Putrada Ekadashi 2023: आज पुत्रदा एकादशी, जाणून घ्या व्रताचे महत्त्व, विधी आणि त्यामागील पौराणिक कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 09:52 AM2023-01-02T09:52:32+5:302023-01-02T09:52:45+5:30
Putrada Ekadashi 2023: आजच्या विज्ञानयुगात संतान प्राप्तीचे अनेक उपाय उपलब्ध आहेत, त्यालाच उपासनेची जोड म्हणून ही व्रत वैकल्य!
पौष शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. २ जानेवारी रोजी ही एकादशी आहे. वर्षभरातील इतर इतर एकादशीप्रमाणे या एकादशीलाही कथेचा संदर्भ जोडलेला आहे. यादिवशी व्रत कर्त्याने उपवास करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा करावी, असे म्हटले जाते.
एकादशी हे व्रत भगवान विष्णूंसाठी केले जाते. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला विशिष्ट नाव आणि हेतू दिलेला आहे. जेणेकरून तो हेतू साध्य होण्यासाठी का होईना भाविकांनी एकादशीचे व्रत करावे, हा उद्देश असू शकेल. नावावरूनच या एकादशीचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. ते म्हणजे एकादशीचे हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले जाते. ते कसे करतात व त्यामागील कथा काय आहे ते पाहू.
पुत्रदा एकादशीची कथा :
कांचनपूरचा राजा शूरसेन हा प्रजापालनदक्ष, पुण्यवान आणि पराक्रमी होता. त्याला शंभर राण्या होत्या परंतु पुत्रसौख्य नव्हते. ऋषिमुनींना त्याने आपले दु:खं सांगितल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याने हे व्रत केले, त्यायोगे त्याची वंशवेल बहरली.
आजच्या विज्ञानयुगात अशा कथांवर लोकांचा कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु आज वैद्यकीय क्षेत्रातील उपचारांमुळे अनेकांना संतानप्राप्तीचे सुख प्राप्त होत आहे, त्याप्रमाणे पुराणकाळातील तपस्वी ऋषिमुनींनादेखील ही विद्या अवगत असू शकेल यावर विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नाही. एखादी गोष्ट जेव्हा श्रद्धेने केली जाते, तिचे फळ निश्चित मिळते.
एकादशीचे व्रत विष्णूभक्तीसाठी आहेच, शिवाय ते आरोग्यासाठीही हितकारक आहे. म्हणून दर महिन्यातून दोन एकादशीला हे व्रत केले जाते. एकादशीचा उपास हा दोन्ही वेळ करणे अपेक्षित असते. त्यादिवशी केवळ फलाहार करावा आणि देवाचे नामस्मरण करून, दर्शन घेऊन देह व चित्त शुद्ध करावे, असा एकादशीचा हेतू असतो. त्यानुसार पुत्रदा एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर व्रत विधी पुढीलप्रमाणे आहे.
पुत्रदा एकादशीचा व्रतविधी :
हे व्रत करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला दुपारी जेवून एकभुक्त राहावे. एकादशीच्या दिवशी स्नानविधी करून परमेश्वराची पूजा करावी. फुले ले, फळे, नैवेद्य अर्पण करून आरती करावी. देवदर्शन घ्यावे. रात्री कथा, कीर्तन, पारायण करावे. दुसऱ्या दिवशी स्नान, पूजा करून गरजूंना तसेच पुरोहितांना दान दक्षिणा देऊन मग स्वत: जेवावे. हे व्रत केल्याने पाप नाश होऊन संतानप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.