पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:06 PM2024-09-30T12:06:05+5:302024-09-30T12:10:13+5:30
Pitru Paksha Sarva Pitru Amavasya 2024: सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध विधी कसा करावा? महत्त्व, मान्यता जाणून घ्या...
Pitru Paksha Sarva Pitru Amavasya 2024: चातुर्मासातीलपितृपक्षाचा काळ सुरू आहे. पितृपक्षाची सांगता होत असून, ०२ ऑक्टोबर २०२४ सर्वपित्री अमावास्या आहे. वर्षभरात येणाऱ्या अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला विशेष महत्त्व आहे. शिवाय यंदा सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण आहे. त्यामुळे या सर्वपित्री अमावास्येचे महत्त्व अधिक वाढले आहे. प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवल्याचे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध करून पितरांना तृप्त करावे. असे केल्याने पूर्वज समाधानाने पितृलोकात परतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
तिथीवर कुळातील सर्व पितरांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते. वर्षभरात किंवा पितृपक्षातील अन्य तिथींवर श्राद्ध करणे संभव न झाल्यास, या तिथीवर सर्वांसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी आहे. पितृपक्षात जर सूतक पडले तर, मृत व्यक्तीची तिथी जर सूतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो, जर मृत व्यक्तीची तिथी सूतक असलेल्या दिवसांत असल्यात सर्वपित्री अमावास्याला विधी करू शकतो. यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई-वडील यांपैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही. पुढील वर्षी करु शकतो.
पूर्वजांना प्रसन्न करून शुभाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी पिंडदान, तर्पण विधी
अगदी रामायण ते महाभारतापासून पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचे दाखले आढळून येतात. सर्वपित्री अमावास्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य करून त्यांना प्रसन्न केले जाते. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे शाप आणि वरदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी वारस पिंडदान, तर्पण विधी करतात. पूर्वजांच्या कृपाशिर्वादामुळे वारसांना सुख, शांती, समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे मानले जाते. या पितृपक्ष पंधरवड्यात पृथ्वीतलावर आलेले पूर्वज वारसांकडून अन्न, जल ग्रहण करून सर्वपित्री अमावास्येला पुन्हा एकदा पितृलोकात जातात, अशी मान्यता आहे.
गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार
श्रीकृष्णानेही भगवद्गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते. पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारी व्यक्ती त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही वा करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते.
केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात
ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नानादी कार्ये उरकून घ्यावीत. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सात्विक भोजन घ्यावे. दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजचे तिन्ही सांजेला दिवा लावून तो घराच्या प्रवेशद्वारावर ठेवावा. यानंतर देवासमोर एक दिवा लावावा. एका कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी. पूर्वजांचे मनापासून स्मरण करावे आणि आपल्या घरावर, वारसांवर कृपादृष्टी व शुभाशिर्वाद कायम राहावेत, अशी इच्छा प्रकट करावी. अनावधानाने झालेल्या चुकांबाबत प्रामाणिकपणे क्षमायाचना करावी. तसेच तृप्त मनाने पितृलोकात परतरण्याची विनंती पूर्वजांना करावी, असे सांगितले जाते.
पूर्वजांसाठी नैवेद्य आणि काकबळी
सर्वपित्री अमावास्येला घरातील महिला वर्गाने स्नानादी कार्ये उरकल्यानंतर आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी. पूर्वज्यांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि तर्पण विधी करून झाले की, पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे. हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे. कावळ्यांसाठी काढून ठेवलेल्या जेवणातील भागाला काकबळी असे म्हटले जाते. पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरुपात येऊ शकतात, अशी मान्यता आहे. घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते.
श्राद्ध विधी करण्याचा अधिकार नेमका कुणाला?
गरुड पुराणात पितृपक्ष पंधरवड्यातील श्राद्ध विधी कोण करू शकते, याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे आढळते. ज्येष्ठ किंवा कनिष्ठ, पुत्राच्या अनुपस्थितीत सून, पत्नी श्राद्ध विधी करू शकतात. यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या यांचाही समावेश करण्यात आला आहे. पत्नीचे निधन झाले असल्यास किंवा तिच्या अनुपस्थितीत सख्खा भाऊ, भाचा, नातू, नात श्राद्ध विधी करू शकतात. यापैकी कुणीही उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास शिष्य, मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट श्राद्धविधी करू शकतात. यापैकीही कोणी उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास कुळाच्या पुरोहितांना त्या कुटुंबातील पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करण्याचा अधिकार प्राप्त होतो, असे गरुड पुराण सांगते. याचाच दुसरा अर्थ असा की, घरातील पुरुष उपस्थित नसेल, तर महिलांना श्राद्ध विधी करण्याचा अधिकार आहे, असे सांगितले जाते.