समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:22 IST2025-04-24T17:22:28+5:302025-04-24T17:22:44+5:30
Swami Samarth Maharaj Punyatithi Smaran Din April 2025: श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपासूनच विशेष उपासनेला सुरुवात करा आणि प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करा. नेमके काय करावे? जाणून घ्या...

समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
Swami Samarth Maharaj Punyatithi Smaran Din April 2025: २६ एप्रिल २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. अनेकदा समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही, अशी भावना मनात दाटून येते. एकामागून एक गोष्टी घडतच राहतात. अशावेळी अनेकदा नवस केला जातो. परंतु, तो करणे शक्य नसेल, तर सकाळचा अगदी काही वेळ काढा आणि नियमितपणे स्वामींची सेवा सुरू करा. नेमके काय करावे? जाणून घेऊया...
आयुष्यातील बहुतांश क्षेत्रात यश मिळावे, प्रगती व्हावी, मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावे, कल्याण व्हावे, कुटुंब, मुलांची प्रगती व्हावी, यासाठी माणून आयुष्यभर झटत असतो. प्रयत्न करत असतो. मेहनत घेत असतो. परंतु, अनेकदा समस्या, अडचणी, संकटे एकामागून एक येतच राहतात. प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव मेटाकुटीला येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. भक्तांच्या हाकेला धावून जातात. अडचणींतून सोडवतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या आश्वासनाची प्रचिती देतात. स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. शेकडो भाविक तसे अनुभवही कथन करतात. अशा परिस्थितीत स्वामींची अखंडित नियमित उपासना सुरू करावी, असे सांगितले जाते.
नेमके काय करावे?
- सकाळी आंघोळ झाल्यावर दररोज करतो, तसे देवाची पूजा करावी. यानंतर स्वामींसमोर शांत चित्ताने बसा.
- स्वामींसमोर एका भांड्यात पाणी ठेवा.
- स्वामींसमोर दिवा लावा. उदबत्ती लावा. स्वामींना सुगंधी फुल अर्पण करा. मन शांत करा.
- त्यानंतर 'श्री स्वामी समर्थ' हा जप १०८ प्रमाणे ११ जप माळ करा. ११ वेळा शक्य नसेल तर निदान १ वेळा जपमाळ करा.
- स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय वाचा. आठवड्याभराने संपूर्ण ग्रंथ वाचून होईल. पुन्हा पहिल्यापासून ग्रंथ पारायणास सुरुवात करा.
- अध्याय वाचून झाले की स्वामींचा तारक मंत्र म्हणा.
- स्वामींजवळ ठेवलेले पाणी सगळ्या घरातील मंडळींना तीर्थ म्हणून द्या.
- शक्य असेल तर गुरुवारी उपवास करा. ज्यांना उपवास करणे शक्य नसेल, त्यांनी सात्विक अन्न, फलाहार घ्यावा.
- शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जा. शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे.
- स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका.
- आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी करा.
- अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवे.
- मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये. एकदा संकल्प केला की, तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे.
- स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा.
- इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा.
- तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी.
- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. ही माहिती सामान्य गृहितकांवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥