Pitru Paksha 2024: पितृपक्षात इतर पशु पक्षी सोडून कावळ्यालाच एवढे महत्त्व का? वाचा काकस्पर्शाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:09 AM2024-09-20T11:09:33+5:302024-09-20T11:09:56+5:30

Pitru Paksha 2024: पितृ पंधरवड्यात कावळ्याचा भाव वधारतो, नेहमी येणारा कावळा नैवेद्य ठेवला की फिरकतही नाही,  पितृपक्षातल्या या मानकऱ्याबद्दल अधिक जाणून घेऊ. 

Pitru Paksha 2024: Why is crow so important apart from other animals and birds in Pitru Paksha? Read the importance of Kakasparsha! | Pitru Paksha 2024: पितृपक्षात इतर पशु पक्षी सोडून कावळ्यालाच एवढे महत्त्व का? वाचा काकस्पर्शाचे महत्त्व!

Pitru Paksha 2024: पितृपक्षात इतर पशु पक्षी सोडून कावळ्यालाच एवढे महत्त्व का? वाचा काकस्पर्शाचे महत्त्व!

'अतिपरिचयात अवज्ञा' असे एक संस्कृत वचन आहे. त्याचा अर्थ असा, की जास्त जवळीक झाली की अपमान होण्याची शक्यता बळावते. बिचाऱ्या कावळ्याच्या बाबतीत तसेच घडते. रोज अंगणात, खिडकीत, घराच्या छतावर काव काव करणाऱ्या कावळ्याला वामकुक्षी घेणाऱ्या गृहिणी हाकलून देतात. मात्र पितृपक्षात त्याच कावळ्याची अगतिकतेने वाट पहावी लागते. असे का? जाणून घेऊ.

साधारण दशकभरापूर्वीपर्यंत कावळ्याची काव काव झाली, की अतिथी येणार असा संकेत मानला जात असे. आता लोक स्वत:च्याच घरात पाहुण्यांसारखे राहतात म्हटल्यावर कावळ्याची काव काव कोण मनावर घेणारे? मात्र ज्ञानेश्वरीत माऊलींनी त्याला केवढ्या आदराने म्हटले आहे, `पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' म्हणजे कावळ्याची 'काव काव' शकुन आहे, असे माऊली मानतात. नाहीतर आम्ही!

गोष्टीतला कावळा नेहमी बिचारा साधा-सुधा, शेणाचे घर बांधणारा आणि चिऊ ताईकडे आसरा मागणारा असल्याचे सांगितले जाते. परंतु, वास्तविक तसे नसून कावळ्याच्या घरट्याला एवढे महत्त्व आहे, की तो कधी घरटे बांधायला सुरुवात करतो आणि किती उंचावर घरटे बांधतो, यावरून पावसाची वर्दी कधी लागणार हे कळते. याचा अर्थ कावळा हवामान तज्ञ म्हटला पाहिजे, नाही का? पण गोष्टीतली चिऊ ताई भाव खाऊन जाते आणि तिथेही उपेक्षित राहतो, तो कावळाच!

काळ बदललाय! आपल्या बालपणी एक एक दगड माठात टाकून पाणी पिणारा कावळा आता बऱ्यापैकी स्मार्ट झाला आहे. तो थेट स्ट्रॉ टाकून पाणी पिऊ लागला आहे. मात्र स्वभाव तोच, भोळाबाबडा. अजूनही आपली पिले कोणती आणि कोकीळेची कोणती यात त्याची गल्लत होत असल्याने तो आपल्या आणि कोकीळेच्या पिलांचा एकत्र सांभाळ करतो. एकार्थी फुकटचे बेबी सिटींग करतो. तरी कुठेही वाच्यता करत नाही.

अशा कावळ्याला बाकीच्यांनी नाकारला पण थेट यमराजाने स्वीकारला, तेही आपले खाजगी वाहन म्हणून, असा काही ठिकाणी उल्लेख आहे. कावळ्याचा भाव वधारला. त्याची चपळाई, सुक्ष्म दृष्टी आणि सावधपणा हेरून यमराजांनी त्याला आपले दूत बनवले. म्हणून पितृपक्षात त्याला घरोघरी बोलावणे असते. कारण त्याला दिलेले अन्न यमराजाला आणि पर्यायाने पितरांना पोहोचते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हे पंधरा दिवस कावळ्यासाठी मानाचे असतात.

पितरांच्या वासना व नैवेद्य ठेवणाऱ्याचे कलुषित मन पिंडाभोवती घिरट्या घालत असेल, तर कावळा पिंडाला शिवतही नाही. एवढा तो मानी असतो. तो नैवेद्याजवळ बसेल, पण ढुंकून पाहणारही नाही. जेव्हा आपण आपली चूक मान्य करतो, पितरांच्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीची हमी देतो, तेव्हा कुठे कावळा पिंडाला शिवतो!

कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळाची लागवड होते. म्हणजे त्याच्याही नकळत तो वृक्षारोपणाची मोहीम राबवत असतो. त्याला घनदाट झाडीत राहायला आवडते. आपल्या निवासाची सोय तो स्वत:च करतो. जेवणाच्या बाबतीतही त्याचे नखरे नसतात. मिळेल ते खाऊन तो पोट भरतो म्हणून कायम फिट राहतो.

कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो. त्यामुळे बाकीचे पक्षी संपावर गेले तरी कावळ्याचे दर्शन रोज घडते. या सर्व कारणांमुळे हा मोस्ट अव्हेलेबल पक्षी पितृपक्षात पितरांच्या नैवेद्याचा मानकरी ठरतो.

Web Title: Pitru Paksha 2024: Why is crow so important apart from other animals and birds in Pitru Paksha? Read the importance of Kakasparsha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.