Raksha bandhan: गुरुवार, ११ ऑगस्ट रोजीच करावं रक्षाबंधन, वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही, पंचांगकर्ते दाते यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 08:01 PM2022-08-10T20:01:30+5:302022-08-10T20:02:50+5:30
Raksha Bandhan: राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे. याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही. त्यामुळे भद्राचा विचार न करता ११ ऑगस्ट या दिवशी नेहमी प्रमाणे राखीपौर्णिमा साजरी करावी
सोलापूर - राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे. याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही. त्यामुळे भद्राचा विचार न करता ११ ऑगस्ट या दिवशी नेहमी प्रमाणे राखीपौर्णिमा साजरी करावी असे पंचागकर्ते दाते यांनी सांगितले आहे.
पूर्वीच्या काळी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत नव्हता, त्याकाळी रक्षाहोम करून रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे, अशा पद्धतीने रक्षाबंधन विधी करणाऱ्यांसाठी भद्राकाल वर्ज्य सांगितला आहे.
रक्षाबंधन हे मुंज, विवाह, वास्तुप्रमाणे मंगल कार्यासारखे नसून सामाजिक उत्सव आहे. भद्रा असतानाच्या काळात म्हणजे दिवसभरात आपल्या सोयीने केंव्हाही करता येईल असे आमचे मत असल्याने दाते पंचांगात रक्षाबंधनची वेळ दिलेली नसल्याचे पंचांगकर्ते दाते यांनी सांगितले.
असे करता येईल विधिवत रक्षाबंधन
ज्यांना रक्षाबंधन विधिवत करावयाचे आहे. त्यांनी खालील प्रमाणे विधी करावा व त्यासाठी भद्राकाल अवश्य वर्ज्य करावा. रक्षाबंधन विधी - सूर्योदयी स्नान करावे. उपाकर्म व ऋषींचे तर्पण करावे. अपराह्नकाली रक्षा तयार करावी. तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थात् राखी तयार होते. मग तिची पूजा करावी. नंतर पुढील मंत्र म्हणत ती राखी (मंत्र्याने राजाला) बांधावी.
येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।। याचा अर्थ असा - महाबली बलीराजा ज्या रक्षेने बांधला गेला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे तू चलित होऊ नकोस अढळ रहा.