तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:31 AM2024-05-21T11:31:51+5:302024-05-21T11:32:21+5:30
संकट विरहित जीवन कोणाचच नसतं, पण या संकटातून मार्ग कसा काढायचा, हे जाणून घ्यायचं असेल तर भगवान बुद्ध यांच्याकडून जाणून घेऊ.
आपण आणि आपल्या सभोवतालचे सगळेच जण कपाळावर आठ्या, मनात भीती आणि डोक्यावर समस्यांची टांगती तलवार घेऊन वावरत आहोत. या समस्यांचा शेवट होणार आहे की नाही, याची उकल करत आहे भगवान बुद्ध!
एक शेतकरी होता. तो अतिशय मेहनती होता. परंतु काही केल्या अपयश त्याची पाठ सोडेना. त्यामुळे तो दिवसेंदिवस आळशी बनत चालला होता. त्याच्या नैराश्यामुळे घराचीही वाताहत होऊ लागली. बायको मुलांचे हाल होऊ लागले. तो आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडू लागला.
घरातील परिस्थिती सुधारावी यासाठी त्याने लोकांच्या सांगण्यावरून मांत्रिक तांत्रिकही करून पाहिले, परंतु हाती काहीच लागले नाही. कोणा एकाच्या सांगण्यावरून त्याने पलिकडच्या गावात भगवान बुद्ध यांची भेट घ्यायची ठरवली.
शेतकरी भगवान बुद्धांना भेटला. त्यांना आपली समस्या सांगितली आणि उपाय विचारला.
भगवान बुद्धांनी सर्व समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि ते नुसते हसले.
शेतकरी आपल्या समस्येवर उपाय मिळेल याची वाट बघत होता. परंतु भगवान काही बोलत नाही पाहून तो चिडला. शेवटी तो म्हणाला, `तुमच्या पेक्षा ते मांत्रिक तांत्रिक तरी बरे, ज्यांनी मला तात्पुरते का होईना उपाय सुचवले. इथे येऊन माझा वेळ वाया गेला. मी आता निघतो.'
असे म्हणत वैतागलेला शेतकरी जायला निघाला, त्यावर भगवान म्हणाले, `प्रत्येकाच्या आयुष्यात ८३ प्रश्न असतातच. तुझ्याही आयुष्यात आहेत. त्यांची उत्तरे मी कदाचित देऊ शकणार नाही. परंतु ८४ व्या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ आहे. ते सांगतो.'
शेतकऱ्याने कान टवकारले आणि हात जोडून बसला.
भगवान म्हणाले, 'आयुष्य समस्याविरहीत होईल ही अपेक्षा ठेवणे, हीच मुळात मोठी समस्या आहे. समस्या येत जात राहतात. त्यांचा विचार करत बसलात आणि ती संपायची वाट बघत बसलात तर आयुष्य संपेल पण समस्या संपणार नाही. म्हणून समस्यांचा विचार सोडला आणि परिस्थितीचा आहे तसा स्वीकार केला, तर आधीच्या ८३ समस्याही कमी अधिक फरकाने नक्की सुटतील. यासाठी प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करा. दुसऱ्याला दोष देणे बंद करा आणि समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. ज्याला अपयश पचवता येते, त्यालाच यश प्राप्त होते.'
भगवान बुद्धांच्या शांत, गंभीर स्वरात मिळालेल्या उत्तरामुळे शेतकरी शांत झाला आणि त्याचा समस्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच पालटून गेला.