Ram Navami 2021 : स्व-सामर्थ्याची जाणीव करून देणारा जांबुवंतासारखा गुरु आयुष्यात हवाच; सांगते रामकथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 10:45 AM2021-04-20T10:45:13+5:302021-04-20T10:46:29+5:30
Ram Navami 2021: अनेकदा आपणास स्वसामर्थ्याचे विस्मरण होते. तू हे करु शकणार नाहीस या वाक्यांनीसुध्दा सामर्थ्याचे हनन होते. तेव्हा आपण स्वत:च स्वसामर्थ्याची खुणगाठ बांधल्यास यशासाठी कोटीच्या कोटी उड्डाण घेता येईल.
>>डॉ. भूषण फडके.
रावण सीतेला आकाशमार्गाने लंकेकडे नेत असतांना सीता सहाय्यार्थ आक्रोश करते, तेंव्हा जटायू सहाय्यार्थ येतो. जटायू तीक्ष्ण चोचांनी रावणाला घायाळ करतो, रावणाला आपला पराभव दिसू लागतो. तो धूर्त राक्षस जटायूस म्हणतो, माझा प्राण माझ्या अंगठ्यात आहे, तुझा कशात आहे. भोळा जटायू सांगतो माझ्या पंखात आहे. जटायू त्वेषाने, रावणाचा अंगठा फेडण्यास वाकतो आणि धूर्त कपटी रावण त्याचे पंख छाटतो, जटायू जखमी होतो. श्रीराम आपला शोध घेण्यास येतील तेव्हा त्यांना कळावे म्हणून सीता आपले दागिने वस्त्रात गुंडाळून फेकतो. ते दागिने ऋषमुक पर्वतावर सुग्रीवाला सापडतात.
Ram Navmi 2021: उपद्रवी व्यक्तींना आधी समजावून बघा, अन्यथा शासन करा; रामायणाचा धडा
इकडे श्रीराम-लक्ष्मणासमवेत पर्णकुटीत येतात आणि जानकी दृष्टीस न पडल्यामुळे अतिशय व्यथित होतात. तेथील परिस्थितीवरुन काहीतरी विपरीत घडले आहे हे उभयतांच्या लक्षात येते. प्रिय पत्नीच्या विरहाने व्याकुळ होऊन लता-वेलींना सितेचा ठावठिकाणा विचारतात.
माझ्या बाणांनी त्रैलोक्य नष्ट करतो असे उद्गार काढतात. तेव्हा लक्ष्मण त्यांचे सांत्वन करतो, मर्यादापुरुषोत्तम असल्याची आठवण देऊन तो श्रीरामांना शांत करतो. श्रीराम-लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ असतांना त्यांना जखमी जटायू भेटतो. आकाशमार्गाने रावण सीतेस घेऊन गेला एवढे सांगून पराक्रमी जटायूचे प्राणोत्क्रमण होते.
वनातून मार्गक्रमण करताना कदंब राक्षस श्रीरामांना सुग्रीवासोबत मैत्री करण्याचा सल्ला देतो. कदंब त्यांना तपस्विनी शबरी आणि ऋषमुक पर्वताबद्दल सांगतो. श्रीरामांचे पंपा सरोवरापाशी शबरीच्या आश्रमात आगमन होते. मातंग ऋषींची शिष्या शबरी रामभक्तीत रममाण असते. जंगलातील फळांनी ती श्रीरामांचे स्वागत करते. भक्तीरसातील तो रानमेवा श्रीराम आनंदाने ग्रहण करतात. मातंग ऋषींची शिष्या श्रीरामांच्या उपस्थितीत आत्मसमाधी घेते.
राम-लक्ष्मण ऋषमुक पर्वतावर जातात. धनुष्य बाण धारण केलेले वीर पाहून वालीने यांना नाशासाठी पाठवीले असे सुग्रीवास वाटते. तेव्हा बुध्दीमान हनुमंत श्रीरामांकडे जातात. श्रीराम हनुमंताच्या बुध्दीचातुर्यावर प्रसन्न होतात. राम-सुग्रीवाची भेट होते आणि श्रीराम वालीवधाची तर सुग्रीव सीतेच्या शोधात मदत करण्याची प्रतिज्ञा घेतात. श्रीराम वालीवध करतात. सुग्रीव वानरसेनेला सितेच्या शोधास पाठवतो. पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशांचे वानरविर परत येतात. दक्षिण दिशेस वालीपुत्र अंगदाच्या नेतृत्वात हनुमंत, जांबुवंत समुद्रापाशी येऊन पोहचतात. त्याठिकाणी त्यांची जटायुचा भाऊ संपातीसोबत भेट होते आणि सीतेला रावणाने लंकेतील अशोकवनात ठेवले आहे हे कळते.
आता समुद्र उल्लंघायचा कसा हा प्रश्न येतो. सर्व वानरवीर आपण किती योजने उड्डाण करु शकतो हे सांगतात. समुद्र 100 योजने (1200 किमी) असतो. अंगद म्हणतो मी समुद्र उल्लंघून जाऊ शकतो पण परत येण्याची माझी शक्ती नाही. हा वार्तालाप हनुमंत शांतपणे ऐकत असतो. तेव्हा महाबली जांबुवंत हनुमानास त्याच्या सामर्थ्याचे स्मरण करुन देतो. स्वत:च्या सामर्थ्याचे स्मरण होताच तो महाबली वीर महेंद्र पर्वतावरुन उड्डाणास सिध्द होतो.
हनुमानास शापामुळे स्वसामर्थ्याचे विस्मरण झालेले असते. अनेकदा आपणास स्वसामर्थ्याचे विस्मरण होते. तू हे करु शकणार नाहीस या वाक्यांनीसुध्दा सामर्थ्याचे हनन होते. अशावेळेस जांबुवंतासारख्या स्वसामर्थ्याची आठवण देणारा प्रत्येकवेळेस भेटेलच असे नाही. तेव्हा आपण स्वत:च स्वसामर्थ्याची खुणगाठ बांधल्यास यशासाठी कोटीच्या कोटी उड्डाण घेता येईल.
|| बोला सियावर रामचंद्र की जय ||
भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८
Email-bmphadke@gmail.com