Ram Navami 2023:श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहल्या पापमुक्त झाली, तसे अनेक वंचित जीव समाजाच्या मुख्य प्रवाहात आले, त्याची कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 07:00 AM2023-03-25T07:00:00+5:302023-03-25T07:00:01+5:30

Ram Navami 2023: श्रीरामांनी सर्व उपेक्षित जीवांना आपल्या प्रेम, ममत्त्व आणि स्नेहाने आपलेसे करून घेतले, म्हणून ते रामराज्याचा एक भाग झाले... 

Ram Navami 2023: By the touch of Shri Ram, Ahalya became free from sin, many ignored souls came into the mainstream of society, his story! | Ram Navami 2023:श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहल्या पापमुक्त झाली, तसे अनेक वंचित जीव समाजाच्या मुख्य प्रवाहात आले, त्याची कथा!

Ram Navami 2023:श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहल्या पापमुक्त झाली, तसे अनेक वंचित जीव समाजाच्या मुख्य प्रवाहात आले, त्याची कथा!

googlenewsNext

>> डॉ. भूषण फडके

मिथीलेच्या मार्गात विश्वामित्र श्रीरामांना काही कथा सांगतात. पराक्रमी पूर्वजांचे रामाला स्मरण देऊन विरश्री निर्माण करणे हा विश्वामित्रांचा हेतू होता, म्हणून प्रथम ते श्रीरामास राजा भगीरथाची कथा सांगतात. दुसरी कथा समुद्रमंथनाची सांगितली. समुद्रमंथनातून अमृत मिळविणे हे लक्ष्य! हे ध्येय ! ध्येयप्राप्ती झाल्यानंतर ते टिकविणे महत्वाचे आहे हा विचार विश्वामित्रांनी रामास सांगितला. अमृत मिळाले पण त्यानंतर कलह झाला आणि त्यात राक्षसांचा नाश झाला म्हणजेच ध्येय  साध्य झाल्यावर ते टिकविण्यास हवे. 

राजकुमारांसमवेत विश्वामित्र गौतम ऋषींच्या उजाड आश्रमाजवळ पोहचतात. विश्वामित्र सांगतात, “देवराज इंद्र हा गौतम ऋषींची पत्नी अहिल्यादेवीच्या सौंदर्यावर लुब्ध होता. एक दिवस गौतम ऋषी आश्रमात नसताना संधी साधून देवराज इंद्र गौतम ऋषींच्या रुपात अहिल्येजवळ रतीसुखाच्या इच्छेने आला. देवांच्या राजाला आपल्याविषयी प्रेम वाटते याचा तिला अभिमान वाटला आणि ती त्याच्यासमवेत रममाण झाली. अतिशय क्रोधित गौतमांनी  होऊन इंद्रास शाप दिला आणि अहिल्येस शाप देतांना ते म्हणाले, "तू कोणालाही दिसणार नाहीस, अनेक वर्षे तू येथेच पडून राहशिल. तुझ्या कुकर्मामुळे तू समाजापासून दुर राहशिल." अहिल्येच्या क्षमायाचनेनंतर गौतम ऋषी सांगतात, “दशरथपुत्र राम या घोर वनात येतील आणि तुझा उध्दार करतील”.  विश्वामित्र ऋषी श्रीरामांना आश्रमात जाऊन अहिल्येचा उध्दार करण्याची आज्ञा देतात. गौतमांच्या शापामुळे रामाशिवाय इतर कोणीही तिला पाहू शकत नव्हते. श्रीरामांचे दर्शन होताच ती इतरांना दिसू लागते. अनेक रामायणात अहिल्या शिळा झाली होती आणि श्रीरामांच्या चरणस्पर्शाने ती पुन्हा स्त्रीरुपात आली असा उल्लेख आहे परंतु गौतमांच्या शापामुळे तिचा बाह्य जगाशी संपर्क नव्हता म्हणजे ती शिलेसमान होती. प्रभु रामांच्या स्पर्शानं तिला शुध्दत्व आले. समाजाने बहिष्कृत केलेल्यांना पुन्हा सन्मानाने प्रवाहात आणण्याची गरज प्रभु रामांनी दाखवुन दिली.

गौतमांच्या आश्रमातून राम-लक्ष्मण विश्वामित्रांसमवेत जनकराजाच्या मिथिलानगरीत दाखल होतात. जनक राजाकडील अतिविशाल शिव  धनुष्यास जो प्रत्यंचा चढवेल त्यासोबत सीतेचे स्वयंवर करण्याचा राजा जनकाचा पण असतो. प्रभू रामचंद्र हा पण जिंकतात.विवाह हा व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा संस्कार आहे. विवाहाने दोन कुटूंबाचे मिलन होते. रामाने स्वयंवराचा पण जिंकला, तरीही अयोध्येस जाऊन वराच्या पित्यास आदरपूर्वक बोलवण्याचा जनक राजा आपला मनोदय सांगतो यावरुन संस्कार हे अनादी कालापासून भारतदेशात रुजलेले आहेत हे दिसून येते.

राम-सीतेच्या विवाहानंतर राजा दशरथ तीनही राण्या आणि चारी राजपुत्र आणि त्यांच्या नववधुंसह अयोध्या नगरात प्रवेश करतात. राम-सिता विष्णु लक्ष्मीसारखे भासतात. अयोध्यावासी आनंदात असतात. केकयराज अश्वपती (कैकयीचे वडील) आपला पुत्र युधाजित यास अयोध्येत पाठवितात. त्यांच्यासोबत भरत-शतृघ्न आपल्या नववधूंसमवेत केकय देशात जातात. राम-सीता, लक्ष्मण-ऊर्मिला अयोध्येत आनंदात असतात.

Web Title: Ram Navami 2023: By the touch of Shri Ram, Ahalya became free from sin, many ignored souls came into the mainstream of society, his story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.