खरंच मी अंतर्यामी सुखी आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:55 AM2020-05-20T01:55:57+5:302020-05-20T10:49:19+5:30
मत्तेय नावाचे फें्रच शास्त्रज्ञ आहेत. यशस्वी शास्त्रज्ञ अशा उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना एकेदिवशी त्यांना साक्षात्कार झाला.
- फा. फ्रान्सिस दिब्रिटो
जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची एकच धडपड असते ती सुखी असण्यासाठी! ‘सुख पाहता जवा एवढे, दु:ख पर्वता एवढे,’ असे संत तुकोबा म्हणतात ते अगदी खरे आहे. चित्तवृत्ती प्रसन्न असणे, यातच खरे सुख सामावलेले आहे. मत्तेय नावाचे फें्रच शास्त्रज्ञ आहेत. यशस्वी शास्त्रज्ञ अशा उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना एकेदिवशी त्यांना साक्षात्कार झाला. ‘हे सारं मला कुठे घेऊन जाणार आहे? खरंच मी अंतर्यामी सुखी आहे का?’ या सुखाचा शोध घेत घेत ते थेट तिबेटला पोहोचले. बौद्ध भिक्षू झाले. इतकेच नाही तर मठाधिपती झाले. सुख म्हणजे आत्मशोध यावर त्यांनी विचार व्यक्त केले. सुखाचा शोध लागत नाही, तोपर्यंत माणूस अस्वस्थ असतो. सुख म्हणजे निरासक्त अवस्थेला पोहोचणे, निरपेक्ष होणे. कारण दु:खाचा उगम अपेक्षेतून होतो, असे बुद्धाने म्हटले आहे. माणूस निरासक्त अवस्थेला पोहोचतो तेव्हा तो अंतर्यामी आनंदी होतो. शरीर, इंद्रियांना मिळते ते सुख व मनाला होतो तो आनंद! सुख शरीराला आनंद देते तर आनंद मनाला चिरकाळ सुख देतो. आपण आनंदापेक्षा सुखाच्या मागे असतो. ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे,’ अशी आपली अवस्था होते. प्रार्थनेतही आपण सुखाची मागणी करतो आनंदाची नाही. एक ग्रीक योगी थंडीच्या दिवसात ऊन खात बसला होता. इतक्यात तेथे राजा आला व त्याला म्हणाला, ‘साधुमहाराज, तुम्ही हवं ते मागा मी देईन.’ तेव्हा हात जोडून योगी विनम्रपणे म्हणाला, ‘महाराज, तुम्ही जरा बाजूला सरकलात तर बरे होईल. तुमच्यामुळे माझं ऊन अडलं आहे.’ योग्याचा आनंद त्यात होता. माणसे सेवानिवृत्त होतात; पण आसक्तीतून निवृत्त होत नाहीत. वानप्रस्थाश्रमात वनामध्ये प्रस्थान करायचे असते. म्हणजे निसर्गाकडे वळायचे असते. गरजा कमी करून प्रपंचातून निरासक्त व्हायचे असते; पण आज किती लोक या अवस्थेला पोहोचले आहेत? आनंद हे आपल्या जगण्याचं अंतिम ध्येय असायला हवे. अध्यात्मामध्ये परमेश्वराला सत् चित् आनंद म्हटले आहे, हेच जीवनाचे खरे सार आहे.