प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:19 AM2024-06-03T07:19:06+5:302024-06-03T07:19:06+5:30
Pradosh And Shivratri Vrat June 2024: प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी येणे हा शुभ योग अनेक वर्षांनी जुळून येत आहे. प्रदोष आणि शिवरात्रि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या...
Pradosh And Shivratri Vrat June 2024: जून महिन्याच्या सुरुवातीलाच अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांपैकी पाच ग्रह एकाच राशीत असणार आहेत. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला आणखी एक विशेष म्हणजे प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी येणे शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी मंगळवारी येते तेव्हा त्याला भौम प्रदोष व्रत म्हणतात. मंगळवारी येणाऱ्या भौम प्रदोषाला केलेल्या शिवपूजनामुळे मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते. मंगळ ग्रहाचे मंगलमय सकारात्मक परिणाम मिळू शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच प्रत्येक मराठी महिन्यात शिवरात्रिचे मासिक व्रत आचरले जाते. आताच्या घडीला वैशाख महिना सुरू असून, वैशाख महिन्याची सांगता होताना शिवरात्रि आणि प्रदोष एकाच दिवशी आले आहेत.
प्रदोष आणि शिवरात्रि पूजनाचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, वैशाख वद्य त्रयोदशी ०३ जूनच्या मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटांपासून सुरू होत असून, ०४ जून रोजी रात्री १० वाजून ०१ मिनिटांनी समाप्त होत आहे. राशास्त्रानुसार प्रदोष व्रताची पूजा सायंकाळी केली जाते. तिन्हीसांजेला, दिवेलागणीला प्रदोष काळी प्रदोष व्रताचरण आणि पूजन करावे, असे सांगितले जाते. त्यामुळे ०४ जून रोजी प्रदोष व्रतपूजन होणार असून, प्रदोष व्रताच्या पूजेची वेळ सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान शुभ मानली गेली आहे. तसेच वैशाख महिन्यातील मासिक शिवरात्रि म्हणजेच वैशाख कृष्ण चतुर्दशी ०४ जून रोजी रात्री १० वाजून ०१ मिनिटांपासून सुरू होत असून, ०५ जून रोजी सायंकाळी ०७ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होत आहे. शिवरात्रिचे व्रत निशिथकाली केले जात असल्याने ०४ जून रोजीच्या मध्यरात्री शिवरात्रिचे व्रतपूजन करावे, असे सांगितले जात आहे.
प्रदोष आणि शिवरात्रि शिवपूजन कसे करावे?
प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
प्रदोष, शिवरात्रि एकाच दिवशी अन् ग्रहांचे शुभ योग
जून महिन्यात ग्रहांचा महासंयोग वृषभ राशीत जुळून येणार आहे. ३१ मे रोजी बुध ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. वृषभ राशीत विद्यमान घडीला गुरु, सूर्य, शुक्र हे ग्रह विराजमान असून, त्रिग्रही योग जुळून आला आहे. बुधाच्या वृषभ राशीत प्रवेशानंतर चतुर्ग्रही योग तयार होत आहे. चंद्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र ग्रहाच्या वृषभ प्रवेशाने या राशीत पंचग्रही योग जुळून येऊ शकेल. ०४ जून रोजी पहाटे ०४ वाजून १३ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार असून, ०७ जून रोजी सकाळी ०७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत चंद्र वृषभ राशीत असणार आहे. तसेच या कालावधीत मंगळ ग्रह स्वराशीत म्हणजेच मेष राशीत असेल. त्यामुळे प्रदोष आणि शिवरात्रि व्रताचरणात, पूजनात विशेष लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.