दृष्टीवर भक्तीची काच बसवा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:16 PM2020-12-03T16:16:22+5:302020-12-03T16:18:15+5:30

आपण डोळ्यावर कुठल्या रंगाची काच बसविली आहे, त्यावरच आपली दृष्टी अवलंबून आहे. आपण आध्यात्माच्या शुभ्र, स्वच्छ रंगाची काच डोळ्यावर बसवा म्हणजे जे दिसेल ते पवित्र, शुभ व मंगलच दिसेल..!

Put the glass of devotion in sight ..! | दृष्टीवर भक्तीची काच बसवा..!

दृष्टीवर भक्तीची काच बसवा..!

Next

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

परमेश्वराने माणसाला जी इंद्रिये दिली ती नुसतीच विषय भोगासाठी नसून त्या इंद्रियांनी सर्वेश्वराला ओळखता आले पाहिजे. आज वासना तृप्तीसाठी माणूस वाट्टेल ते करा करावयाला प्रवृत्त होत आहे. माणूस निसर्गाची तर शिकार करीत आहेच पण सर्वांत दुर्दैव म्हणजे माणूस माणसाची पण शिकार करीत आहे.

पाप हे सर्वप्रथम डोळ्यातून मनांत प्रवेश करते म्हणूनच डोळ्यांनी जे काही बघाल ते चांगलेच बघा. दृष्टीत शुद्धभाव ठेवा. आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे -

जशी दृष्टी तशी सृष्टी..!

एकदा म्हणे द्रोणाचार्यांनी धर्मराजाला सांगितले की, या जगातून एखादा वाईट माणूस मला आणून दे.. धर्मराज खूप खूप हिंडले पण वाईट माणूस सापडलाच नाही. शेवटी ते रिकाम्या हातानेच द्रोणाचार्यांकडे परत आले.

आता द्रोणाचार्य दूर्योधनाला म्हणाले, दूर्योधना.. मला या जगातला एखादा चांगला माणूस आणून दे. दूर्योधनदेखील खूप खूप हिंडला पण त्यालाही चांगला माणूस मिळाला नाही. तो देखील रिकाम्या हातानेच परत आला. आता हा तर फक्त आणि फक्त दृष्टीतलाच भेद आहे. 

ज्या डोळ्यांना ईश्वराचेच रुप बघण्याची सवय आहे त्यांना जगातल्या सर्व रुपात तोच दिसला. अध्यात्म हा दृष्टीतील भाव पार बदलून टाकते. दृष्टीतील भाव बदलला तर वाईटातही चांगलेच दिसते.

एकदा स्वामी रामकृष्ण परमहंस आपल्या काही शिष्यांसमवेत रस्त्याने जात होते. त्या रस्त्यावर अनेक लावण्यसंपन्न गणिका (वेश्या) उभ्या होत्या. एका घराच्या माडीवर एक लावण्यवती सोळा शृंगार करुन उभी होती. जणूकाही सौंदर्याची मूर्तीमंत आकृतीच..! भगवान रामकृष्णांची आणि तिची दृष्टादृष्ट झाली. त्यांनी तिला पाहिले आणि तिचे लावण्य पाहताक्षणी स्वामी रामकृष्णांची समाधी लागली. बरोबर जे शिष्यगण होते त्यांना वाटले की, स्वामींचे वैराग्य संपले, यांच्या दृष्टीत पाप शिरले. हे ढोंगी, लबाड आहेत. हे कसले साधू..?  

स्वामी रामकृष्ण मात्र त्या लावण्यवतीकडे बघत बघत परमोच्च अवस्थेला पोचले. काही क्षणानंतर सावध झाल्यावर रामकृष्णांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आहाहा..! हे परमेश्वरा..! तू जर ही एवढी सुंदर स्त्री घडविली असशील तर तिला निर्माण करणारा तू किती सुंदर असशील..? आता स्वामी रामकृष्णांच्या दृष्टीतील हा निर्मळ, पवित्र भाव बघा..! म्हणून आपण डोळ्यावर कुठल्या रंगाची काच बसविली आहे त्यावरच आपली दृष्टी अवलंबून आहे. आपण आध्यात्माच्या शुभ्र, स्वच्छ रंगाची काच डोळ्यावर बसवा म्हणजे जे दिसेल ते पवित्र, शुभ व मंगलच दिसेल..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

Web Title: Put the glass of devotion in sight ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.