Prabodhini Ekadashi 2022: देवउठणी एकादशीनिमित्त जाणून घ्या कृष्णच महाभारतानंतर विश्रांती घेणारे पांडुरंग आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:29 PM2022-11-03T17:29:18+5:302022-11-03T17:30:45+5:30
Prabodhini Ekadashi 2022: श्रीकृष्ण आणि पांडुरंग यांच्यात साधर्म्य सांगणारे घटक कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने जाणून घेऊया.
भगवान श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार. त्यानंतरही भगवंतांनी अवतार घेतला पण शस्त्र हाती घेणार नाही असा निर्धार केला. केवळ संत सज्जनांच्या आग्रहापोटी ते विठ्ठल रूपात आले आणि कटेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
आजवर आपण सर्व हिंदू देव देवतांना शस्त्रासहित पाहिले आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहताना काही जणांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आपण `मूर्ती' कशालाही म्हणतो. खरे पाहता मूर्ती या भगवंताच्या असतात. कारण त्यांच्या हातात शस्त्रे असतात. ज्याच्या हातात शस्त्रे नसतील त्याला मूर्ती न म्हणता पुतळा किंवा शिल्प म्हणावे. तरीदेखील पांडुरंगाची मूर्ती त्याला अपवाद आहे.
पांडुरंगाच्या हातात शस्त्र का नाहीत? तर भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागात आले होते. ते प्रथम कर्नाटकात आले व तेथून पुढे पंढरपुरात भक्त पुंडलिकाची भेट घेण्यास आले. म्हणून आजही हंपी येथे पुरातन विठ्ठल मंदिरं आहेत परंतु त्यात विठोबाची मूर्ती नाही. कारण तो तिथून पंढरपुरात गेला असे सांगितले जाते. भक्तांशी सदिच्छा भेटीला जाताना शस्त्रांची आवश्यकता नाही, या विचाराने पांडुरंग नि:शस्त्र आले. मात्र भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने वीट पुढे सरकवून तिथे थांब असे म्हणत प्रतिक्षा करण्यास सांगितले. त्यानुसार भक्ताच्या आज्ञेवरून पांडुरंग कटेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे.
भगवंताच्या रुपामध्ये फक्त पांडुरंग असे रूप आहे, की त्याच्या हातात शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत. पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे, की हातात शस्त्र नसले तरी त्याच्या संपूर्ण अंगावर ईश्वरी चिन्हे आहेत. म्हणून तर तेथे ईश्वरी शक्ती जाणवते.
आजपर्यंत अनेक संतांना ती अनुभवास आली आहे. पांडुरंगाच्या कोणत्याही हातात शस्त्र नसल्यानेच त्याच्या या रूपाला बौद्धरूप म्हणतात. येथील मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटेच उभे आहे व त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात रुख्मिणी, सत्यभामा व राही (राधिका) यांच्या मूर्ती आहेत.
भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व गोत सोडून पुढे आले आहेत व त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांचा शोध घेत तिथे आलेल्या दिसत आहेत. या तिघींच्या मूर्ती गंडकी पाषाणाच्या आहेत.
विठ्ठलाचे हे रूप शिवस्वरूप आहे. कारण त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे. ही मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रगट झाली आहे. तिथे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात. व पंचामृताचाचा अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात.
भगवंताचे दर्शन घेण्यास आलेली भक्तमंडळी भगवंताच्या चरणावर डोके ठेवून पदस्पर्श करतात. भगवंताचे चैतन्य सतत तिथे जाणवते. कारण ही नि:शस्त्र मूर्ती क्षमाशील आहे. तिथे गेलेल्या प्रत्येकाला मन:शांतीची अनुभूती येते.
पांडुरंगाचे रूप तिरुपतीसारखे आहे. ही मूर्तीदेखील लक्ष्मीपतीच आहे. ज्याच्याजवळ अनन्य भाव असतो, त्याच्यावर भगवंत दया करतो. म्हणून आपला अंतस्थ भाव कायम ठेवून पांडुरंगाचे दर्शन घेतले, तर तीच मूर्ती आपल्याला डोळे मिटल्यावर हृदयात स्थित असल्याची प्रचिती येते.