Pushtipati Vinayak Jayanti: खुद्द श्रीकृष्ण-रुक्मिणीने पूजलेला पुष्टिपती विनायक; ‘अशी’ आहे गणेशाच्या अवताराची कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 12:43 PM2022-05-15T12:43:26+5:302022-05-15T12:45:10+5:30
Pushtipati Vinayak Jayanti 2022: पुष्टिपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीतील विनाशाचा शाप निष्प्रभ झाला. यासह अन्य काही कथा पुराणात या गणेश अवताराबाबत आढळून येतात. जाणून घ्या...
मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. वैशाख पौर्णिमेला असणाऱ्या पुष्टिपती विनायक जयंती निमित्त गणपतीच्या या अवताराविषयी जाणून घेऊया... (Pushtipati Vinayak Jayanti 2022)
यंदाच्या वर्षी सन २०२२ मध्ये १५ मे रोजी वैशाख पौर्णिमा येत असून, याच दिवशी पुष्टिपती विनायक जयंती साजरी केली जात आहे. गणेशाच्या या अवताराचा उल्लेख मुद्गल पुणारात आढळून येतो. प्राचीन काळात दुर्मती नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकांत उच्छाद मांडला होता. दुर्मतीने आदिशक्ती जगदंबेची घोर तपश्चर्या केली. जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देवता त्यापुढे निष्प्रभ ठरू लागल्या. दुर्मतीने कैलासावर आक्रमण केले. दुर्मतीपुढे टिकाव न लागल्याने महादेव शिवशंकर व माता पार्वती कैलास पर्वत सोडून निघून गेले. देवऋषि नारदमुनींनी महादेव व पार्वती यांना गणेशाची उपासना करून त्यांचे आवाहन करण्यास सूचविले. यासाठी दररोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करावी. तिचे पूजन करावे आणि सायंकाळी ती मूर्ती विसर्जित करावी, असे व्रत शिव-पार्वतीला सांगितले.
गणेशाने घेतला पुष्टिपती विनायकाचा अवतार
नारदमुनींच्या सांगण्याप्रमाणे दररोज हे व्रत केल्यानंतर वैशाख पौर्णिमेस गणेश आपल्या अतिप्रचंड रुपात महादेव आणि पार्वतीसमोर प्रकट झाले. गणेशाचे अतिभव्य स्वरूप पाहून शिव-पार्वतीही भयभीत झाले. गणेशाला बालरुपात आपल्यासोबत राहण्याची विनंती त्यांनी केली. त्यानुसार गणेश बालरुप धारण करून शिव-पार्वती समवेत राहू लागले. दुसरीकडे याच काळात भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांच्या पोटी पुष्टी नामक कन्येने जन्म घेतला. कालांतराने तिचा विवाह गणेशाची झाला. यामुळे गणेशाच्या या अवताराचे नामकरण पुष्टिपती विनायक असे झाले.
पुष्टिपती विनायकाला युद्धाचे आव्हान
एक दिवस पुष्टिपतीस दुर्मतीच्या अत्याचाराची सर्व हकीकत समजली. तेव्हा पुष्टिपतींनी दुर्मतीला राक्षसी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन केले. यासाठी गणेशाने भगवान विष्णूंना शिष्टाई करण्यास पाठविले. परंतु, दुर्मतीने उलट पुष्टिपती विनायकाला युद्धाचे आव्हान दिले. दुर्मतीने दिलेल्या युद्धाच्या आव्हानाचा स्वीकार पुष्टिपती विनायकांनी केला. या दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. दुर्मतीने पुष्टिपती विनायकाच्या दिशेने आपला परशू फेकला. तो परशू त्यांनी दाताने अडविला. या धुमचक्रीत पुष्टिपती विनायकाचा दात तुटला. तेव्हा तो तुटलेला दात फेकून विनायकाने दुर्मतीचा शिरच्छेद केला.
श्रीकृष्ण-रुक्मिणीने केले पुष्टिपती विनायक पूजन
कालांतराने द्वापारयुगात भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णानेही पुष्टिपती विनायकाचे आवाहन करून पूजन केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रुक्मिणी विवाहानंतर श्रीकृष्णांनी पुष्टिपती विनायकाचे पूजन केले. त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या दारव्हा या गावात हे मंदिर आहे. स्वमंतक मण्याच्या कथेत श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञान शक्तीच्या पुनःप्राप्तीसाठी पुष्टिपती विनायकाचे आवाहन केल्याची कथा आढळून येते. ते मंदिर पुणे जिल्ह्यातील सुपे येथे आहे. तसेच मुंबईतील बोरिवली पूर्व येथील शांतीवनजवळ पुष्टिपति गणेश मंदिर आहे. तसेच पुष्टिपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीत असलेला विनाशाचा शाप निष्प्रभ झाला. अगस्त ऋषींनी समुद्र प्राशनाची शक्ती मिळवून समुद्राच्या तळाशी लपलेल्या 'वातापी' या राक्षसाचा नाश केला, अशीही एक उपकथा असल्याचे पुराणात आढळून येते.