राघवेंद्र स्वामींनी देहाने घेतली संजीवन समाधी पण विचारांचे आयुर्मान ७०० वर्षांचे; खरी ठरली भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 04:14 PM2024-08-20T16:14:55+5:302024-08-20T16:15:20+5:30

Raghvendra Swami : दक्षिणेकडील प्रमुख संतांपैकी एक म्हणजे राघवेंद्र तीर्थ स्वामी यांची पुण्यतिथी; त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास!

Raghavendra Swami took Sanjivan Samadhi in body but life span of thoughts is 700 years; The prediction came true! | राघवेंद्र स्वामींनी देहाने घेतली संजीवन समाधी पण विचारांचे आयुर्मान ७०० वर्षांचे; खरी ठरली भविष्यवाणी!

राघवेंद्र स्वामींनी देहाने घेतली संजीवन समाधी पण विचारांचे आयुर्मान ७०० वर्षांचे; खरी ठरली भविष्यवाणी!

दक्षिणेकडील महान संत म्हणून ज्यांचे आदराने नाव घेतले जाते, ते म्हणजे राघवेंद्र स्वामी. महाराष्ट्रात तसेच जगभरात त्यांचे अनेक अनुयायी आहेत. एक संत म्हणून नावारूपाला येण्याआधी त्यांचे आयुष्यही सर्वसामान्यांसारखे होते. मात्र एकाएक त्यांच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळाली आणि ते संतपदाला कसे पोहोचले, हा प्रवास जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या लेखणीतून. 

एकदा मंत्रालयात राघवेंद्रस्वामींकडे तीन नामवंत ज्योतिषी आले. राघवेंद्रस्वामींच्या शिष्यांनी उत्सुकतेपोटी त्या तिघांनाही स्वामींची पत्रिका दाखवली. त्यापैकी एका ज्योतिषाने स्वामी शतायुषी म्हणजे शंभर वर्षे आयुष्य असलेले आहेत असे सांगितले. दुसऱ्या ज्योतिषाने स्वामींना तीनशे वर्षांचे आयुष्य लाभले असल्याचे सांगितले. तर तिसऱ्याने चक्क सातशे वर्षांचे आयुष्य लाभणार असे छातीठोकपणे सांगितले. त्या तीन ज्योतिषांची ती तीन वेगवेगळी भविष्ये ऐकून सारी मंडळी चेष्टेने हसू लागली. तेव्हा राघवेंद्रस्वामींनी त्या हसणाऱ्या सर्व मंडळींना थांबवले आणि त्यांना भविष्याचा अर्थ उकलून सांगितला. 

स्वामी म्हणाले, `या तिघांनी सांगितलेली ही तिनही भविष्ये खरीच आहेत. कारण माझे शारीरिक आयुष्य हे शंभर वर्षांचे असले तरी ग्रंथरूपी आयुष्य मात्र तीनशे वर्षांचे असेल आणि मंत्रालयाच्या वृंदावनातील माझे अस्थिरूपातील अस्तित्त्व सातशे वर्षे टिकून राहील' स्वामींच्या या समजावून सांगण्याने मंडळींच्या मनातील शंकांचे निरसन झाले. नंतर स्वीमींनी त्या तिन्ही ज्योतिषांचा योग्य आदरसत्कार करून समारंभपूर्वक त्यांना मोठ्या प्रेमाने निरोप दिला. 

मंत्रालयाच्या राघवेंद्रस्वामींचे मूळचे नाव होते व्यंकण्णाचार्य. त्यांचे प्रारंभीचे सारे शिक्षण श्रीपादस्वामींकडे झाले. व्यंकप्पा लाघवी, शांत आणि अभ्यासूवृत्तीचे असल्यामुळे आई वडील, शेजारी, गावकरी, गुरुजन या साऱ्यांनाच ते आवडत. यथावकाश लग्न झाल्यावर सुशील पत्नीमुळे घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असूनही त्यांचे सांसारिक जीवन अत्यंत सुखसमाधानात व्यतीत होत होते. मुलगा झाल्यावरही व्यंकण्णांची मूळची अभ्यासवृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून मग त्यांनी पुढील शिक्षण सुधींद्रतीर्थांकडे घेण्यास सुरुवात केली.
 
सुधींद्रतीर्थ व्यंकण्णांना मठाचे भूषण मानीत असत. गावोगावी भरणाऱ्या विविध सभांमध्ये वादविवादामध्ये व्यंकण्णा नेहमीच जिंकत असे, त्यामुळेही सुधींद्रतीर्थांना त्याचा अभिमान वाटत असे. त्यातच शिकत असतानाच व्यंकण्णांने मध्वविजय हा पहिला ग्रंथ लिहिला. 

पुढे एका दृष्टांतानुसार सुधींद्रतीर्थांनी व्यंकण्णाला मठाधिपती करण्याचे ठरवले. पण प्रेमळ पत्नीला त्यागून संन्यासदीक्षा घेण्याबद्दल व्यंकण्णांचा निश्चय होईना. लोकसमजुतीप्रमाणे एका रात्री साक्षात देवी सरस्वतीने त्यांना स्वप्नात येऊन समजावले. त्यानुसार अखेर शके १५४५ च्या फाल्गुन वद्य द्वितीयेला सुधींद्रतीर्थांनी त्यांना दीक्षा दिली. त्यांचे राघवेंद्रतीर्थ असे नामकरण केले. मठाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्याच दिवशी सायंकाळी स्वत: सुधींद्रतीर्थांनी वृंदावन प्रवेश केला.

या घटनेने राघवेंद्रस्वामी अबोल झाले. त्यातच पतीने संन्यासदीक्षा घेतलेली पाहून त्यांच्या प्रिय पत्नीनेही विहिरीत उडी मारून प्राणत्याग केला. जड मनाने तिला मुक्ती देऊ मग स्वामी धर्मप्रसारासाठी देशाटनाला गेले. त्या वेळी उडपी येथील कृष्णमठातून स्वामींचा पाय निघेना. इतके तेथील वातावरण प्रेमपूर्व आणि भक्तिभावाने ओथंबलेले होते. म्हणून मग वर्षभर तिथेच मुक्काम करून स्वामींनी तंत्रदीपिका, न्यायमुक्तावली आणि चंद्रिकाप्रकाश हे तीन ग्रंथ लिहिले. स्वामींचा व्यासंग, त्यांची प्रतिमा, त्यांचा प्रेमळ लाघवी स्वभाव या साऱ्यामुळे स्वामींकडे जो येई तो त्यांचाच होऊन जाई. त्यांची लोकप्रियता हाही चमत्कारच म्हणावा लागेल.

शके १५९३ च्या श्रावण वद्य द्वितीयेला गुरुवारी स्वामींनी वृंदावनप्रवेश केला. स्वामी कुर्मासन घालून पूर्वाभिमुख बसले. त्यांनी दृष्टी समोरच्या मारुतीकडे लावली. 'माझी जपमाळ थंबली की, सातशे शाळिग्राम वृंदावनात ठेवावेत' असे स्वामींनी आधीच सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे जेव्हा त्यांच्या हातातील जपमाळ फिरण्याची थांबली तेव्हा शिष्यमंडळींनी आणि ग्रामस्थ भक्तमंडळींनी वृंदावनात सातशे शाळिग्राम ठेवले. वर नृसिंहाची मूर्ती स्थापली गेली. आजही मंत्रालयातील स्वामींचा मठ हे स्वामींच्या सर्वदूर पसरलेल्या भक्तगणांचे फार मोठे आधारस्थान आहे. अशा राघवेंद्र स्वामींची २१ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यतिथी आहे. आपण त्यांच्या पुण्यपावन स्मृतीला आदरपूर्वक नमस्कार करूया. 

Web Title: Raghavendra Swami took Sanjivan Samadhi in body but life span of thoughts is 700 years; The prediction came true!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.