Ram Navami 2022 : श्रीरामांवर हनुमंताचे आणि हनुमंतावर श्रीरामांचे अगाध प्रेम होते याचा दाखला देणारा छोटासा पण मजेशीर प्रसंग वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 11:50 AM2022-04-09T11:50:21+5:302022-04-09T11:51:01+5:30
Ram Navami 2022 : भक्ताला भगवंताचे आणि भगवंताला भक्ताचे सान्निध्य नेहमीच हवेहवेसे वाटते, अशा वेळी ते नानाविध उपाय करून सहवासाचा आनंद कसा घेतात हे सांगणारी कथा!
नुुकत्याच स्नान करून आलेल्या सीतामाई कुंकू लावीत होत्या आणि कौतुकाने मान वळवून हनुमंत तेथे निरीक्षण करीत होता. मधल्या बोटावर सिंदुर घेऊन सीतामाईने तो स्वत:च्या भांगात भरला, तेव्हा हनुमंताने विचारले, `सीतामाई, भांगात सिंदुर कशासाठी भरता?'
त्यावर सीतामाईने उत्तर दिले, `अरे, प्रभू रामरायाचे आयुष्य वाढावे म्हणून!'
हे ऐकल्याबरोबर हनुमंत ताडकन उठला आणि बाहेर गेला. थोड्यावेळाने परत आला, तेव्हा त्याला पाहून सीतामाईला हसू आवरेना. त्यांनी त्याला विचारले, हे काय केलंस?
हनुमंताने गंभीर स्वरात उत्तर दिले, `माझ्या प्रभूंसाठी हे करावयास नको का?'
त्याचे भोळे प्रेम पाहून सीतामाईचा उर भरून आला. परंतु हनुमंताची काळजीही वाटली. त्यामुळे त्या म्हणाल्या, `अंगाची आग होऊ नये आणि शेंदूर जाऊ नये म्हणून त्यावर तेल लाव.'
हनुमंताने आज्ञाधारकपणे सीतामाईला विचारले, `म्हणजे आता माझा रामराय अमर होईल ना?'
नंतर रामराज्याचा विषय काढत तो म्हणाला, `सीतामाई तुम्ही काम वाटून दिले, पण मला काहीच काम दिले नाही, असे का?'
सीतामाई म्हणाल्या, `तुला काय काम द्यावे मलाच सुचत नाही. तुच विचार करून सांग.'
हनुमंत थोडा विचार करून म्हणाला, `सीतामाई, राज्याभिषेक हे श्रमाचे दिवस, प्रभूंना झोप येऊन चालणार नाही. मी चुटक्या वाजवत राहीन!'
रामरायाचा अखंड सहवास मिळावा म्हणून हनुमंताने हे काम शोधून काढले हे सीतामाईच्या लक्षात आले. त्याच्या भक्तीची प्रशंसा करत सीतामाईने होकार दिला आणि हनुमंताला त्या मंगलक्षणी छोट्याशा कामातून रामरायाचा अखंड सहवास मिळाला.