पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 12:58 PM2024-09-29T12:58:31+5:302024-09-29T12:59:15+5:30

Pradosh And Shivratri Vrat in Pitru Paksha 2024: पितृपक्ष काळात सोम प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आले आहेत. या दिवशी कोणते उपाय करावेत? जाणून घ्या...

pradosh shivratri in pitru paksha 2024 should do these remedies for pitra dosha in som pradosh and bhadrapad shivratri upay in marathi | पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!

पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!

Pradosh And Shivratri Vrat in Pitru Paksha 2024: मराठी वर्षातील वैशिष्ट्यपूर्ण मानला गेलेला चातुर्मास सुरू असून, त्यात विशेष मान्यता असलेला पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षाची सांगता होत आहे. तत्पूर्वीचे काही दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. पितृपक्षात प्रदोष व्रत आणि शिवरात्री एकाच दिवशी आले आहेत. हा शुभ संयोग मानला जात आहे. पितृपक्षात सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी सोम प्रदोष आहे. तसेच या दिवशी शिवरात्री आहे. या शुभ संयोग दिनी काही गोष्टी अवश्य कराव्यात, असे केल्याने वास्तुदोष, पितृदोष दूर होण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी येणे शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. तसेच सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे, असे म्हटले जाते. 

कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात?

- पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे, असा सल्ला दिला जातो. यासह अनेक समस्या, अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते.

- पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे. शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे. मात्र, याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी, असे सांगितले जाते. पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.

- घरातील उत्तर-पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते, असे सांगितले जाते. 

- घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते, त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते. 

- घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेलचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. प्रदोष काळी म्हणजे तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

- घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते. 

- यादिवशी शंकराला बिल्व पत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरु असताना मनोमन ॐ नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते, असे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: pradosh shivratri in pitru paksha 2024 should do these remedies for pitra dosha in som pradosh and bhadrapad shivratri upay in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.