Ram Navami 2023: सर्वसामान्य लोक संघटित होऊन लढले तर रावणासारख्या दुष्प्रवृत्तीचा नाश करू शकतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 07:00 AM2023-03-31T07:00:00+5:302023-03-31T07:00:02+5:30
Ram Navami 2023: नेतृत्व कुशल असेल तर असाध्यही होतं साध्य; सामान्यांकडूनही घडू शकतं असामान्य कार्य!
>>डॉ. भूषण फडके.
रावणाच्या अहंकारामुळे अंगदशिष्टाई असफल होते. असंख्य वानरवीर लंकेवर आक्रमण करून युद्धासाठी गर्जना देऊन आसमंत दणाणून सोडतात.युद्धाला सुरुवात होते.हनुमान, सुग्रीव, वाली पुत्र अंगद, नल नील, जांबुवंत हे श्रीरामाच्या सेनेतील वीर अतुलनीय पराक्रम गाजवतात. युद्धात रावणाचे सर्वबंधूसह महापराक्रमी कुंभकर्ण याचाही वध होतो. रावण पुत्र इंद्रजीताला लक्ष्मण यमसदनी धाडतो. आता रावण युद्धसाठी सज्ज होतो. रावण हा तपस्वी विश्राव्याचा याचा पुत्र, त्याने उग्र तपश्चर्येने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून, स्वतःला गरुड, यक्ष, दैत्य दानव, देव यांच्याकडून मृत्यू येणार नाही असा वर मागून घेतला होता. वराने उन्मत्त होऊन त्याने पृथ्वीवर हाहाकार माजविला. कुबेराचा पराजय करून त्याने सोन्याची लंका जिंकून घेतली. रावणाने अनेक स्त्रियांचे बलात्काराने अपहरण केले होते. अनेक राज्यांचा पराभव केला एवढेच नव्हे तर अनेक देवांचा पराजय करून त्यांना बंदी गेले होते.रावणाच्या नेतृत्वात राक्षस ऋषी-मुनीना त्रास देत. देवांचा राजा इंद्र यांचाही रावणाने पराभव केला होता. अनेक युद्धात जय मिळाल्यामुळे तो अहंकारी आणि गर्विष्ठ झाला होता. रावणाची पत्नी मंदोदरी सीतेला सन्मानाने श्रीराम कडे परत पाठवण्याचा वारंवार सल्ला देते पण अहंकारी रावण तिचा सल्ला नाकारतो. राम रावण युद्ध हे चांगल्या प्रवृत्ती आणि वाईट प्रवृत्ती या मधील युद्ध आहे.
राम-रावणाचे घनघोर युद्ध होते प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करतात दृष्ट प्रवृत्ती वर सत प्रवृत्तींचा विजय होतो. अहंकारी रावणाचा शेवट होतो म्हणून आकाशातून देव पुष्प वृष्टी करतात. “बोला सियावर रामचंद्र की जय”.
श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण बिभीषण यास लंकेच्या राज्यपदाचा अभिषेक करतो. प्रभू रामचंद्र आणि सीतेची भेट झाल्यावर अग्निदिव्य करून ती महान पतिव्रता आपल्या पावित्र्याची प्रत्येक्ष अग्नीदेवाकडून खात्री पटवून देते. श्रीराम, लक्ष्मण, सीता पुष्पक विमानातून अयोध्येस परत येतात. अयोध्येची जनता अत्यानंदित होते, डोळ्यात प्राण आणून ते श्रीरामांना पाहतात तेव्हा लक्षावधी डोळे श्रीरामांना ओवाळत आहेत असे वाटते. श्रीरामांना राज्याभिषेक करण्यात येतो, रामराज्याची सुरुवात होते.
श्रीराम विष्णूचा अवतार असले तरी मनुष्य रूपात असल्यामुळे त्यांच्यावर अनेक संकटे आली पण दृढनिश्चयाने आयुष्यात आलेल्या संकटांवर विजय मिळवून, संकटे जीवनाचा भाग असतात, न डगमगता त्यांना तोंड दिल्यास मार्ग सापडतोच याची शिकवण दिली. म्हणूनच श्रीराम अनुकरणीय आहेत. “आदर्शाचा आदर्श” म्हणजे “श्रीराम”. आपल्या भूभागावर रामराज्य यावं असं प्रत्येकाला वाटतं पण आपणही अयोध्यावासीयांसारखे होण्यास तयार नसतो. हक्काला कर्तव्याची जोड दिल्यास, समर्पण वृत्ती ठेवल्यास आपणही रामराज्याचा अनुभव घेऊ शकतो. आपणही श्रीरामासारखा “विवेक” अंगी रुजविण्याचा प्रयत्न करू. श्रीरामांसमोर नतमस्तक होऊन “जीवनोपयोगी रामायणाचे” हे दहावे पुष्प श्रीराम चरणी अर्पण करतो.
शब्दांच्या मर्यादेत महर्षी वाल्मिक यांचे महाकाव्य मांडण्याचे धाडस केले,काही चूक झाल्यास ती सर्वस्वी माझीच आहे उदार वाचक समजून घेतील. श्रीरामायण आपल्या सर्वाना “जीवनोपयोगी” ठरेल या खात्रीसह......
|| श्रीरामचंद्रार्पणमस्तू ||
|| बोला सियावर रामचंद्र की जय ||
भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८
Email-bmphadke@gmail.com