Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: August 9, 2022 12:58 PM2022-08-09T12:58:06+5:302022-08-09T12:59:33+5:30

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन हा फक्त सण नाही, तर हा एक संस्कार आहे नातेसंबंधांची साखळी जपण्याचा, त्यानिमित्ताने तुमच्या प्रियजनांना दिलेली ही भेट नक्की आवडेल!

Raksha Bandhan 2022: Don't forget to give 'this' a gift if you want to tie the knot of relationship! | Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका!

Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका!

googlenewsNext

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

भारतीय संस्कृतीचे मूळ कशात आहे विचाराल, तर ते आहे नातेसंबंधांत! आपण मजेने म्हणतो, आऊचा काऊ मावसभाऊ सुद्धा माझ्या परिचयाचा आहे, अर्थात एवढे दूरचे नातेसुद्धा आम्ही सख्ख्या नात्यासारखे सांभाळतो. हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. परंतु, अलीकडच्या काळात हर तऱ्हेच्या नात्यांमध्ये वितुष्ट येऊन नाती संपुष्टात का येत आहेत? याचे कारण एकच आहे, ते म्हणजे वेळ! जी सगळ्यांकडे आहे, पण कोणासाठी देण्याची तयारी  नाही! हातात मोबाईल नामक खेळणे आल्यापासून तर नाहीच नाही! त्यासाठीच यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तीला द्या हे स्पेशल गिफ्ट!

एका हिंदी जाहिरातीचे गाणे आहे 'रिश्ते पकने दोsss' अर्थात नातं लोणच्यासारखं मुरू द्या, मग त्याची चव चाखा. पण आजच्या इन्स्टंट काळात एवढं थांबायला वेळ कोणाकडे आहे? जितक्या वेगाने लग्न होतात, तेवढ्याच वेगाने घटस्फोट! जोडीदार बदलता येईलही, पण जन्म दात्यांचे, भाऊ बहिणीचे, मित्र परिवाराचे काय? सगळ्याच ठिकाणी रिप्लेसमेंट पुरवता येत नाही. लग्नाच्या नाजूक नात्यातही एकमेकांना समजून घेण्याआधी गैरसमजांनी ती जागा एवढी व्यापून टाकलेली असते, की आपल्याला त्या व्यक्तीमधले केवळ दोषच दिसत राहतात. परंतु याच व्यक्तीची आपण निवड केली होती, तिला समजून घेण्यात आपण कमी पडत आहोत, हे आपण लक्षातच घेत नाही. 

प्रत्येक नात्याला वेळ देणे गरजेचे आहे. दिवसभरात आपण आपल्या आई वडिलांशी किती वेळ बोलतो? कितीदा त्यांना स्पर्श करतो? कितीदा आनंदाने मिठी मारतो? या सगळ्या गोष्टींमध्ये आपले बालपण गेले आहे. आपल्या रटाळ गप्पा, शाळेतले किस्से त्यांनी न कंटाळता कान देऊन तासनतास ऐकले आहेत. आता त्यांच्या गप्पा, समस्या ऐकण्याची वेळ आपली आहे. असे असताना आपण जर वेळ नाही सांगून जबाबदारी झटकत असू, तर नाते दुरावण्याला जबाबदार कोण?

चार दिवसांसाठी माहेरी आलेली बहीण प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागेल म्हणून अनेक भाऊ तिच्याशी नाते तोडून टाकतात. त्यांच्यापुरता प्रश्न मिटतो, परंतु एका मुलीचे हक्काचे माहेर कायमचे सुटते, हे भान आपल्यला राहत नाही. त्याऐवजी साडी, चोळी देऊन, प्रेमाने विचारपूस करून तिची दखल घेतली, तर ती राजीखुशी प्रॉपर्टीचे हक्कही सोडून देईल. अर्थात या हेतूने तिचा पाहुणचार करू नका, भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याला जपण्यासाठी तिचं कायम माहेरपण करा. 

आजची मुले मोबाईलच्या जगात हरवली आहेत अशी आपण तक्रार करतो, परंतु दिवसभरात आपण त्यांच्याशी त्यांच्या वयाचे बनून किती वेळ खेळतो? त्यांच्या समस्या त्यांचे बालविश्व समजून घेण्याचा आपण किती प्रयत्न केला आहे? आपण कधी पुस्तक वाचत नाही, मग मुलांनी मोबाईल सोडून पुस्तक वाचावे ही अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? मुलांना महागडी खेळणी नको, तर प्रेम देणारे, त्यांचं ऐकून घेणारे, त्यांच्याशी खेळणारे आई बाबा हवे असतात. यासाठी आपल्याला द्यावा लागतो, तो फक्त वेळ!

आज आपल्याच नाही, तर आपल्या मित्र परिवाराच्या आयुष्यात अनेक अडचणी असतील. अशात कोणी स्वतःला संपवले, कोणाचा अकाली मृत्यू झाला की आपण म्हणतो, 'तो कधी त्याच्या समस्येबद्दल बोलला नाही...' परंतु वास्तव हे आहे, की त्याची समस्या कधी कोणी ऐकून घेतली नाही. मित्र मैत्रिणी फक्त सेलिब्रेशन साठी नाही तर सुख दुःखाचे वाटेकरी असतात. ते नाते जपायचे असेल तर तिथेही द्यावा लागेल तो वेळ!

आजच्या धकाधकीच्या काळात वेळ काढणे शक्यच नाही, असे म्हणत असाल, तर वही पेन घ्या आणि दिवसभरात आपल्याही नकळत किती वेळ आपण वाया घालवतो, ते लिहून काढा. म्हणजे तो वेळ सत्कारणी लावता येईल. सुख दुःखाचे शेअरिंग करायला हाडामासाची, चालती बोलती आणि आपल्याप्रती कणव असलेली माणसं लागतात. तिथे पैसा कामी येत नाही. पैसा जरूर कमवावा पण स्वतःला व नात्यांना गमवावे लागेल, एवढ्या पैशांची खरोखरच गरज नाही. म्हणून वेळीच सावध व्हा आणि पैशांबरोबर जिवाभावाची नाती जोडा. कारण नातं तुटायला एक क्षण पुरतो, परंतु टिकवून ठेवायला पूर्ण आयुष्य!

Web Title: Raksha Bandhan 2022: Don't forget to give 'this' a gift if you want to tie the knot of relationship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.