भक्त प्रल्हाद यांचा अवतार समजले जाणारे राघवेंद्र स्वामी हे महान संत परंपरेतील एक मुख्य संत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 05:24 PM2021-03-15T17:24:26+5:302021-03-15T17:24:48+5:30
राघवेंद्र स्वामी यांचे चरित्र अनेक चमत्कारिक प्रसंगांनी युक्त असले, तरीदेखील त्यांनी धर्म कार्यार्थ केलेले काम आणि त्यातून घडवलेले बदल अधिक चमत्कारिक आहेत.
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेईन माझा अंश पाठवून भक्तांवरील संकट दूर करेन, अशी ग्वाही साक्षात भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिली आहे.
शान्तो,महान्तो,निर्वसंती संतो वसंत वल्लोक हितं चरन्त |
तीर्णाः स्वयं भीम भवार्णवं जना नहेतुनान्यानपी तारयन्ताः ||
सुजलाम सुफलाम अशा भारत भूमीवर अनेक आक्रमणे झाली. अनेक योध्यांनी, महापुरुषांनी, स्वातंत्र्यवीरांनी ती थोपवून धरली आणि परतावूनही लावली. त्यात शूर वीरांच्या बरोबरीने महत्त्वपूर्ण योगदान दिले, संतांनी, महंतांनी, साधू, ऋषीमुनी आणि अनेक तपस्विनी! अशाच भारत भूमीचा उद्धार करण्यासाठी तसेच हिंदू धर्माचा गौरव करण्यासाठी, धर्माचे रक्षण करणाऱ्यांमध्ये एक नाव घेतले जाते, परमपूज्य राघवेंद्र स्वामी! धर्म कार्याची धुरा स्वीकारून ते मठाधिपती झाले, तो आजचाच दिवस. त्यांचा शिष्य परिवार केवळ दक्षिण भारतात नाही, तर महाराष्ट्रात व परदेशातही पसरलेला आहे. तसेच त्यांच्या नावे सुरू असलेल्या मठामधून धार्मिक कार्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक संत आणि तत्वज्ञानी होत. ते इ.स. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्रीमध्वाचार्य लिखित ग्रंथावर त्यांनी ‘सुधा परिमल’ हा टीकात्मक संवाद लिहिला. आंध्र प्रदेशातील मंत्रालयम् येथील त्यांची समाधी भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. राघवेंद्रस्वामींच्या कीर्तीने भारावलेल्या भाविकांची आजही त्यांच्या समाधीकडे गर्दी असते.
श्री राघवेंद्र तीर्थरू यांचे जन्मनांव वेंकटनाथ असून, त्यांचा जन्म सध्याच्या तमिळनाडू राज्यातील भुवनगिरी गावात एका कानडी भाषिक मध्व ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मवर्षाविषयी पुरेसा आधार नसल्याने तो इ.स. १५९५ ते १६०१ दरम्यान झाला असावा असे अनुमान आहे. त्यांना प्राथमिक शिक्षण, त्यांचे मेहुणे लक्ष्मीनरसिंहाचार्य ह्यांनी दिले. पुढे ज्ञानार्जनासाठी त्यांना कुंभकोणम् येथे पाठवले गेले. त्याच गावी संन्यास घेऊन त्यांनी ‘राघवेंद्र तीर्थ’ हे नाव ग्रहण केले. राघवेंद्र स्वामींना भगवान विष्णू यांचा लाडका भक्त प्रल्हाद याचा अवतार मानले जाते.
राघवेंद्रांनी आपले गुरु सुधींद्र तीर्थांकडून, श्री मठाचे मुख्य म्हणून धुरा स्वीकारली, तो आजचा दिवस, अर्थात फाल्गुन द्वितीया. मध्वाचार्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी राघवेंद्रांनी संपूर्ण दक्षिण भारतात प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी अनेक पूर्वानुभूत चमत्कार केले. १६७१ साली त्यांनी मंत्रालय येथे जिवंत समाधी घेतली. तत्पूर्वी त्यांच्या शिष्यांना त्यांनी पुढील ८०० वर्षे आत्मारूपाने शाश्वत राहण्याचे वचन दिले.
पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च
भजतां कल्पवृक्षाय नमताम् कामधेनवे।
राघवेंद्र स्वामी यांचे चरित्र अनेक चमत्कारिक प्रसंगांनी युक्त असले, तरीदेखील त्यांनी धर्म कार्यार्थ केलेले काम आणि त्यातून घडवलेले बदल अधिक चमत्कारिक आहेत. त्यांना विनम्र अभिवादन.