Ram Navami 2022 : तरुण पिढीने आजच्या काळातही रामायणातून कोणता बोध घ्यावा, हे सांगणारी सुंदर कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 04:56 PM2022-04-07T16:56:44+5:302022-04-07T16:57:09+5:30
Ram Navami 2022 : पोथ्या पुराणांना न वाचता नावं ठेवण्यापेक्षा त्या उघडून, वाचून, चिंतन करून त्यातून बोध घेतला, तर जीवनाला निश्चित चांगले वळण लाभेल!
एक आजोबा ट्रेन प्रवासासाठी गाडीच्या प्रतिक्षेत फलाटावर बसले होते. त्यांच्याजागी कोणी युवक असता, तर त्याने वेळ घालवण्यासाठी तत्काळ मोबाईल हाती घेतला असता आणि हेडफोन कानात अडकवले असते. परंतु, आजोबा जुन्या विचारांचे आणि जुन्या काळातले. वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी ग्रंथवाचन करायला सुरुवात केली. गाडी यायला अजून बराच वेळ बाकी होता.
थोड्या वेळाने एक तरुण जोडपे त्याच ट्रेनने प्रवास करण्यासाठी फलाटावर पोहोचते. ट्रेनच्या वेळेआधी पोहोचल्याचे समाधान दोघांच्या चेहऱ्यावर होते. ट्रेन यायला आणखी अर्धा तास बाकी होता. म्हणून दोघे जण बसायला कुठे जागा मिळते का, हे पाहू लागले. तरुणाची नजर आजोबा बसलेल्या बाकावर गेली. तिथे आणखी दोन जागा शिल्लक होत्या. दोघे जण सामान उचलून आजोबांच्या दिशेने गेले. ते येताच आजोबांनी बाजूला ठेवलेली बॅग उचलून पायाशी ठेवली आणि त्यांना बसायला जागा दिली. दोघांकडे बघून स्मित करत आजोबा वाचनात मग्न झाले.
बायको फोनवर बोलण्यात मग्न असताना तरुणाने आजोबांच्या ग्रंथात मान डोकावली. आपला आगाऊपणा व्यक्त करत तो आजोबांना म्हणाला, `काय आजोबा? टीव्हीवर इतक्यांदा रामायण दाखवून झाले. तरी तुम्ही काय अजून त्या ग्रंथांमध्ये अडकून राहिलात? त्यापेक्षा मोबाईलवर खूप छान आधुनिक ग्रंथ उपलब्ध आहेत. ते वाचा. म्हणजे नवीन जगाशी तुम्ही जोडले जाल.' आजोबांनी नुसते हसून एकतर्फी संवाद तिथेच संपवला.
काही वेळातच ट्रेनची घोषणा झाली. ट्रेन त्या स्टेशनवर फार काळ थांबणार नव्हती. ट्रेन थांबताच गर्दी झाली. सगळेच जण चढण्यासाठी घाई करू लागले. आजोबा मागच्या दाराने चढले. पाठोपाठ इतर प्रवासीही चढले. आजोबांच्या बाजूला बसलेला तरुण पुढच्या दाराने डब्यात शिरला. ट्रेन काही क्षणात सुरू झाली आणि फलाट संपायच्या आत थांबली. आजोबांनी विचारले, `काय झाले? ट्रेन का थांबली?' कोणीतरी सांगितले, `एका प्रवाशाची बायको आत चढायची राहून गेली म्हणून त्याने चैन ओढली.'
खिडकीतून डोकावून पाहिले, तर मगाशी बाजूला बसलेल्या तरुणाची बायको मागे राहिली होती. ते दोघे चढले. ट्रेन सुरू झाली. सगळे जण आपापल्या जागी बसल्यावर आजोबा त्या तरुणाजवळ गेले आणि म्हणाले, 'बेटा आता मी सांगतो, तू ऐक! तू म्हणत होतास ना, रामायणातून काय मिळणार आहे? तर बेटा, आपल्याआधी कुटुंबाची काळजी घेणे, ही छोट्यात छोटी गोष्टसुद्धा रामायणातून शिकायला मिळते. वनवासाला निघताना रथात चढण्यापूर्वी राम सीतेला आधी चढवतात. दंडकारण्यात जाताना नौकाप्रवासातही सीतेला नावेत आधी बसवतात. मग स्वत: बसतात. एवढेच काय, तर सुवर्णमृगाच्या शोधात निघतानाही ते लक्ष्मणावर सीतेची जबाबदारी सोपवून मगच बाहेर गेले. श्रीरामप्रभू जर एवढी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवू शकतात, तर आपणही त्यातून हे शिकायला नको का? प्रवासाला जाताना आधी बायको, मुलांची काळजी घ्यायची की आपणच पुढे स्वार व्हायचे? तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल बहुतेक! तरी एक गोष्ट लक्षात ठेव. रामायण, महाभारत धर्मग्रंथ कितीही वेळा वाचले, तरी त्यातून दरवेळी नवीन गोष्टीच शिकायला मिळतात. कसे वागावे, हे रामायणातून शिकावे आणि कसे वागू नये हे महाभारतातून शिकावे. या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यांची उकल, हे ग्रंथ वाचल्याशिवाय होणार नाही. म्हणून त्यांना कमी लेखू नकोस आणि जमल्यास कधीतरी सवडीने नक्की वाच, म्हणजे पुन्हा अशा चूका होणार नाहीत. जय श्रीराम...!'