Prabodhini Ekadashi 2022: देवाला देवपण सहज मिळत नाही, त्यासाठी त्याला काय काय सहन करावे लागते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:42 PM2022-11-04T12:42:26+5:302022-11-04T12:42:43+5:30

Prabodhini Ekadashi 2022: 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देव, त्याच्याही यातना समजून घेऊया. 

Prabodhini Ekadashi 2022: God doesn't get divinity easily, what does he have to endure for it? Find out! | Prabodhini Ekadashi 2022: देवाला देवपण सहज मिळत नाही, त्यासाठी त्याला काय काय सहन करावे लागते? जाणून घ्या!

Prabodhini Ekadashi 2022: देवाला देवपण सहज मिळत नाही, त्यासाठी त्याला काय काय सहन करावे लागते? जाणून घ्या!

googlenewsNext

डेरेदार वृक्षावर आवळा का? आणि नाजूक वेलीवर भोपळा का? असे प्रश्न विचारून देवाच्या योजनेवर शंका घेणे सोडून द्या! या उदाहरणाशी संबंधित गोष्ट तुम्हाला माहीत असेलच, पण आणखी एक गोष्ट जी थेट भगवंताने आपल्या भक्ताला सांगितली, ती थेट तुमच्यापर्यंत! आता ही गोष्ट समजा नाहीतर देवाचा निरोप समजा, पण कथा शेवट्पर्यंत नक्की वाचा!

एकदा विठोबाला त्याचा भक्त म्हणाला, देवा युगे अठ्ठावीस तू इथे उभा आहेस. दमला असशील. तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या जागी उभा राहतो, तू थोड्या वेळ विश्रांती घे नाहीतर कुठे फिरून ये. एक दिवस तुझे कामकाज मी सांभाळतो! 

देवाला हायसे वाटले. आजवर असा प्रस्ताव कोणीच मांडला नव्हता. विठोबा खुश झाला. त्याला आपली जागा दिली. पोशाख दिला आणि ताकीद दिली. दिवसभर जे घडेल ते निमूटपणे बघायचं, ढवळाढवळ करायची नाही. आपण मूर्ती आहोत हे भान विसरायचे नाही. भक्ताने मान डोलवली. तो विठोबाच्या विटेवर उभा राहिला. दिवसभर लोक दर्शनाला येत होते. आपली गाऱ्हाणी सांगत होते. समोर प्रसाद येत होता पण काहीच खाता येणार नव्हते. 

दिवस मावळतीला झुकला. एक शेठजी आले. त्यांनी आपली बरकत होऊ दे असे मागणे मागितले आणि नमस्कार करून निघून गेले. जाता जाता त्यांचे पाकीट खिशातून मंदिरात पडले. भक्ताला ते दिसले पण थांबवता येईना. थोड्या वेळाने एक गरीब माणूस आला. देवाला म्हणाला, माझी मुलं बायको उपाशी आहेत, त्यांच्या पोटापाण्याची सोय होऊ शकेल असं काहीतरी कर देवा... असे म्हणत तो नमस्कार करू लागला, तर त्याला शेटजींचे पाकीट मिळाले. त्यात पैसे होते. देवानेच आपली सोय केली अशा विचारात त्याने इथे तिथे बघितले आणि पाकीट सदऱ्यात लपवून तो नमस्कार करत निघून गेला. काही वेळाने एक नावाडी आला, म्हणाला 'देवा मोठ्या प्रवासाला निघतोय. कृपा ठेवा. प्रवास सुखरूप होऊ द्या.'  

नावाडी देवाची करुणा भाकत असताना शेठजी पाकीट शोधत मंदिरात आले आणि त्या नावाड्याने पाकीट चोरले अशा संशयावरून त्याला मारझोड करत पाकिटाची चौकशी करू लागले. भक्ताला नावाड्याचे हाल पाहवेना. त्याने मूर्तीच्या मागच्या बाजूने पळ काढला आणि शेठजींना थांबवून गरीब माणसाचा पत्ता दिला. शेठजींनी नाविकाला सोडले आणि ते गरीब माणसाचा शोध घेत त्याच्या घरी गेले. 

तेवढ्यात विठोबा आले. भक्त म्हणाला देवा, मी तुमचे काम केले. सगळी हकीकत सांगितली. विठोबाने कपाळाला हात लावला आणि म्हणाले, 'तू माझं सगळं काम बिघडवून टाकलंस! मी तुला फक्त निमूटपणे उभा राहा म्हणालो होतो. पण तू भलाई करायला गेलास आणि सगळ्यांची गैरसोय केलीस!'

भक्त काकुळतीला आला व म्हणाला, माझे काय चुकले देवा? त्यावर विठोबा म्हणाले, 'शेठजींना कसलीही कमी नाही. त्यांचे पाकीट पडले त्यातून मी गरीब माणसाची सोय लावून दिली होती. शेठजींना ज्या नावाड्यावर संशय आला त्याचा प्रवासात अपघात होणार होता. शेठजींमुळे तो तुरुंगात गेला असता. त्याचा मृत्यू टळला असता आणि गरीब पोटभर जेवला असता. एवढेसे पैसे गेल्याने शेटजींचे काहीच नुकसान होणार नव्हते. पण तू सगळी गडबड केलीस आणि आता त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार!' 

भक्ताने देवाचे पाय धरले आणि म्हणाला, 'देवा तुमच्या कामात ढवळाढवळ करून मी मोठी चूक केली. आम्ही ज्या योजना करतो त्यापेक्षा तुम्ही केलेल्या योजना सर्वांचा विचार करून केलेल्या असतात हे लक्षात आलं!' 

म्हणून गीतेचे सार देताना श्रीकृष्ण म्हणतात, 

जो हुआ वह अच्छा हुआ है, जो होगा वह अच्छा होगा!

Web Title: Prabodhini Ekadashi 2022: God doesn't get divinity easily, what does he have to endure for it? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.