'ही' कविता नित्यकर्मातील पूजेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल...!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 08:00 AM2021-03-15T08:00:00+5:302021-03-15T08:00:02+5:30
नुसते विधी केले म्हणजे पूजा होत नाही, तर त्यात समर्पण भावनाही महत्त्वाची असते.
समाजमाध्यमांचा फायदा आहे तसा तोटाही. रोज डझनभर कृत्रिम फुलं आपल्या मोबाईल गॅलरीत येऊन बसतात. वरून गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि जेवण झालं का? वाल्या मेसेजचा तर रतिबच असतो. असे असूनही आजच्या काळात हे संपर्कांचे सर्वात प्रभावी माध्यम आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. याच माध्यमातून अनेक छान छान सुविचार वाचायला मिळतात. त्या विचारांनी कधी मूड तात्पुरता फ्रेश होतो, तर कधी सबंध दिवस छान जातो. यापलीकडे काही मेसेज चिंतन करायला भाग पाडतात, तर काही आपला दृष्टिकोन कायमस्वरूपी बदलून टाकतात. वानगीदाखल ही कविता पहा. कवीचे नाव माहीत नाही, परंतु साध्या शब्दात किती गहन अर्थ यात दिला आहे. देवपूजा हा आपल्या नित्यकर्माचा भाग, परंतु ही कविता पूजेचा दृष्टिकोनच बदलून टाकेल, हे नक्की!
माझी पूजा अपूर्ण आहे !
पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो !
पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही ,
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो !
पण त्या पांढर्या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही,
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो !
पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही,
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवाजवळ दिवा लावतो !
पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही,
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो !
पण संसारतापाने मंदपणे जळत असताना
चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवाजवळ कापूर जाळतो !
पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत ,
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो !
पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही ,
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो !
पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत,
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो !
पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही ,
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो !
पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद
परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही ,
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !