Ram Navami 2022 : वाल्मिकी रामायणाव्यतिरिक्त 'या' अठरा रामायणाबद्दल तुम्ही याआधी कधी ऐकले होते का? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 01:07 PM2022-04-09T13:07:58+5:302022-04-09T13:08:19+5:30
Ram Navami 2022 : राम नवमी निमित्त या रामायणाची ओळख करून घ्या आणि भविष्यात शक्य असेल तेव्हा त्याचे वाचनही करा!
महर्षी वाल्मीकी यांनी रामायण लिहिले. ते वाचन करून रामकथेचे व्यापकत्त्व अनेकांना उलगडले. त्यामुळे निरनिराळी रामायणे अस्तित्त्वात आली. ती पाहिली म्हणजे वाल्मिकीरामायण किती बहुविध पैलूंनी नटले आहे, हे लक्षात येईल. अष्टादश रामायणं त्या त्या ग्रंथकृत्यांच्या रामायण आविष्काराची वैशिष्ट्ये म्हणून वाचण्यासारखी आहेत. ती पुढीलप्रमाणे-
- संवृत रामायण : हे सप्तसोपान रामायण नारदांनी सांगितले आहे.
- अगस्त्य रामायण : रामजन्महेतू या रामायणातील घटनावर्णन अगस्त्य ऋषींनी केले आहे.
- लोमश रामायण : लोमश यांनी लिहिलेल्या रामायणात जलंधराचे कारण रामावतार आहे असे म्हटले जाते. सीता म्हणजे मिथीलाधिपतीला दिसलेली योगमाया असे त्यात म्हटले आहे.
- मंजुळ रामायण : यात सुतीक्ष्ण ऋषींनी भक्तिवर्णनात्मक रामायण लिहीले आहे.
- सौपद्य रामायण : यात अत्री ऋषींनी भक्तिरसातून रामायण लिहीले आहे.
- महामाली रामायण : शिवपार्वती संवादातून याची निर्मिती झाली आहे.
- सौहाद्र् रामायण : हे बरेचसे वाल्मिकी रामायणासारखेच आहे. शरभंग ऋषी याचे रचेते आहेत.
- मणिरत्न रामायण : वसिष्ठ-अरुंधती संवादात्मक रामायण आहे.
- सौय्य रामायण : हनुमान आणि सूर्यात झालेला संवाद या रामायणात आहे आणि तेच याचे रचेते आहेत.
- चांद्र रामायण : हनुमान आणि चंद्र यांच्यातील संवाद रामायण निर्मितीस कारणीभूत ठरला आहे.
- मैन्द्र रामायण : या रामायणात मैन्द्र कौरव संवाद आहेत.
- स्वायंभुव रामायण : सीता मंदोदरीची कन्या, असे सांगणारे ब्रह्मदेव-नारद यांच्या संवादाचे हे रामायण आहे.
- सुब्रह्म रामायण : यात अनेक विषयांचा समावेश आहे. तसेच प्रयाग सारख्या तीर्थक्षेत्राचे महत्त्वदेखील अधोरेखित केले आहे. याचे कर्ते कोण याचा उल्लेख नाही.
- सुवर्चस रामायण : वाली-रामसंवाद, धोबी-धोबीपत्नी संवाद, लवकुश- राम युद्ध, महारावण युद्ध व वध, इ. विषयांचे वर्णन सुग्रीव आणि तारा यांच्या संवादातून निर्माण झाले.
- देव रामायण :रामपरीक्षा, कोप, रामशरणागती, रामविजय इ. सांगणारे रामायण हा इंद्र-जयंत यांच्यातील संवाद आहे.
- श्रवण रामायण : चित्रकूटावर राम-भरत संवाद, मंथरानिर्मिती इ. वर्णन इंद्र आणि राजा जनक यांच्या संवादाचे रूप आहे.
- दुरन्त रामायण : राम परत आल्यावर भरताने रामाला राज्य देणे, कैकयी क्षोभ,किष्किंधावर्णन, श्रीरामाची वालीवध प्रतिज्ञा, रामप्रसादाचा प्रभाव, इ. विषय असणारे दीर्घ रामायण. वसिष्ठ मुनी आणि राजा जनक यांच्यातील संवाद आहे.
- चंपू रामायण : रामभक्ती प्रकार, रामध्यान इ. विषय सांगणारे रामायण संवाद, शिव नारद संवादकर्ते असून तेच या रामायणाचे निर्माते आहेत.
या सर्वाचे मूळ अर्थात वाल्मीकी रामायणच आहे. फक्त वेगवेगळ्या लेखकांनी पुनर्निवेदन करताना त्यात कल्पनेनुरूप योग्य अशी रामायण कालदर्शक अशी, भर घातली आणि फुलवायचा प्रयत्न केला आहे. निरनिराळ्या भारतीय भाषातली वीस प्रातिनिधिक रामायणे आहेत त्या सर्वांचा उगमही वाल्मीकी रामायणात सापडतो. यावरून कळते की रामायण केवळ महाकाव्य नाही तर प्रत्येकाचे आदर्श जीवनाचे स्वप्नं आहे.