Puja vidhi : आपण रोजच देवपूजा करतो, पण शास्त्राने सांगितलेले दहा नियम पाळतो का? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 07:00 AM2024-03-12T07:00:00+5:302024-03-12T07:00:02+5:30
Puja vidhi : देवपूजा ही आपण देवासाठी नाही तर आपल्या मनःशांतीसाठी करतो, पण ती उरकून न टाकता नियमांना धरून केली तर त्याचे अधिक फळ लाभते.
आपण दररोज एक उपचार म्हणून करत असलेली देवपूजा, ही भगवंतासाठी नसून आपल्यासाठी असते, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. पूजा हे 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' राहण्याचे निमित्त असते. जीव आणि शिवाचा संवाद असतो. पूजा करताना मन एकाग्र होणे अभिप्रेत असते. त्यामुळे मनापासून वाहिलेले एक बिल्वपत्र किंवा फुल भगवंतापर्यंत पोहोचावे, आपण अर्पण केलेला नैवेद्य त्याने ग्रहण करावा, अशी त्यामागील मुख्य भावना असायला हवी.
मात्र प्रत्यक्षात घडते काही वेगळेच! पूजा कोण करणार यावरून नवरा बायकोत वाद होतात. कारण तेवढ्यापुरताही त्यांच्याजवळ वेळ नसतो. धुसफुसत दोघांपैकी एक जण पूजा 'उरकून' घेतो. पूर्वी हे काम घरातले ज्येष्ठ आत्मीयतेने आणि तल्लीनतेने करत असत आणि नातवंड त्यांच्याबरोबर बसून पूजा विधी शिकून घेत असत. परंतु आता तसे होत नाही. ज्या आत्मारामाशी आपला दिवसभरातुन क्षणभरही संवाद घडत नाही, त्याने आपल्या संकटात धावून यावे अशी अवाजवी अपेक्षा मात्र बाळगली जाते आणि त्याने हाक ऐकली नाही की त्यालाच दोषी ठरवले जाते. या चुका टाळण्यासाठी शास्त्राने काही उपाय सुचवले आहेत...
>>देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये.
>>पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा.
>>जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत बसून करावा. जप माळ धरलेल्या हातावर गॊमुखी धरावी. म्हणजे जप किती बाकी आहे, याकडे वारंवार लक्ष जात नाही. मेरुमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो.
>>जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करावा आणि ज्या जागेवर बसतो, तिथेही भूमिस्पर्श करून नमस्कार करावा.
>>देवपूजेत तुळशीचे स्थान महत्त्वाचे असले, तरीही द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीची पाने खुडू नयेत.
>>तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये. तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा.
>>शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा माराव्यात. तसे करणे शुभ मानले जाते.
>>देव पूजेत, यज्ञविधीत पांढरे तीळ नाही, तर काळ्या तिळांचा वापर करावा.
>>कोणत्याही धार्मिक प्रसंगी दान दक्षिणा उजव्या हाताने द्यावी.
>>शंकराला बेल, गणपतीला दुर्वा, विष्णूला तुळस, लक्ष्मीला कमळ असे ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे ते अर्पण करावे.
>>महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवाला कुंकू वाहू नये.
>>देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गढूळ पाण्यात टाकून न देता बागेतील रोपांना खत म्हणून घालावे आणि पुर्नवापरात आणावे.
>>पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे. आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप दीप उदबत्ती ठेवावे आणि उजव्या बाजूला आरतीचे तबक ठेवावे.
>>देवपूजेत तासनतास घालवणे शास्त्रालाही अभिप्रेत नाही, परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सान्निध्यात घालवतो, तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा, हा पूजेचा मुख्य हेतू असतो.