Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधणे ठरेल अधिक लाभदायक;वाचा सविस्तर माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 05:21 PM2021-08-17T17:21:11+5:302021-08-17T17:21:54+5:30
Raksha Bandhan 2021: रक्षाबंधनाच्या दिवशी धनिष्ठा आणि शोभन हे योग जुळून आले आहेत. हे दोन्ही योग ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने शुभ आहेत.
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन यंदा २२ ऑगष्ट रोजी येत आहे. कोव्हीड काळात अनेकांना प्रत्यक्ष भेटी गाठी करता आल्या नाहीत, परंतु आता परिस्थिती थोडीफार आटोक्यात आल्याने, वेगाने लसीकरण झाल्याने आणि सरकारी नियम शिथिल झाल्याने रक्षाबंधनाचा सोहळा आधीसारखाच रंगतदार होणार आहे, अशी आशा आपण व्यक्त करू शकतो. अर्थात नियमांचे पालन करूनच!
श्रावण पौर्णिमा हा दिवस रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. या दिवशी कोळी बांधव सागराला श्रीफळ वाहून नारळी पौर्णिमा साजरी करतात तर घरोघरी बहीण आपल्या भावाला राखी बांधून अक्षय्य नात्याचा सण साजरा करतात. हा संपूर्ण दिवस शुभ आहेच. मात्र या दिवशी धनिष्ठा नक्षत्राचा योग जुळून आल्याने तो मुहूर्त साधून भावाला राखी बांधणे हे त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी लाभदायक ठरू शकेल असे ज्योतिष शास्त्र सांगते. हा मुहूर्त कधी आहे, किती वेळ आहे आणि तो कसा साजरा करता येईल ते पाहू.
रक्षाबंधनाच्या दिवशी धनिष्ठा आणि शोभन हे योग जुळून आले आहेत. हे दोन्ही योग ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने शुभ आहेत. या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून राखी बांधणे अधिक परिणामकारक ठरेल. वर म्हटल्याप्रमाणे सकाळी ५. ३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत संपूर्ण दिवस शुभ आहे. धनिष्ठा नक्षत्रानुसार शुभ योग पहायचा झाल्यास सकाळी ६. १५ ते सायंकाळी ५.३० पर्यंत आहे.
परंतु वेळेअभावी हा मुहूर्त साधता आला नाही तरी वाईट वाटून घेऊ नका, हा संपूर्ण दिवसच या उत्सवासाठी राखीव ठेवला आहे. बहीण भावांचे अतूट प्रेम ज्याक्षणी रेशमी धाग्याने बांधले जाईल, तोदेखील शुभ मुहूर्तच असेल, नाही का...!