गुरुवारी मराठी वर्षातील शेवटचे प्रदोष शिवरात्रि: ‘असे’ करा व्रत, वर्षभर पुण्य; शिव शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:04 IST2025-03-25T10:58:15+5:302025-03-25T11:04:44+5:30

Guru Pradosh Shivratri Vrat March 2025: मराठी वर्षातील शेवटचे प्रदोष आणि शिवरात्रि व्रत कधी आहे? कसे करावे व्रतपूजन? जाणून घ्या...

pradosh shivratri march 2025 know about date vrat puja vidhi and significance of guru pradosh march 2025 in marathi | गुरुवारी मराठी वर्षातील शेवटचे प्रदोष शिवरात्रि: ‘असे’ करा व्रत, वर्षभर पुण्य; शिव शुभ करतील!

गुरुवारी मराठी वर्षातील शेवटचे प्रदोष शिवरात्रि: ‘असे’ करा व्रत, वर्षभर पुण्य; शिव शुभ करतील!

Pradosh Shivratri Vrat March 2025: मराठी वर्षाची सांगत होत आहे. फाल्गुन महिना सुरू आहे. अवघ्या काही दिवसांनी हिंदू नववर्ष सुरू होत आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाची आणि अनन्य साधारण महात्म्य असलेली व्रते येत असून, या व्रतांच्या आचरणाने शुभ लाभ, पुण्य फलाची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. मराठी वर्षातील शेवटचे प्रदोष आणि शिवरात्रिचे व्रत गुरुवारी येत आहे. प्रदोष आणि शिवरात्रि व्रत एकाच दिवशी येणे हे सामान्यपणे घडत नाही. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि व्रताची तारीख, सोपा पूजन विधी आणि काही मान्यता जाणून घेऊया...

गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी एकाच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्रि व्रताचा योग जुळून आला आहे. प्रदोष व्रत आणि शिवरात्री एकाच दिवशी आले आहेत. हा शुभ संयोग मानला जात आहे.  प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी गुरुवारी येते, तेव्हा त्याला गुरु प्रदोष व्रत असे म्हटले जाते. तसेच गुरु प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी तसेच गुरुबळ, गुरुकृपा लाभण्यासाठी गुरु ग्रहाच्या संदर्भात मंत्रांचे जप, उपासना, दान करावे, असे सांगितले जाते. 

गुरु प्रदोष व्रत आणि शिवरात्रि व्रत पूजन विधी 

प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. षोडषोपचार पद्धतीने पूजा करणे शक्य नसेल, तर पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. आपापले कुळधर्म आणि कुळाचार, परंपरा पाळून पूजन करावे. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत. 

गुरु ग्रहाशी संबंधित काय करावे?

गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. नवग्रहांमध्ये बृहस्पति म्हणजे गुरु ग्रह देवांचा गुरु मानला गेला आहे. गुरुप्रदोषाच्या दिवशी महादेवांसोबत गुरुदेवांचे स्मरण करावे. गुरुचा मंत्र किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती म्हणावा. गुरु ग्रहाशी संबंधित गोष्टींचे यथाशक्ती दान करावे. असे केल्याने गुरु ग्रह मजबूत होऊ शकतो. तसेच गुरुचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्याची मदत होऊ शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

 

Web Title: pradosh shivratri march 2025 know about date vrat puja vidhi and significance of guru pradosh march 2025 in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.