Raksha Bandhan 2024 कधी आहे? राखी कशी बांधावी? वाचा, रक्षासूत्राचे महत्त्व अन् महात्म्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:09 AM2024-08-13T11:09:04+5:302024-08-13T11:09:16+5:30
Raksha Bandhan 2024 Date: राखी बांधण्याचा शास्त्रोक्त विधी कोणता? कोणता मंत्र म्हणावा? रक्षाबंधनाचे महत्त्व जाणून घ्या...
Raksha Bandhan 2024 Date: चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहेत. भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण महिना सुरू झाला की, रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलून जातात. आवडती राखी घेतली जाते. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. यंदा रक्षाबंधन कधी आहे? राखी कशई बांधावी? रक्षाबंधनासाठी शुभ वेळ कोणती? जाणून घेऊया...
लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ-बहीण परिस्थितीनुरूप एकमेकांपासून दूर असले तरी, लहानपणापासूनच्या आठवणी त्यांनी हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवा कठीण रक्षाबंधनाप्रसंगी त्यांना आधार देत असतो. बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी 'रक्षासूत्र' म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे. रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात. जे वेदातील संस्कृत शब्द 'रक्षिका' या शब्दाचा अपभ्रंश आहे. मध्यकाळात याला राखी म्हटले जाऊ लागले, असे सांगितले जाते. देशाच्या प्रत्येक प्रांतात याला वेगवेगळे नाव आहे. दक्षिण भारतात नारळी पूर्णिमा, बलेव आणि अवनी अवित्तम, तर राजस्थानमध्ये रामराखी आणि चुडाराखी म्हटले जाते.
यंदा रक्षाबंधन कधी आहे?
यंदा, सोमवार १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा, १८ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होते. तर १९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रौ ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होते. रक्षाबंधनात विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रा योग आहे. भद्राकाळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्ये भद्राकालात करू नयेत, असे म्हटले जाते. पण, महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. तसेच भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असे जे म्हटले जाते, त्यात काहीही तथ्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधावी?
- रक्षाबंधनाच्या दिवशी सकाली स्नानादी कार्ये उरकून शुचिर्भूत व्हावे. घरातील देवतांना दंडवत घालावा. आराध्य देवता, कुलदेवता यांचे नामस्मरण करावे. नमस्कार करून त्यांचे शुभाशिर्वाद घ्यावेत.
- एका ताटात किंवा ताम्हनात राखी, अक्षता, कुंकू घ्यावे. अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात. निरांजनही तयार करावे.
- राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी.
- रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते.
- राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्याला बांधावे. यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा.
- रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर वा कुंकू लावावे.
- कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात.
- या विधीनंतर भावाचे औक्षण करावे.
- औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो, असे मानले जाते.
- रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा-बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी.
- भाऊ मोठा असेल, तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा.
- रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभुषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी.
राखी बांधताना म्हणावयाचे मंत्र:-
- येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:।
- सिन्दूरं सौभाग्य वर्धनम, पवित्रम् पाप नाशनम्। आपदं हरते नित्यं, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा॥, हा मंत्र टिळा लावताना म्हणावा.