संसार सुखासाठी पौष शुक्ल पंचमीला केले जाते स्त्रीपुत्रकामाप्तिव्रत!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 16, 2021 08:38 PM2021-01-16T20:38:09+5:302021-01-16T20:38:40+5:30
स्त्रीसुख, पुत्रप्राप्ती आणि मोक्ष या तिन्हीसाठी पौष शुक्ल पंचमीला म्हणजे १७ जानेवारी रोजी हे काम्यव्रत केले जाते. म्हणून या व्रताला 'स्त्रीपुत्रकामाप्तिव्रत' असे म्हटले आहे.
अनेकदा काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात. त्यावेळी दैवावर हवाला टाकावा लागतो. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग! त्यानुसार, जिथे प्रयत्न संपतात, तिथे परमार्थाचा आधार मिळतो. परमार्थ चांगला घडावा, त्यासाठी प्रपंचाचा तोल सांभाळायला हवा. अर्थात संसार सुख लाभायला हवे. यासाठी पौष शुक्ल पंचमीला म्हणजे १७ जानेवारी रोजी स्त्रीपुत्रकामाप्तिव्रत केले जाते. काय आहे ते व्रत, जाणून घेऊया!
कामव्रताचे अनेक पर्याय आहेत. त्यानुसार एका पर्यायामध्ये पौष शुक्ल पंचमीला या व्रताचा प्रारंभ करावा, असे सांगितले आहे. व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन कार्तिकेयाची मनोभावे पूजा करावी. या व्रतादरम्यान पंचमीला उपास करावा करावा. षष्ठीला केवळ फलाहार घ्यावा आणि सप्तमीला उपवासाचे पारणे करावे. या व्रताचा कालावधी वर्षभराचा आहे. पूर्वीच्या काळात व्रतसमाप्तीच्यावेळी ब्राह्मणाला कार्तिकेयाची सुवर्णमूर्ती दोन वस्त्रांसह दान देत असत.
परंतु सद्यपरिस्थितीत सुवर्ण मूर्ती देणे कोणालाही परवडणारे नाही. म्हणून सुवर्णमूर्तिऐवजी इतर कुठल्याही धातूची मूर्ती घेतली तरी चालेल. किंबहुना कालमानानुसार व्रतामध्ये बदल करावयाचे ते तारतम्यानेच! त्यानुसार आताच्या काळात गुंजभर सानेदेखील दानात देणे अशक्य झाले आहे म्हणून तेथे मूर्तीमध्ये बदल करणे अनिवार्य आहे. पितळ्याची, पंचधातूची, लाकडाची असे अनेक पर्याय आहेत. त्यानुसार मूर्ती घेतली जावी. मात्र ती पूजायोग्य असावी. अशा प्रकारच्या दानामध्ये मनाचा उदात्त भाव अपेक्षित आहे. जेव्हा आपण काही देतो, तेव्हा दुपटीने आपल्याला मिळते. त्यासाठी हाताला दानाची सवय लागली पाहिजे. म्हणून व्रत वैकल्य हे निमित्त!
आपल्याकडे कार्तिकेय हा ब्रह्मचारी मानला जातो. तर दक्षिणेत त्याला दोन पत्नी असल्याचे मानले जाते. स्वत:ला स्त्रीसुख आणि पुत्रसुख मिळावे म्हणून आपल्याकडे मारुतीरायाची उपासना करतात. तसाच काहीसा विरोधाभास या व्रतामध्ये बघावयास मिळतो. षष्ठी ही तिथी कार्तिकेयाची मानली जाते. मात्र प्रस्तुत व्रताचा प्रारंभ पंचमीला केला जातो, हे विशेष! स्त्रीसुख, पुत्रप्राप्ती आणि मोक्ष या तिन्हीसाठी हे काम्यव्रत केले जाते. म्हणून या व्रताला 'स्त्रीपुत्रकामाप्तिव्रत' असे म्हटले आहे. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात.