संपत्ती धन त्यांच्या कष्टाने मिळवली, त्याचा ठेवा पुढील पिढ्यांना सुपूर्द केला. नुसतेच धन संपत्ती नाही तर अनेक नाती जोडली , माणसे जोडली , आपली ओळख निर्माण केली , एकत्र सण साजरे केले कुटुंबातील गोडवा जपला आणि पर्यायाने आपल्याही आयुष्याला आकार दिला . मागील पिढ्यात प्रत्येक गोष्ट एकमेकांना विचारून करणे , घरातील मोठ्यांचा मान राखणे ह्या गोष्टी होत्याच , आजकाल कुटुंबे विखुरली आहेत .थोडे विषयांतर होते आहे पण अनेक वेळा आपल्यालाच आपल्या आई वडिलांची तिथी सुद्धा माहित नसते तर आपल्या मुलांना कुठून माहित असणार .वडिलोपार्जित संपत्ती सोबत आपल्या पूर्वजांनी केलेल्या दुषित कर्मांचा वाटा सुद्धा आपल्याला उचलावा लागतो , ह्या सर्वातून गेलेल्या आत्म्याच्या अनेक इच्छा राहिल्या असतील त्यांना शांती मिळावी म्हणून श्राद्ध केले जाते . श्राद्ध न केल्यामुळे घराण्यातील पितृदोष वाढतो हे लक्षात घ्या .
पिढ्यान पिढ्या लोक धर्माचे पालन करत आहेत ते मूर्ख म्हणून नाही तर ते शास्त्राला मान देत आहेत , शास्त्र समजून घेवून एखादी गोष्ट कुणीच नाकारणार नाही पण आपण ते समजून घेण्याच्याही पलीकडे गेलो आहोत . धर्म , रिती शास्त्र एक वेळ बाजूला ठेवूया पण गेलेल्या व्यक्तीच्या प्रती आपल्याला काहीच भावना उरल्या नाहीत ? एक क्षण विचार करून बघा. नक्कीच पटेल.
आपल्या कुटुंबातील गेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध केले नाही तर ते उचित नाही त्याचे परिणाम अगदी लगेच नाही पण कालांतराने निश्चित दिसतात . वडिलो पार्जीत संपत्तीसाठी घरात मतभेद , आयुष्यभर जपलेली नाती सुद्धा त्यासाठी तुटतात , असाध्य आजार , एकटेपणा , कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम नसणे ह्या गोष्टी अनुभवायला येणारच कारण आपण आपल्या कर्तव्यात चुकलो आहोत . आहे ते स्वीकारा कि त्यात लाज वाटते कि काय ? अहो कसला हा आळस ? तुम्हाला घरी कुणी यायला नकोय का? चार लोक घरी आली कि त्यांची उठबस करावी लागते ते कष्ट घ्यायची तयारी नाही. आजकाल तर श्राद्धाचा सर्व स्वयंपाक सुद्धा तयार मिळतो अजून काय हवे ? गेलेल्या माणसाने आपल्यासाठी आयुष्य खर्ची केले आपल्याला माणूस म्हणून घडवले, आपली शिक्षणे , विवाह काय केले नाही आपल्यासाठी ? आणि आजही त्याच्याच जीवावर आहोत आपण ह्याचा क्षणभर सुद्धा विसर नको . त्यांच्यासाठी एक दिवस काय चार तासाचा विधी करू शकत नाही आपण. खरच दुर्दैव आहे.
अनेक जण प्रश्न विचारतात , काही लोक काहीच करत नाहीत श्राद्ध सोडा अगदी रोजची पूजा देवधर्म काहीच नाही तरी त्यांचे सर्व छान चालू आहे ते कसे? कारण त्यांच्या पूर्वजांनी आणि त्यांनी स्वतः अनेक जन्मात जे काही चांगले कर्म केले त्याची चांगली फळे ते भोगत आहेत उपभोगत आहेत पण आज ना उद्या तो संचय संपणार आहे मग पुढे काय ? तो संपला कि ह्या जन्मीची चांगली वाईट फळे त्यांना भोगावी लागतीलच . कदाचित ह्या जन्मात नाही पण ती भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावाच लागेल.
श्राद्ध करायचे नाही म्हणून काहीतरी कारण सांगून पळवाट खरच काढू शकतो का आपण तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. आपल्या धर्माने सांगितलेल्या गोष्टींचे पालन न करणे आणि आपल्याला मनाला येयील तसे वागणे हे योग्य नाहीच नाही. आपल्याला पूर्वजांची तिथीच माहिती नसेल तर निदान सर्वपित्री आमावस्येला तरी पितरांसाठी श्राद्ध करून पान ठेवणे हे आपण केलेच पाहिजे. आपण नाही केले तर आपल्यासाठी आपली मुलेही करणार नाहीत किबहुना त्यांना त्याचे धार्मिक महत्व समजणारच नाही कारण आपल्यालाच ते समजले नाही. आपल्या परंपरांना काहीतरी अर्थ आहे , त्या डावलून आपण काय सिद्ध करणार आहोत? विचार करा . नुसतेच पुण्य मिळवण्यासाठी नाही तर ते न केल्यामुळे पुढे निर्माण होणारे अनर्थ टाळण्यासाठी सुद्धा आहेच.
हे श्राद्ध कर्म करून आपण आपल्या पितरांच्या आशीर्वादाचे धनी होणार आहोत पण त्याहीपेक्षा कित्येक पटीने मनाला आत्यंतिक समाधान सुद्धा लाभणार आहे. आपण आपली कर्मे वाढवून न घेता ती उत्तम रीतीने पार पाडत आहोत हे समाधान सगळ्यात महत्वाचे नाही का ? अर्थात ते आदराने प्रेमभावनेने आणि कृतज्ञतेने केले तर पितरांना ते आवडेल अन्यथा नुसतेच करायचे म्हणून केले तर ते न केल्यासारखेच आहे नाही का. माझे माझ्या वडिलांवर आईवर आजीवर खूप प्रेम आहे हि एकमेव भावना सुद्धा श्राद्ध करण्यासाठी पुरेशी आहे , नाही का? श्राद्ध कर्म हे पितृ ऋण फेडण्यासाठी नाहीच कारण ते तर कधीच फिटले जाणार नाही पण त्या ऋणाची आठवण स्मरण आपल्या मनाला करून देण्यासाठी आहे.
संपर्क : 8104639230