Raksha Bandhan 2022: नारळी पौर्णिमेला दाखवा नारळी भाताचा नैवेद्य; त्यासाठी फॉलो करा विशेष ट्रिक्स आणि टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:20 PM2022-08-08T14:20:44+5:302022-08-08T14:21:10+5:30
Narali Purnima 2022: नारळी पाक बनवण्यात अनेक गृहिणींचा हातखंडा असतो, पण अनेकदा नारळी भाताची कृती फसते, त्यासाठी ही सोपी पद्धत!
नारळी पौर्णिमेच्या सणाला अर्थात रक्षाबंधनाला नारळीपाक/ खोबरेपाक किंवा नारळीभाताच्या नैवेद्याला विशेष महत्त्व असते. यादिवशी कोळीबांधव समुद्राला नारळ म्हणजेच श्रीफळ अर्पण करतात आणि गोड पदार्थात या दोन पदार्थांना विशेष प्राधान्य देतात. खोबरेपाक करण्यात अनेक गृहिणींचा हातखंडा असतो, पण नारळी भात बनवताना कोणाला तो कोरडा किंवा जास्त ओला झाल्याचा अनुभव येतो. यासाठी चकली.कॉम या संकेतस्थळावर वैदेही भावे यांनी केशरी भात बनवण्याच्या ट्रिक्स आणि टिप्स दिल्या आहेत. या पद्धतीने तुम्हीदेखील नारळी भात करून बघा!
नारळी भात:
साहित्य:
३/४ कप तांदूळ
दिड कप पाणी
२ + १ टेस्पून साजूक तूप
२ ते ३ लवंगा
१/४ टिस्पून वेलची पूड
१ कप गूळ, किसलेला (टीप २)
१ कप ताजा खोवलेला नारळ
८ ते १० काजू
८ ते १० बेदाणे
कृती:
१) तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत.
२) पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
३) तांदूळ परतत असतानाच दुसर्या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे.
४) गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजला कि हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
५) नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करावे. भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
६) जाड बुडाचे पातेले गरम करावे. त्यात तूप गरम करून काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
७) झार्याने काजू आणि बेदाणे दुसर्या वाटीत काढावे. गॅस मंद करून उरलेल्या तूपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे. वेलचीपूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. साधारण १० ते १५ मिनीटे शिजवावे.
८) भात सुरूवातीला थोडा पातळ होईल आणि काही मिनीटांनी आळेल. शेवटची २-३ मिनीटे झाकण न ठेवता भात शिजवा. तळलेले काजू, बेदाणे घालावे. सर्व्ह करताना तूप घालून सर्व्ह करावे.
टीप्स:
१) गूळ-नारळ-भात यांचे मिश्रण शिजवताना गूळ वितळल्याने सुरूवातीला ते पातळ होते. काहीवेळ शिजवल्यावर ते आळत जाईल. तसेच नारळीभात तयार झाल्यावर शेवटची काही मिनीटे झाकण न ठेवता शिजवावे म्हणजे अधिकचा ओलसरपणा निघून जाईल.
२) जर नारळीभात खुप गोड नको असेल तर गूळाचे प्रमाण १ कप ऐवजी पाऊण कप वापरा.
३) जर नारळीभात तयार झाल्या झाल्या लगेच चव पाहिली तर प्रचंड गोड लागेल, पण काही कालावधीनंतर गुळाचा पाक भातात मुरल्याने गोडपणा काहीप्रमाणात कमी होतो.
४) तांदूळ परफेक्ट शिजवावा. कमी शिजलेल्या भाताची शिते, गूळाच्या संपर्कात आल्यामुळे कडकडीत होतात. तसेच जास्त शिजलेल्या भाताचा, गूळ आणि नारळ घालून शिजवल्यावर गोळा होतो आणि शिते आख्खी राहात नाहीत.
५) भात शिजवताना थोडे केशर घातल्यास स्वाद आणि रंग छान येतो.