रक्षाबंधनाला भद्रा योग: कोणत्या वेळेस राखी बांधावी? जाणून घ्या, शुभ मुहूर्त अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 01:25 PM2024-08-09T13:25:08+5:302024-08-09T13:32:10+5:30
Raksha Bandhan 2024 Rakhi Muhurat: यंदा रक्षाबंधन कधी आहे? या रक्षाबंधनाला भद्रा काळ लागणार आहे. राखी कधी बांधावी? जाणून घ्या...
Raksha Bandhan 2024 Rakhi Muhurat: चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण-उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे. श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे. याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. सन २०२४ मध्ये रक्षाबंधन कधी आहे? कोणत्या शुभ मुहुर्तावर राखी बांधावी? भद्रा योग कधी आहे? जाणून घेऊया...
श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो. देशभरात हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते.
रक्षाबंधन भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवणारा सण
यंदा, सोमवार १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा, १८ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होते. तर १९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रौ ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होते. रक्षाबंधनात विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो, असे सांगितले जाते.
भद्रा काळ म्हणजे काय? भद्राकालात राखी बांधावी का?
पंचांगानुसार, ज्या दिवशी 'विष्टी' करण असते, त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. १९ ऑगस्ट २०२४ रोजी विष्टी करण आहे. विष्टी करणाची सांगता १९ ऑगस्ट रोजी दुपारी ०१ वाजून ३२ मिनिटांनी होत आहे. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते. भद्राकाळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्ये भद्राकालात करू नयेत, असे म्हटले जाते. शास्त्रानुसार, जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल, तर भद्राकालात केले जात नाही. पण, महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. तसेच भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असे जे म्हटले जाते, त्यात काहीही तथ्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता?
असे असले तरी जर शुभ मुहुर्तावर राखी बांधायची असेल, तर काही वेळ सांगितली जात आहे. भद्रा काळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ०१ वाजून ३२ मिनिटांपासून राखी बांधली जाऊ शकते. तसेच प्रदोष काळी राखी बांधायची असेल, तर सायंकाळी ०६ वाजून ५७ मिनिटे ते रात्री ०९ वाजून १० मिनिटांपर्यंत रक्षाबंधन केले जाऊ शकते.